धुळे : टुडे पान २ साठी..
--
विकसित भारताचे स्वप्न युवतींशिवाय अशक्य
--
शालिनी वर्मा : ‘अभाविप’चे अग्निशिखा युवती संमेलन
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १७ : विकसित भारताचे स्वप्न युवतींच्या सहभागाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. आजची युवती केवळ लाभार्थी नसून ती राष्ट्रनिर्मितीची खंबीर भागीदार आहे. शिक्षण, तंत्रज्ञान आणि नेतृत्व या तीन क्षेत्रांत युवतींनी आघाडी घेतली, तर भारत नक्कीच जगाचे नेतृत्व करेल, असे प्रतिपादन ‘अभाविप’च्या केंद्रीय कार्यसमिती सदस्य शालिनी वर्मा यांनी केले.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जिल्ह्यातर्फे जिजामाता कन्या विद्यालयात झालेल्या अग्निशिखा- युवती संमेलन प्रसंगी श्रीमती शर्मा बोलत होत्या. उपशिक्षणाधिकारी प्रतिभा ठाकूर, डॉ. किर्ती ठाकरे, स्वागत समिती अध्यक्ष प्राचार्य अपर्णा पाटील, संमेलन प्रमुख अनन्या याज्ञिक उपस्थित होत्या.
उपशिक्षणाधिकारी ठाकूर म्हणाल्या, की शिक्षण हे सक्षमीकरणाचे मुख्य हत्यार असून राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० ने मुलींसाठी नवी दालने उघडली आहेत. द्वितीय सत्रात डॉ. उज्ज्वला घुमरे यांनी आरोग्यावर, भविता देवरे यांनी उद्योजकतेवर, तर गायत्री चव्हाण यांनी सोशल मीडियाच्या वापराबाबत मार्गदर्शन केले. या वेळी सांस्कृतिक कार्यक्रमही झाले. प्राचार्य पाटील यांनी प्रास्ताविक केले. अनन्या याज्ञिक यांनी आभार मानले. अनन्या राऊतमारे, भक्ती अहिरे, कोमल कुलकर्णी, कार्तिकी ठाकूर, कृपा करंकाळ, हेमानी पाटील, साक्षी शिरसाठ, लहानु कोळेकर, मनिष भोसले यांनी संयोजन केले.