पान-२ अँकर
फोटो ओळ : 09825
जुनी भेंडी (ता. कळवण) : ऑक्टोबरमध्येच कोरडा पडलेला पाझर तलाव.
जुनी भेंडीचा पाझर तलाव ऑक्टोबरमध्येच कोरडा
तलावाची दुरुस्ती, जलसंधारणाच्या उपाययोजनांची गरज
कळवण, ता. २७ : साधारणपणे डिसेंबर-जानेवारीपर्यंत पाणी टिकणारा जुनी भेंडी येथील पाझर तलाव यंदा ऑक्टोबरमध्येच कोरडा पडल्याने शेतकरी व पशुपालकांची चिंता वाढली आहे. विहिरींची पाणीपातळीही घटत असल्याने रब्बी पिकांच्या सिंचनासह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित विभागाने तलावाची पाहणी करून आवश्यक दुरुस्ती व पाणीसाठवण क्षमता वाढविण्याच्या उपाययोजना हाती घेण्याची गरज आहे.
कळवण तालुक्यात यंदा पावसाने ओढ दिल्याने जलस्रोतांमध्ये पुरेसा पाणीसाठा झालेला नाही. जुनी भेंडी परिसरातील पाझर तलावासह ओहळ, नाले व लहान पाणवठे आटू लागले आहेत. दर वर्षीच्या तुलनेत दोन ते तीन महिने आधीच तलाव कोरडा पडल्याने आगामी काळातील पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती व्यक्त होत आहे.
परिसरात हंगामी स्थलांतर करणारे मेंढपाळ मोठ्या प्रमाणावर दाखल होतात. स्थानिक शेळीपालक, आदिवासी कुटुंबे व दुग्धव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांनाही जनावरांसाठी रोज पाण्याची गरज असते. तलावातील साठा संपल्याने पशुधनासाठी पर्यायी पाण्याची व्यवस्था करण्याचे आव्हान आहे. त्यातच चाऱ्याची उपलब्धता कमी होऊ लागल्याने पशुपालकांच्या अडचणी वाढल्या आहेत.
पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पाझर तलावाच्या स्थितीची तांत्रिक पाहणी आवश्यक असून, बांध, सांडवा व पाणी येण्याच्या मार्गांची दुरुस्ती करावी. तसेच तलाव लवकर कोरडा पडण्याची कारणे तपासून पावसाळ्यापूर्वी उपाययोजना पूर्ण कराव्यात. तातडीच्या काळात पशुधनासाठी पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था करण्याकडेही प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
.........
चौकट
रब्बीच्या आशेवरही पाणी
पावसाच्या अनिश्चिततेचा खरिपांना फटका बसल्यानंतर शेतकऱ्यांची भिस्त रब्बी हंगामावर होती. मात्र, तलाव कोरडा पडल्याने आणि विहिरींची पाणीपातळी घटल्याने गहू, हरभरा व इतर पिकांच्या पेरणीसह पुढील सिंचनाचे नियोजन अडचणीत आले आहे. उपलब्ध पाण्यात पिके जगवायची की जनावरांची गरज भागवायची, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.
.............
कोट
पाझर तलावात डिसेंबर-जानेवारीपर्यंत पाणी टिकायचे; मात्र यंदा ऑक्टोबरमध्येच तलाव कोरडा पडला असून, विहिरींची पातळीही कमी होत असल्याने रब्बी धोक्यात आला आहे. जनावरांसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध ठेवणेही कठीण होत आहे.
- पोपट रौंदळ, शेतकरी, भेंडी
..........
कोट
परिसरात मोठ्या प्रमाणावर मेंढपाळ दाखल होतात. स्थानिक पशुपालक व शेळीपालन करणाऱ्या आदिवासी कुटुंबांनाही पशुधनासाठी रोज पाणी लागते. तलाव आणि पाणवठे कोरडे पडल्याने पुढील काळात पाणी आणायचे कुठून, याची चिंता आहे.
- निखिल रौंदळ, भेंडी
.............
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.