त्र्यंबकेश्वर मंदिर दोन महिने बंद ठेवण्याचा प्रस्ताव
गिरीश महाजन : स्थानिक, व्यावसायिकांच्या हिताचा विचार करूनच अंतिम निर्णय
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ८ : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांना गती देण्यासाठी त्र्यंबकेश्वर येथील भगवान त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी दोन महिने बंद ठेवण्याचा प्रस्ताव पालकमंत्री गिरीश महाजन यांनी स्थानिक रहिवासी आणि देवस्थान ट्रस्टसमोर ठेवला आहे. येत्या १५ ऑक्टोबरपासून मंदिर बंद ठेवले जाणार असल्याची चर्चा असली, तरी याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नसल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्पष्ट केले. ध्वजारोहणानंतर नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये दर्शन तात्पुरते बंद ठेवण्याचा पर्याय विचाराधीन आहे.
सिंहस्थ- कुंभमेळ्याचे ध्वजारोहण ३१ ऑक्टोबरला होणार असून, त्यापूर्वी शहरात विविध विकासकामांना वेग आला आहे. दर्शनपथासह मंदिर परिसरातील कामे अहोरात्र सुरू ठेवून ती वेळेत आणि सुरक्षितपणे पूर्ण करण्यासाठी भाविकांची वर्दळ काही काळ नियंत्रित करण्याची गरज असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. मंदिरातील पूजा-अर्चा मात्र सुरू ठेवून केवळ भाविकांचे दर्शन तात्पुरते बंद ठेवण्याचा प्रस्ताव आहे.
मंदिर परिसरातील कामे सुरू असताना भाविकांची मोठी गर्दी होत असल्याने कामांना अपेक्षित गती मिळत नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे कामांच्या सुरक्षिततेसह गुणवत्तेवर परिणाम होऊ नये आणि कुंभमेळ्यापूर्वी कामे पूर्ण व्हावीत, यासाठी मंदिर बंद ठेवण्याचा पर्याय पुढे आला आहे. अंतिम कालावधी देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाशी चर्चा करून निश्चित केला जाणार असून, भाविकांना निर्णयाची पूर्वसूचना दिली जाणार आहे.
स्थानिकांच्या उपजीविकेचाही विचार
त्र्यंबकेश्वर मंदिरावर अवलंबून असलेल्या छोट्या-मोठ्या व्यावसायिकांच्या उपजीविकेचा प्रश्नही महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे स्थानिकांना विश्वासात घेऊनच निर्णय घेतला जाणार आहे. तसेच ध्वजारोहण आणि अन्य धार्मिक विधींच्या काळात मंदिर बंद ठेवण्याबाबतही चर्चा आवश्यक आहे. शाळा-महाविद्यालये आणि शहरातील दैनंदिन व्यवहारांवर होणारा परिणाम लक्षात घेऊन नगरपालिका व देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त अंतिम निर्णय घेणार आहेत.
कोट
त्र्यंबकेश्वरचे मंदिर सलग दोन महिने बंद ठेवल्यास त्यावर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांचे काय होणार, याचाही विचार करावा लागेल. शाळा-महाविद्यालयांसह अन्य बाबींचे संभाव्य परिणाम एकत्रितपणे तपासूनच निर्णय घेतला जाईल.
- आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी, नाशिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.