फळबागांना हवामानाचा ‘विमा’कवच
फार्मर आयडी अनिवार्य; काजू, केळी, द्राक्षांसह सात फळपिकांचा समावेश
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ६ : हवामान आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यात आंबिया बहारातील काजू, केळी, द्राक्ष, आंबा, स्ट्रॉबेरी, डाळिंब व मोसंबी या सात फळपिकांचा समावेश करण्यात आला आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी करावी लागणार असून, ॲग्रीस्टॅकअंतर्गत शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) बंधनकारक करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी दिली.
कमी पाऊस, पावसाचा खंड, वाढते तापमान आणि सापेक्ष आर्द्रता यांसारख्या हवामान धोक्यांपासून फळपिकांचे संरक्षण करण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी आधारकार्ड, सातबारा उतारा, फळबागेचा अक्षांश व रेखांशासह फोटो आणि बँक पासबुकची प्रत आदी कागदपत्रे आवश्यक आहेत.
फळपीक विमा योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणीमध्ये संबंधित पिकाची नोंद करणेही आवश्यक आहे. ई-पीक पाहणीतील नोंद आणि विमा उतरविलेले पीक यामध्ये विसंगती आढळल्यास विमा अर्ज रद्द होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रथम ॲग्रीस्टॅकअंतर्गत फार्मर आयडी काढून, त्यानंतर विमा योजनेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन माने यांनी केले आहे.
फळपिकनिहाय विमा व अंतिम मुदत
- काजू : विमा संरक्षित रक्कम हेक्टरी १ लाख २० हजार रुपये; शेतकरी हिस्सा ९ हजार रुपये. अंतिम मुदत : ३० नोव्हेंबर.
- केळी : विमा संरक्षित रक्कम हेक्टरी १ लाख ७० हजार रुपये; शेतकरी हिस्सा ८ हजार ५०० रुपये. अंतिम मुदत : ३१ ऑक्टोबर.
- द्राक्ष : विमा संरक्षित रक्कम हेक्टरी ३ लाख ८० हजार रुपये; शेतकरी हिस्सा १९ हजार रुपये. अंतिम मुदत : १५ ऑक्टोबर.
- आंबा : विमा संरक्षित रक्कम हेक्टरी १ लाख ७० हजार रुपये; शेतकरी हिस्सा ८ हजार ५०० रुपये. अंतिम मुदत : ३१ डिसेंबर.
- स्ट्रॉबेरी : विमा संरक्षित रक्कम हेक्टरी २ लाख ४० हजार रुपये; शेतकरी हिस्सा १२ हजार रुपये. अंतिम मुदत : १४ ऑक्टोबर.
- डाळिंब : विमा संरक्षित रक्कम हेक्टरी १ लाख ६० हजार रुपये; शेतकरी हिस्सा १२ हजार रुपये. अंतिम मुदत : १४ जानेवारी २०२७.
- मोसंबी : विमा संरक्षित रक्कम हेक्टरी १ लाख रुपये; शेतकरी हिस्सा ५ हजार रुपये. अंतिम मुदत : ३१ ऑक्टोबर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.