टुडे एक : मेन फिचर (शहर - जिल्हा कॉमन)
लोगो : सकाळ बातमीचा परिणाम
----
NSK26H34647
जळगाव : कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत सूचना देताना पालकमंत्री गुलाबराव पाटील. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे आदी.
------
‘गिरणा’तून शेतीसाठी एक, पिण्यासाठी तीन आवर्तने
पालकमंत्री पाटील : कालवा समितीच्या बैठकीत भविष्यातील पाणीटंचाईचे नियोजन
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ६ : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देतानाच शेतकऱ्यांच्या पिकांचे संरक्षण करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे आगामी उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याचा आवश्यक साठा सुरक्षित ठेवून गिरणा प्रकल्पातून पिण्याच्या पाण्यासाठी व औद्योगिक वापरासाठी तीन बिगरसिंचन आवर्तने, तर शेतकऱ्यांच्या हितासाठी एक सिंचन आवर्तन सोडण्याचे नियोजन करावे, अशा सूचना पालकमंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
जिल्ह्यातील मोठ्या, मध्यम व लघु प्रकल्पांच्या पाणी नियोजनासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती कक्षात जलसंपदामंत्री महाजन यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीची बैठक आज झाली. या बैठकीत गिरणा प्रकल्पासह जिल्ह्यातील विविध प्रकल्पांचा उपलब्ध पाणीसाठा, पिण्याच्या पाण्याचे आरक्षण, औद्योगिक गरजा, सिंचनाचे नियोजन आणि कालव्यांच्या सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
धरणातील यंदा किती पाणी आवर्तन सोडणार याबाबत आज (ता. ६) ‘रब्बीसाठी पाणी आवर्तनाची आस’ अशा आशयाचे वृत्त ‘सकाळ’ने दिले होते. त्याचा आधार घेत हे आरक्षण ठरविण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
पालकमंत्री पाटील म्हणाले, की दुष्काळाच्या काळात उपलब्ध पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा आहे. नागरिकांना पाणीटंचाई भासू नये आणि शेतकऱ्यांच्या पिकांनाही आवश्यक सिंचनाचा आधार मिळावा, यासाठी दूरदृष्टीने नियोजन करणे गरजेचे आहे. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देतानाच शेतकऱ्यांच्या हिताकडे दुर्लक्ष होता कामा नये. त्यासाठी तीन बिगरसिंचन व एक सिंचन आवर्तनाचे नियोजन करून जिल्हाधिकारी आणि जलसंपदा विभागाने समन्वयाने कार्यवाही करावी.
काटेकोर नियोजन करा
जलसंपदामंत्री महाजन म्हणाले की, केवळ सध्याची पाण्याची उपलब्धता पाहून निर्णय न घेता आगामी उन्हाळ्यात उद्भवू शकणाऱ्या पाणीटंचाईचा विचार करून आतापासूनच नियोजन करणे आवश्यक आहे. पिण्याचे पाणी, शेती आणि औद्योगिक गरजा यांचा समतोल राखून उपलब्ध जलसाठ्याचे योग्य वितरण करावे. संभाव्य टंचाईग्रस्त भागांचा आढावा घेऊन आवश्यक उपाययोजना हाती घ्याव्यात. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी प्रभावी नियंत्रण ठेवावे.
दीपनगर पाइपलाइनचे अपूर्ण पूर्ण करा
ओझर-टाकरखेडा ते दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रापर्यंतच्या पाइपलाइनचे सुमारे तीन किलोमीटरचे काम अद्याप अपूर्ण असून, ते तातडीने पूर्ण करण्याची मागणी वस्त्रोद्योग मंत्री सावकारे यांनी बैठकीत केली. त्यावर जलसंपदामंत्री महाजन व पालकमंत्री पाटील यांनी संबंधित यंत्रणेला तात्काळ कार्यवाहीचे निर्देश दिले. लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता संतोष भोसले यांनी पाणी नियोजनाबाबत सविस्तर सादरीकरण केले. जळगाव पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता गोकुळ महाजन यांनी जिल्ह्यातील उर्वरित प्रकल्पांची सद्यस्थिती व त्यासंबंधीची सविस्तर माहिती दिली.
यांची होती उपस्थिती
आमदार नंदकिशोर महाजन, आमदार अमोल पाटील, आमदार किशोर पाटील, धुळे ग्रामीणचे आमदार राम भदाणे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण, जळगाव महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर, लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता संतोष भोसले, जळगाव, गिरणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद पाटील, पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता आदिती कुलकर्णी, उत्तम दाभाळे, सहाय्यक अभियंता वैष्णवी तोडकरी, उपविभागीय अधिकारी सुभाष चव्हाण, विजय जाधव, के. आर. पाटील, एस. जी. चौधरी, पी. एम. पाटील, अशासकीय सदस्य प्रशांत पवार यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
-----
चौकट.
पाटचाऱ्यांच्या दुरुस्तीला प्राधान्य
गिरणा कालव्याच्या माध्यमातून अधिकाधिक शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ मिळण्यासाठी पाणी वितरण व्यवस्था सक्षम करणे आवश्यक असल्याचे सांगत पालकमंत्री पाटील यांनी कालव्यावरील सर्व पाटचाऱ्या व वितरिकांची पाहणी करून आवश्यक दुरुस्तीचे प्रस्ताव तात्काळ सादर करण्याचे निर्देश दिले.
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.