Dhule Recruitment News : येथील चक्करबर्डीतील श्री भाऊसाहेब हिरे वैद्यकीय शासकीय महाविद्यालय आणि संलग्न जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात वर्ग चार संवर्गाची १३७ पदे रिक्त आहेत.
त्यासाठी शासनाने जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत जिल्हा निवड समिती स्थापन केली आहे. तीने मान्यता दिलेल्या कंपनीशी गोपनीय कराराची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. (Recruitment of 137 vacant posts in District Hospital dhule news)
यासंदर्भात करारनाम्याची प्रत, जाहीर प्रकटनासंबंधी नमुना, संकेतस्थळासाठी जाहीर प्रकटनाचा नमुना आणि पदभरतीची माहिती पुस्तिका शासनास पाठविण्यात आली आहे. पदभरती प्रक्रिया लवकर होण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. अरूण मोरे यांनी दिली.
ते म्हणाले, की हिरे महाविद्यालयासह संलग्न सर्वोपचार रुग्णालय सेवेसाठी तत्पर असते. यात १ जानेवारी ते ३० सप्टेंबर या कालावधीत दोन लाख २८ हजार ५३० बाह्यरुग्ण, तर ३३ हजार ७७२ आंतररुग्णावर उपचार केले आहेत. तसेच ४ हजार २२९ महत्त्वाच्या शस्त्रक्रिया, तीन हजार २५६ किरकोळ शस्त्रक्रिया, तसेच सहा हजार ६८३ रुग्णांची प्रसूती झाली आहे. त्यात २ हजार ३७७ सिझेरियन शस्त्रक्रियांचाही समावेश आहे.
जलद निविदा प्रक्रिया
जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी २५ ऑगस्टला रुग्णालयात पुरेसा औषधसाठा, साधनसामग्री, वस्तूंसाठी रसायने व किट्ससाठी तसेच ऑक्सिजनसाठी चोवीस तासांत जिल्हा नियोजन समितीमार्फत पाच कोटी दहा लाखांच्या निधीस प्रशासकीय मान्यता प्रदान केली.
याअनुषंगाने निविदा प्रक्रिया अंतिम टप्यात असून औषधी व अनुषंगिक बाबींचे पुरवठा आदेश दहा दिवसांत नोदविण्यात येतील. या बाबी पुढील नऊ महिन्यांसाठी उपलब्ध होणार आहेत. औषधे सर्वकाळ उपलब्ध राहतील याची खबरदारी रुग्णालय व्यवस्थापनाकडून घेतली जात आहे.
रुग्णालयावर भार
श्री भाऊसाहेब हिरे वैद्यकीय शासकीय महाविद्यालय आणि जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात केवळ धुळे जिल्ह्यातीलच नव्हे तर सभोवतालच्या जळगाव, नाशिक, नंदुरबार तसेच गुजरात, मध्य प्रदेश या राज्यांच्या सीमेवरील रुग्ण औषधोपचारासाठी दाखल होत असतात.
तसेच मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्ग, इंदूर- पुणे राष्ट्रीय महामार्ग, सोलापूर- धुळे राज्य महामार्ग शहरातून जात असल्यामुळे परिसरातील अपघातांचे रुग्णही या रुग्णालयात दाखल होतात. असा भार असूनही रुग्णालय व्यवस्थापन यथाशक्ती रूग्णसेवेस तत्पर असते.
औषधसाठा उपलब्ध
१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीत बाह्यरुग्ण संख्या दोन लाख २० हजार ४७९, आंतररुग्ण संख्या ४१ हजार ७६४, महत्त्वाच्या शस्त्रक्रियांची संख्या पाच हजार ८३३, किरकोळ शस्त्रक्रिया तीन हजार २३७, एकूण प्रसूती आठ हजार ९३७, त्यातील सिझेरियन शस्त्रक्रिया दोन हजार ९६७ या संख्येने करण्यात आली आहे. सर्वोपचार रुग्णालयाच्या मध्यवर्ती औषधी भांडारात ४८६ प्रकारची विविध औषधी उपलब्ध आहेत, असे डॉ. मोरे यांनी सांगितले.
६५० रुग्णखाटा, ५२ कामगार
जिल्हा रूग्णालयात सद्यःस्थितीत केवळ ५२ सफाई कामगार हे तीन पाळीमध्ये स्वच्छतेत गुंतलेले असतात. ते रुग्णकक्ष, अपघात विभाग, बाह्यरुग्ण विभाग, अतिदक्षता कक्ष व शवविच्छेदनगृह येथे स्वच्छतेसाठी उपलब्ध असतात. अशा उपलब्ध मनुष्यबळाद्वारे स्वच्छतेचे कामकाज केले जाते.
शिवाय केवळ १२ सफाई कर्मचारी हे कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असून त्यांच्याद्वारे रुग्णालयातील पॅसेज व बाह्यपरिसराची स्वच्छता केली जाते. तसेच पाच सफाई कर्मचारी हे प्रसूती कक्षामध्ये रुग्णसेवेसाठी उपलब्ध करून दिले आहेत. सफाई कर्मचारी एकूण ६५० रुग्णखाटांच्या स्वच्छतेचे प्रयत्नपूर्वक कामकाज करतात, असेही डॉ. मोरे यांनी नमूद केले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.