ॲंकर
---------
(समर्पक एआय चित्र वापरावे)
-----------
भुसावळ येथे जिल्ह्यातील पहिला ''उमेद मॉल''
--------
बचत गटांमधील महिलांसाठी २० कोटी रुपये निधी खर्चातून होणार उभारणी
सकाळ वृत्तसेवा
भुसावळ, ता. १० : येथे बचत गटातील महिलांना हक्काची बाजारपेठ मिळावी, म्हणून जिल्ह्यातील पहिल्या सुसज्ज व भव्य''उमेद मॉल''ची उभारणी केली जाणार आहे. यासंदर्भात राज्याचे वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे यांच्या प्रयत्नातून हे साध्य झाले आहे. मॉल सुमारे २० कोटी रुपये खर्चून दोन वर्षांत उभारला जाणार आहे.
सध्या वेगवेगळ्या मॉलची उभारणी करून मालविक्री केली जात आहे. जणू मॉल संस्कृती वाढत आहे. जागतिकीकरणामुळे बदलत्या काळाची ती गरजदेखील झाली आहे. एकाच ठिकाणी सर्व वस्तू मिळत असल्याने ग्राहकांनादेखील मॉलमध्ये जाणे सोयीचे वाटते. त्यामुळे बिग बाजार, स्मार्ट बाजार, डिमार्ट आदी मॉल ठिकठिकाणी उभारले जात आहेत. मात्र, यात प्रामुख्याने मोठ-मोठ्या कंपन्यांचे उत्पादन विकले जाते. लहान उत्पादक, बचतगट, स्वयंसहाय्यता समूह यांनी केलेल्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ नव्हती. शहरात वर्षातून एकदा भरणाऱ्या तीन-चार दिवसांच्या प्रदर्शनात वस्तू विकल्या नंतर वर्षभर विक्री कुठे करायची? हा प्रश्न होता. त्यांच्या उत्पादनांसाठी कायमस्वरुपी बाजारपेठ मिळावी, शिवाय महिला सक्षमीकरणाच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल उचलण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. पहिल्या टप्प्यात राज्यातील १३ जिल्ह्यांत ''उमेद मॉल'' उभारण्याचा निर्णय घेतला.
जळगाव जिल्ह्यात पहिला ‘उमेद मॉल’ भुसावळला उभारला जाणार आहे. वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे यांनी याबाबत सातत्याने पाठपुरावा केला होता. या मॉल उभारणीसाठी १९ कोटी ९९ लाख ९९ हजार रुपये खर्चाच्या अंदाजपत्रकीय रक्कमेसह प्रशासकीय मान्यता नुकतीच मिळाली आहे. सुसज्ज अशा या मॉलच्या इमारतीची उभारणी भूमापन क्रमांक १२१/ब (गांधी पुतळ्या समोर, यावल रोड) या जागेवर केली जाणार आहे. इमारत उभारताना दिव्यांगासाठी सुविधा करण्यात येणार आहेत. याबाबत मंत्री सावकारे म्हणाले की, बचतगटांची विविध उत्पादने उदा. हस्तकला, गृहोपयोगी वस्तु, सेंद्रिय खाद्यपदार्थ, पारंपरिक उत्पादने एकाच छताखाली विकण्याची सुविधा ‘उमेद मॉल’मुळे मिळणार आहे. शिवाय ग्रामीण व शहरी महिला बचत गटांनी बनवलेल्या वस्तुंना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी ही हक्काची बाजारपेठ असेल.
---------------
कोट
आम्ही ग्रामीण भागात पापड उद्योग करतो. ''उमेद मॉल'' उभारल्या गेल्यास आमच्या मालाचे शहरात मार्केटिंग करता येईल. रोजगारातही वाढ होईल. त्यातून परिवाराला आर्थिक फायदा मिळू शकेल. आमच्यातला उद्योजकीय आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल.
- वैशाली विलास भोंगळे, अध्यक्षा, महालक्ष्मी महिला स्वयंसहाय्यता समूह,
कुऱ्हा-पानाचे (ता.भुसावळ).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.