धुळे- नंदुरबार पानासाठी..
--
उभंड ग्रामपंचायतीच्या कारभारात भ्रष्टाचाराचा आरोप
--
राजकीय आरोप- प्रत्यारोपांमुळे ग्रामपंचायतीचा कारभार ऐरणीवर
सकाळ वृत्तसेवा
साक्री, ता. ६ : उभंड (वर्धाने) (ता. साक्री) ग्रामपंचायतीच्या कारभारावरून माजी व विद्यमान पदाधिकाऱ्यांमध्ये आरोप- प्रत्यारोपांची मालिका तीव्र झाली आहे. विद्यमान सरपंच आणि त्यांच्या प्रतिनिधींच्या मनमानी कारभाराबाबत माजी पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांनी गंभीर आक्षेप घेतले आहेत. माजी सरपंच अशोक पाटील, माजी महिला सरपंच विद्या पाटील, संजय पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी साक्री येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी विविध शासकीय आदेश, कागदपत्रे, प्रशासकीय अहवाल आणि पोलिस कारवाईचा हवाला देत विद्यमान सरपंच मोनाली पाटील व त्यांचे प्रतिनिधी योगेश पाटील यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले.
माजी पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार उभंड येथील शासकीय मालमत्ता क्रमांक ५१४, तीन मार्च २०२० ला गावातील जगन माळचे यांच्याकडून नोटरी पद्धतीने बेकायदेशीरपणे खरेदी करण्यात आली. या प्रकरणात सरपंच पती योगेश पाटील यांचा सहभाग असल्याचा दावा करण्यात आला. या पुराव्यांच्या आधारे तत्कालीन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी २१ मार्च २०२४ ला महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५९ मधील तरतुदींनुसार सरपंच मोनाली पाटील यांना अपात्र ठरविण्याचा आदेश दिल्याचा दावा करण्यात आला. तसेच, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय अनुदान आणि घरकुल योजनेच्या लाभाबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले. सरपंचांच्या कुटुंबातील सासू, अविवाहित दीर आणि पती यांच्या नावे शासनाचे घरकुल मंजूर करून आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा आरोप आहे. अपर विभागीय आयुक्त अजय मोरे यांनी ३० सप्टेंबर २०२५ ला संबंधित व्यक्तीच्या अपात्रतेबाबत आदेश दिल्याचे पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले.
याशिवाय ग्रामपंचायतीच्या अखत्यारितील कोंडवाड्याची ४० बाय ५० फुटांची जागा नियमानुसार निर्लेखित न करता पाडण्यात आली. त्या ठिकाणी कुटुंबातील सदस्याच्या नावे पक्के घर बांधण्यात आले आणि सात फूट उंच दगडी भिंती स्वतःच्या शेतात नेल्याचा आरोप आहे. या प्रकरणी ग्रामविकास अधिकारी रोहन सैंदाणे यांनी निजामपूर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल होऊन संशयितास अटक झाल्याचे सांगण्यात आले. विद्यमान सरपंचांना तीन अपत्ये असून, ही बाब लपवून प्रशासनाची दिशाभूल केल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला. दरम्यान, हे आरोप फेटाळून घेत राजकीय विरोधकांवर लक्ष वळवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा प्रतिवाद या प्रकरणातून समोर येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.