पान चार
-------------------------
07651
सोनगीर : धुळखात पडलेले वाॅटर एटीएम.
सोनगीरमधील सर्वच ''वॉटर एटीएम'' धूळखात;
थकबाकी, देखभाल-दुरुस्तीच्या अभावाने लाखो रुपये खर्च वाया
सकाळ वृत्तसेवा
सोनगीर, ता. १६ : येथील ग्रामस्थांना स्वच्छ, शुद्ध आणि थंड पिण्याचे पाणी मिळावे या उद्देशाने ग्रामपंचायतीने २०१९ ते २०२१ या कालावधीत तब्बल ४५ लाख रुपये खर्च करून गावात पाच वेगवेगळ्या ठिकाणी ''वॉटर एटीएम'' (आरओ प्लांट) बसवले होते. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून हे सर्वच आरओ प्लांट वीजबिल थकबाकी आणि देखभाल-दुरुस्तीच्या अभावामुळे पूर्णपणे बंद पडले असून सध्या धूळखात पडून आहेत. या एटीएममधून ग्रामस्थांना एक थेंबही पाणी मिळत नसल्याने शासनाचा लाखोंचा निधी अक्षरशः पाण्यात गेल्याचे चित्र आहे.
ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घेत ग्रामपंचायतीने प्रत्येकी सुमारे दहा लाख रुपये खर्चाचे तीन आणि प्रत्येकी साडेसात लाख रुपये खर्चाचे दोन, असे एकूण पाच आरओ यंत्रे गावात कार्यान्वित केली होती. या माध्यमातून नागरिकांना पाच रुपयांत २० लिटर शुद्ध व थंड पाणी मिळू लागल्याने सुरुवातीच्या काळात पाणी घेण्यासाठी नागरिकांच्या मोठ्या रांगा लागत होत्या. गावातील ग्रामपंचायत कार्यालयाजवळ, बसस्थानकाजवळ, वीर एकलव्य चौक, सोमेश्वर नगर आणि मरीआई चौक या पाच प्रमुख ठिकाणी ही यंत्रणा उभारण्यात आली होती. परंतु, ही बंद पडलेली यंत्रणा पुन्हा सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतीने कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही. मध्यंतरी ग्रामपंचायतीने ही यंत्रणा स्वतः चालविण्याची जबाबदारी घेतली होती; परंतु प्रशासकीय अनास्थेमुळे ते प्रयत्नही अपयशी ठरले. सध्या गावातील पाचही वॉटर एटीएम पूर्णपणे धूळखात पडून आहेत.
----------
ठेका पद्धतीचे नियोजन फसले; यंत्रणा केवळ देखावा
या पाणी शुद्धीकरण यंत्रांचे (आरओ) संचलन, नियमित देखभाल आणि वीजबिलाचा खर्च भागविण्यासाठी ग्रामपंचायतीकडून ठेका पद्धतीचा अवलंब करण्यात आला होता. त्यासाठी रीतसर लिलाव प्रक्रिया राबवून सर्वाधिक बोली लावणाऱ्यांना ठेका देण्यात आला. मात्र, या व्यवसायात अपेक्षित आर्थिक फायदा होत नसल्याचे कारण देत संबंधित ठेकेदारांनी आरओ प्लांटचे वीजबिल भरलेच नाही. परिणामी, वीजपुरवठा खंडित होऊन ही वॉटर एटीएम बंद पडली.
वीजबिल थकबाकीमुळे वॉटर एटीएम बंद पडले आहेत. आता ही यंत्रणा पुन्हा सुरू करणे अत्यंत खर्चिक असून, त्यासाठी प्रत्येकी किमान तीन लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे प्रथम ग्रामपंचायत कार्यालयाजवळील वॉटर एटीएम सुरू करण्यात येईल आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने उर्वरित सर्व एटीएम कार्यान्वित केले जातील.
- मेघश्याम बोरसे, ग्रामपंचायत अधिकारी, सोनगीर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.