kite festival
kite festival  esakal
नाशिक

Kite Festival : मला येड लावलंय, लावलंय... पतंगोत्सवाने म्हणत येवलेकर पतंगोत्सवात दंग!

संतोष विंचू

येवला (जि. नाशिक) : ‘मला येड लावलंय... लावलंय’, ‘उडी-उडी जाये दिल की पतंग उडी-उडी जाय,’ ‘हाई झुमका वाली पोरं...’ या तरुणाईला वेड लावणाऱ्या आधुनिक गीतांपासून ते थेट डीजे, संबळ आणि हलकडीच्या निनादात वाजणाऱ्या संगीताच्या तालावर रविवारी (ता. १५) येवलेकारांनी पतंगाला आकाशात उंच भरारी देत अगदी वेडे होऊन पतंगोत्सवाची धूम लुटली.

रस्ते निर्मनुष्य, गच्च्या फुल अन् आकाश सप्तरंगी... जोडीला वकाट...रेऽऽ, कटी रेऽऽकटी...’च्या घोषणांनी दुमदुमून गेलेले आसमंत, नूर फुलविणारी डीजेची साद... गाण्यांचा सुमधुर आवाज... काटाकाटीचा रंगलेला खेळ आणि आकाशात सजलेली सप्तरंगी पतंगाची यात्रा... डोळे भरून पाहावे व साठवावे इतक्या उत्साहात पतंगनगरीने रविवारी पतंगाला ढील देत २५० वर्षाच्या परंपरेला खांद्यावर घेऊन जल्लोष केला. (Yeola kite festival on makar sankranti festival nashik news)

सर्वत्र आनंददायक, उत्साहवर्धक वातावरणात निळ्याशार आकाशात क्षितिजापर्यंत विविधरंगी लहान-मोठ्या पतंगांनी सजलेले मनमोहक दृश्य शहराच्या आकाशात रविवारी दिसले. लहान मुले, युवक, मध्यमवयीन व वृद्धासह महिलाही मोठ्या उत्साहाने पतंग उडवत होत्या.

जिकडे पाहावे तिकडे घरे अन् इमारतींच्या फुललेल्या गच्ची... कुठे नव्या-जुन्या चित्रपट गीतांसह रिमिक्स गाणी, तर कुठे डीजेचा खणखणाट अशा अगदी उत्साहवर्धक वातावरणात येवलेकर पतंग शौकिनांनी पतंगबाजी केली.

२५० वर वर्षाच्या परंपरेला अहमदाबाद, सुरतपाठोपाठ येवला शहराने साद घातली. मकरसंक्रांतीसह भोगी व कर हे तीन दिवस जणू मंतरलेलेच असतात. या तीनही दिवशी रस्ते निर्मनुष्य... कामाला सुटी... तहान-भूक विसरून घरांच्या गच्च्या फुल्ल अन् आकाश सप्तरंगी पतंगांनी गजबजून गेलेले असते.

आज सकाळी सूर्यदेवाचे आगमन अन शौकिनाचा गच्चीवरील उत्साह सोबतच सुरू झाला. सकाळी ढगाळ वातवरण व हवा कमी होती; पण हळूहळू ऊन पडत गेले, वारे सुटत गेले अन् पतंगांच्या खेळात अधिक रंग भरला.

प्रसिद्ध हलकडी, ढोल-ताशांच्या गजरात पतंगप्रेमी पतंग उडवत होते. मात्र यापेक्षा शहरभर प्रत्येक गच्चीवर चित्रपटांची गाणे मोठ-मोठे साऊंड सिस्टिम लावून वाजले पतंग उत्साहाला अधिक आनंद भरला.

डोळेदार, गोंडेदार, पट्टेदार, अंडेदार, ढेकूण आदी नानाविविध प्रकारातील अन् अर्धीचा, पाऊणचा, सव्वाचा, आण्णाढोल अशा आकारातील रंगीबेरंगी पतंगांनी येथील अवघं आकाश व्यापून गेले होते.

रविवारची सुटी असल्याने शौकिन दिवसभर तहान-भूक विसरून गच्चीवर पतंग उडवत होते. सकाळी सहाला सुरू झालेल्या या उत्सवाची धूम दिवस मावळला, तरी सुरूच होती. शहर पतंगोत्सवात मग्न असल्याने दुपारनंतर जणू संचारबंदी सारखेच गल्लोगल्ली वातावरण होते.

डोळ्यांना रंगीबेरंगी आकर्षक गॉगल, हातात मांजापासून सुरक्षेसाठी घातलेली मोजे, डोक्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या हॅट्स-कॅप्स, आकर्षक कपडे घालून येवलेकरांनी पतंगोत्सवासाठी गच्च्यांवर गर्दी केली. येथील पतंगोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी अर्ध्याहून अधिक येवलेकरांकडे राज्यभरातून पाहुणे आले होते.

■ फक्त जल्लोष काटाकाटीचा..!

पतंग उडविण्यासाठी गच्च्या फुल होत्या, पतंगाला गगनभरारी देताना खेळ रंगला.. ‘बढाव बढाव.... दे ढील, अरे दे ढील...ढील दे देरे भय्या’ असा आव्हानात्मक सूर गुंजताना पतंग काटाकाटीची स्पर्धाच रंगली होती. आपल्या मांजाने स्पर्धकाचा पतंग कापला की पतंगप्रेमी ‘वकाट...ऽरेऽऽ, कटी रेऽऽकटी...वकाट वकाट’च्या आवाजाने असमान निनादत होते.

पतंग कापल्यानंतर पतंगप्रेमींचा उत्साह ओसंडून वाहताना दिसला. युवक-पुरुषांसोबत महिला व युवतीनी देखील सहभागी होऊन या उत्सवाचा आनंद अधिकच द्विगुणीत केला. विशेष म्हणजे तुटून पडलेला पतंग मिळवण्याची देखील जणू स्पर्धाच ठिकठिकाणी लागली होती.

हेही वाचा : सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

■ हवेने काढली हवा!

आसारीवरील मांजासरशी पतंगाला आकाशात उंचच उंच नेणारा साथीदार म्हणजे वारा..रविवारी दिवसभरात अधुनमधून लहरी वाऱ्याने निराशा केली तरी वारे येताच मोठया उत्साहाने पतंगशौकीन आनंद लुटत होते.दुपारनंतर हवेने साथ दिल्याने दिवस मावळतीला गेल्यावरही उशिरापर्यंत शौकीन गच्चीवरच ठाण मांडून होते

■ पंकज भुजबळांनी धरला ठेका!

देशात प्रसिद्ध ठरलेल्या शहरात आज पाहुणे देखील मोठ्या प्रमाणावर आले होते. शहरातील तीनदिवसीय या पतंगोत्सवाचा सोमवारी (ता. १६) करीच्या शेवटच्या दिवशी समारोप होणार आहे. माजी मंत्री छगन भुजबळ यांचे पुत्र माजी आमदार पंकज भुजबळ यांनी रविवारी येवल्यात भेट देत पतंग उडविण्याचा आनंद घेतला. संत नामदेव व्यायामशाळेच्या छतावर तसेच विशाल परदेशी यांच्याही घराच्या छतावर त्यांनी पतंग उडवताना ठेका धरत नृत्यही केले.

या वेळी भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे, संतोष खैरनार, दीपक लोणारी, सुमित थोरात, प्रवीण पहिलवान, सुहास भांबारे आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: वादळी वाऱ्यामुळे लोणी-काळभोरमध्ये बँड पथकावर होर्डिंग कोसळलं, घोडा गंभीर जखमी

IPL 2024 RCB vs CSK Live Score: बेंगळुरू चेन्नई प्लेऑफच्या एका जागेसाठी भिडणार, पण पावसाचे अंदाज काय?

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Virat Kohli: भारतीय संघात संधी मिळण्यासाठी रैनाची कशी झाली मदत? विराटनं सांगितली 16 वर्षांपूर्वीची आठवण

Lok Sabha Election 2024 : पंतप्रधान मोदींनी रायबरेली, अमेठीत प्रचार करणे टाळले, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT