पान एक
---------------------
27570
येवला : शहरातील अतिक्रमणे हटविताना पालिका, पोलिस आणि सार्वजनिक बांधकाम विभाग.
येवल्यात महामार्गावरील अतिक्रमणावर हातोडा
ओटे, शेड तसेच पक्के बांधकामावर फिरवला बुलडोझर
सकाळ वृत्तसेवा
येवला, ता.१८ : येथील विंचूर चौफुली परिसरात वाढलेल्या अतिक्रमणाने सातत्याने होणारी वाहतूक कोंडी तसेच महामार्गाचे रुंदीकरणामुळे बुधवारी (ता.१८) नगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने पोलिस बंदोबस्तात ४० वर अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली.
शहरातून जाणाऱ्या नगर - मनमाड आणि नाशिक - संभाजीनगर महामार्गावर होणारी प्रशासनाने संयुक्त अतिक्रमण हटवण्यासाठी साडेचार तास मोहीम राबवत सुमारे ४० अतिक्रमणे हटवली.
नगर-मनमाड आणि येवला-नाशिक राज्य मार्गावर सातत्याने अतिक्रमणे होत असल्याने वाहतूक आणि नागरिकांना या अतिक्रमणाचा त्रास होऊन वाहतूक कोंडीही नित्याची झाली होती. त्यामुळे बुधवारी सकाळी पालिका प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम आणि पोलीस प्रशासनाला सोबत घेत अतिक्रमण हटाव मोहीम राबवली. विंचूर चौफुली ते शिवसृष्टी या मार्गावरील रस्त्याच्या दुतर्फा असलेली सुमारे ३० अतिक्रमणे हटविण्यात आली तर बसस्थानक ते विंचूर चौफुली या मार्गावर सातत्याने वाहतूक कोंडी होत असल्याने या मार्गावरील १० ते १५ अतिक्रमण हटवली. हा मार्ग वाहतुकीसाठी सुरळीत व मोकळा करण्याच्या दृष्टीने विशेष कारवाई करण्यात आली.
शहरातील बसस्थानक ते विंचूर चौफुली हा अत्यंत वर्दळीचा मार्ग असून या परिसरात दुकानदारांचे अतिक्रमण, रस्त्यालगत लावण्यात येणारी वाहने तसेच इतर अडथळ्यांमुळे नागरिकांना आणि वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता.या संयुक्त कारवाईमुळे रस्त्यावरील अडथळे दूर करून वाहतुकीसाठी अधिक जागा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला.शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी, पादचाऱ्यांना सुरक्षितपणे मार्गक्रमण करता यावे तसेच आपत्कालीन वाहनांना अडथळ्याविना मार्ग उपलब्ध व्हावा, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.
पालिका मुख्याधिकारी तुषार आहेर, पोलीस निरीक्षक संदीप मंडलीक आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता यांच्या नेतृत्वाखाली पालिकेचे ४० कर्मचारी, ३० पोलीस आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे १० कर्मचारी, २ जेसीबी ,३ ट्रॅक्टर मोहिमेत सामील झाले होते. मोठ्या प्रमाणात पोलिस असल्याने मोहीम यशस्वीपणे पार पडली.
-------------
अनेकदा अतिक्रमण हटाव मोहीम राबवूनही नगर -मनमाड आणि येवला-नाशिक मार्गावर विंचूर चौफुलीपासून व्यावसायिक फुटपाथच्या बाहेर येऊन अतिक्रमण करत आहे. यामुळे वाहतुकीला अडथळा होऊन कोंडी होत आहे. त्यामुळे अतिक्रमण हटाव मोहीम राबवत कच्चे व पक्के बांधकामे जमीनदोस्त केली आहे. यानंतर व्यावसायिकांनी पुन्हा अतिक्रमणे केल्यास कायदेशीर कारवाई संबंधितांवर केली जाईल.
- तुषार आहेर, मुख्याधिकारी, येवला नगरपरिषद
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.