वगळलेल्या मतदारांना नावनोंदणीची संधी
‘एसआयआर’ मोहीम : जिल्हाधिकाऱ्यांचे गणनापत्र भरून देण्याचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १२ : विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेंतर्गत अनुपस्थित, स्थलांतरित, मृत तसेच दुबार प्रवर्गात समाविष्ट झालेल्या मतदारांना अंतिम मतदार यादीत नाव नोंदणीसाठी निवडणूक आयोगाने संधी उपलब्ध करून दिली आहे. संबंधित मतदारांनी या संधीचा लाभ घेत गणना प्रपत्र भरून द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.
निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात ‘एसआयआर’ मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात ‘एएसडीडी’ अर्थात, अनुपस्थित, स्थलांतरित, मृत तसेच दुबार मतदारांची नावे प्रशासनाने मतदार यादीतून वगळण्यात आली होती. या मतदारांची एकूण संख्या दहा लाख २७ हजार ८९२ इतकी आहे. या मतदारांची नावे वगळून ३१ ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील पंधराही विधानसभा मतदारसंघांतील प्रारूप याद्यांची प्रसिद्धी करण्यात आली होती. मात्र, आयोगाने आता संबंधित मतदारांना नावनोंदणीची पुनर्संधी उपलब्ध करून दिली आहे.
विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेवेळी एएसडीडी प्रवर्गातील मतदारांना त्यांच्या सध्याच्या सर्वसाधारण रहिवासाच्या ठिकाणी सहायक मतदार नोंदणी अधिकारी अथवा मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे गणना प्रपत्र भरून देता येतील. संबंधित मतदारांची जुनी माहिती भरलेले गणना प्रपत्र प्रणालीद्वारे संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे उपलब्ध होईल. जिल्हा निवडणूक अधिकारी तसेच मतदार नोंदणी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून हे प्रपत्र संबंधित मतदारांपर्यंत प्रत्यक्ष, व्हॉट्सॲप, ई-मेल किंवा एसएमएसद्वारे पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. मतदारांना निवडणूक संकेतस्थळ अथवा ईसीआयनेट प्रणालीवर आपला मतदार ओळखपत्र क्रमांक नोंदवून गणना प्रपत्र डाउनलोड करून ते भरून देण्याची सुविधा उपलब्ध आहे.
येथे याद्या उपलब्ध
एएसडीडी प्रवर्गातील मतदारांची यादी महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या https://ceoelection.maharashtra.gov.in/ceo/ तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या https://nashik.gov.in या अधिकृत संकेतस्थळांवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध झाल्यानंतरही ज्यांना आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करावयाचे आहे, अशा मतदारांनी गणना प्रपत्र भरून ऑनलाइन अथवा ऑफलाइन पद्धतीने संबंधित अधिकाऱ्यांकडे सादर करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.