फोटो : केशव मते त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कामे सुरू. - H31775,76,77,78,79,80
त्र्यंबकेश्वर मंदिर बंद - H31789
------------------------------------------------------------
त्र्यंबकराज मंदिर अडीच महिने बंद; व्यावसायिकांना धास्ती
स्थानिक रहिवासी, लोकप्रतिनिधी, मंदिर देवस्थान ट्रस्टकडून निर्णयाचे स्वागत; कामे वेळेत पूर्ण करण्याची अपेक्षा
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ९ : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांसाठी त्र्यंबकराज मंदिर १६ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०२६ या काळात भाविकांसाठी बंद राहणार आहे. मंदिर देवस्थान ट्रस्टच्या निर्णयाचे स्थानिकांनी स्वागत केले असले, तरी मंदिरावर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली. कामे निर्धारित वेळेत पूर्ण करून मंदिर वेळेत खुले करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याचे ध्वजारोहण ३१ ऑक्टोबरला होणार आहे. ऑगस्ट-सप्टेंबर २०२७ मधील मुख्य पर्वणीसाठी लाखो भाविक त्र्यंबकेश्वरला येतील. त्यांच्या सुविधांसाठी कुशावर्त तीर्थ, त्र्यंबकराज मंदिर, संत निवृत्तिनाथ मंदिर परिसर आणि रस्त्यांच्या रुंदीकरणाची कामे सुरू आहेत.
मंदिर परिसरातील व्यावसायिक गाळे काढण्याची मोहीम रविवार (ता. ११)पासून सुरू होणार आहे. दर्शनपथ टप्पा-दोनअंतर्गत तहसील कार्यालयापासून उपजिल्हा रुग्णालयामार्गे मंदिरापर्यंतची घरे आणि व्यावसायिक गाळे हटविण्यात येणार आहेत. कामांमुळे भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी कामे पूर्ण होईपर्यंत मंदिर बंद ठेवण्याची मागणी स्थानिकांनी केली होती.
मंदिर बंद राहिल्याने प्रसाद, फूलविक्री आणि अन्य व्यवसायांवर परिणाम होणार आहे. काही व्यावसायिकांना पर्यायी व्यवसाय किंवा मजुरी करावी लागणार आहे. दुसरीकडे, कामे पूर्ण झाल्यानंतर भाविकांना चांगल्या सुविधा मिळतील, अशी अपेक्षा व्यक्त करत काही भाविकांनी निर्णयाचे समर्थन केले.
कुशावर्त तीर्थाचे काम ३१ ऑक्टोबरपर्यंत
कुशावर्त तीर्थाच्या सुशोभीकरणासाठी आणि रुंदीकरणासाठी परिसरात भाविकांना प्रवेश बंद आहे. तीर्थाच्या चारही बाजूंचे रस्ते १५ मीटर रुंद करण्यात येणार आहेत. पितृपक्ष संपताच रविवार (ता. ११)पासून अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात येणार आहे. तीर्थ परिसरातील कामे ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
२१२ गाळ्यांचा प्रस्ताव शासनाकडे
संत निवृत्तिनाथ मंदिर, कुशावर्त तीर्थ ते त्र्यंबकराज मंदिर हा मार्ग १५ मीटर रुंद करण्यात येणार आहे. रस्त्यालगतची अतिक्रमणे हटविण्यासह फेरीवाल्यांना पर्यायी जागा देण्याचे नियोजन आहे. गाळेधारकांसाठी २१२ गाळ्यांचा प्रस्ताव पालिकेने राज्य शासनाकडे पाठविला आहे.
कोट
मंदिर बंदच्या काळात सिंहस्थाची कामे मार्गी लागतील. त्यानंतर भाविकांना चांगल्या सुविधा मिळतील. सर्वांनी सहकार्य करावे.
-त्रिवेणी तुंगार,
नगराध्यक्षा, त्र्यंबकेश्वर नगर परिषद
मंदिर बंद असले, तरी नित्यनियमित पूजा सुरू राहील. सिंहस्थाची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे.
-मनोज थेटे,
अध्यक्ष, त्र्यंबकेश्वर पुरोहित संघ
मंदिर बंद ठेवल्यानंतर कामे वेळेत पूर्ण झाली पाहिजेत. मुदतवाढ घेत राहिल्यास भाविकांमध्ये नाराजी निर्माण होऊ शकते.
-शंकरानंद सरस्वती,
कोशाध्यक्ष, अखिल भारतीय आखाडा परिषद
कुशावर्त तीर्थाजवळील कामे ३१ ऑक्टोबरपर्यंत, तर मंदिर परिसरातील कामे ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
-गोविंद जाधव,
मुख्याधिकारी, त्र्यंबकेश्वर नगर परिषद
भाविकांना प्रसाद विकून चरितार्थ चालतो. मंदिर बंद राहिल्यास व्यवसाय बंद होईल आणि दुसरा व्यवसाय शोधावा लागेल.
-कविता बोके,
प्रसाद विक्रेते H31782
भाविक येणार नसल्याने फुलांची विक्री होणार नाही. हॉटेल व्यवसायालाही फटका बसू शकतो. दर्शन सुरू ठेवून कामे करता येतील का, याचा विचार व्हावा.
-पंढरीनाथ दांडेकर, फूल विक्रेते (H31784)
मंदिर बंद राहिल्यास भाविक येणार नाहीत. त्यामुळे मंदिर खुले होईपर्यंत मजुरी करण्याशिवाय पर्याय राहणार नाही.
-अंबादास धापेकर, गंध सेवेकरी (H31786)
मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय योग्य आहे. कामे पूर्ण झाल्यास भाविकांना चांगल्या सुविधा मिळतील आणि शहराचा चेहरामोहरा बदलेल.
-करिश्मा कोहाड, भाविक, मुंबई ( H31787
मंदिर बंद असल्याची माहिती भाविकांपर्यंत पोहोचली पाहिजे. त्र्यंबकेश्वरला पोहोचल्यानंतर त्यांना कळाले तर त्यातून चुकीचा संदेश जाऊ शकतो.
-प्रमोद महाजन, भाविक, पुणे (H31788)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.