(टुडे पान एक मेन लिड) लोगो घ्यावा
--------
जिल्ह्यातील २४ हजार असाक्षरांच्या हाती लेखणी
शिक्षण विभागाचा ‘उल्लास’ उपक्रम; ८१० केंद्रांवर आज परीक्षा
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. २४ : वयाची कोणतीही अट न बाळगता जिल्ह्यातील सहाही तालुक्यांमधून २३ हजार ८३९ असाक्षर नागरिकांची ८१० केंद्रावर आज (ता. २५) परिक्षा होणार आहे. ‘उल्लास’ नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत असाक्षर नागरीकांची पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान विषयक चाचणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही चाचणी म्हणजे केवळ परीक्षा नसून प्रौढांमधील शिक्षणाची ओढ आणि जिद्द जगासमोर आणणारा एक सामाजिक उत्सव आहे. जिल्ह्यातील हा प्रयोग शिक्षण क्षेत्रातील अनोखा आणि प्रेरणादायी उपक्रम ठरणार आहे.
-------
या विशेष परीक्षेमध्ये यावर्षी नव्याने नोंदणी झालेले असाक्षर, यापूर्वी परीक्षा न दिलेले तसेच ‘नीड इम्प्रूव्हमेंट’ असा शेरा मिळालेले परीक्षार्थी सहभागी होणार आहेत. ज्या- ज्या शाळांमधून असाक्षरांची नोंदणी केली आहे. त्याच शाळा त्यांचे परीक्षेचे केंद्र राहणार आहेत. त्यामुळे परिचयाच्या वातावरणातच ही परीक्षा पार पडेल. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जोरदार तयारी केली आहे.
प्रश्नपत्रिका रचना अन् गुणांचे गणित
ही परीक्षा अत्यंत सुटसुटीत आणि मार्गदर्शक स्वरूपाची असून, प्रश्नपत्रिकेत एकूण तीन विभाग असणार आहेत. प्रत्येक विभागाला ५० गुण निश्चित करण्यात आले असून, एकूण १५० गुणांची चाचणी राहील. परीक्षार्थींना प्रत्येक विभागात उत्तीर्ण होण्यासाठी किमान १६.५ गुण मिळवणे आवश्यक आहे. संपूर्ण पत्रिकेसाठी एकूण ४९.५ गुण मिळवणे अनिवार्य केले आहे. कोणाला उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक असलेले गुण मिळाले नाहीत, तर त्यांना ५ वाढीव (ग्रेस) गुण देण्याची सुविधा आहे.
दिव्यांग परीक्षार्थींना अतिरिक्त वेळ
सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत परीक्षार्थी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहतील, तेव्हापासून त्यांना पेपर सोडवण्यासाठी सविस्तर तीन तासांचा अवधी दिला जाईल. दिव्यांग परीक्षार्थींच्या सोयीसाठी एक तास अतिरिक्त वेळ वाढवून देण्यात आला आहे, जेणेकरून त्यांना कोणतीही अडचण येणार नाही. परीक्षा सुरळीत पार पाडावी, यासाठी जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणाधिकारी उर्मिला पारधे यांनी भरारी पथक तयार केले आहे. तालुक्याचे परीक्षा विषयक कामकाज गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या समन्वयातून पार पडेल.
------------
शिक्षणाला वयाचे कोणतेही बंधन नाही, हे या उपक्रमाने साध्य होणार आहे. जिल्ह्यातील असाक्षरांनी कोणताही संकोच न बाळगता परीक्षेत सहभागी होऊन आपले जीवन ज्ञानाच्या प्रकाशाने प्रज्वलित करावे.
- उर्मिला पारधे, शिक्षण अधिकारी (योजना)