Girish-and-Suresh
Girish-and-Suresh 
उत्तर महाराष्ट्र

Vidhansabha 2019 : महाजन-जैनांच्या आणाभाका... औपचारिकताच

सचिन जोशी

जिल्ह्यातील युतीच्या दोन्ही नेत्यांनी शनिवारी कुणीही उमेदवार दिला तरी एकमेकांसाठी काम करण्याच्या आणाभाका मेहरुण तलावाच्या साक्षीने घेतल्या. आता वरतून ‘आमचं ठरलंय..’ म्हणून कितीही आवई उठवली जात असली, तरी प्रत्यक्षात भाजप-सेनेनं राज्यभर सुरू केलेली तयारी बघता ‘आमचं काही ठरलं-बिरलं नाही.. उलट बिघडलंय..’ असं चित्रंही पुढं येऊ शकतं.. अशावेळी एकमेकांविरोधात मैदानात उतरण्याची वेळ आलीच तर किंवा तरीही महाजन- जैन आपल्या आणाभाकांना जागतील काय?

दोन वेगवेगळ्या पक्षांचे दिग्गज एखाद्या कार्यक्रमात एकत्र आले तर राजकीय चर्चा रंगणं, हे स्वाभाविक आहे. अशात पावसानं चिंब केलेल्या वातावरणात, मेहरुण तलावाच्या रम्य चौपाटीवर गरमागरम भजींचा आस्वाद सोबतीला असला तर ही चर्चा भजींसारखीच अधिक खमंग होणार, हेदेखील नक्की. शनिवारी मेहरुणच्या चौपाटीवर आयोजित भजी महोत्सवात नेमकं तेच झालं. जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन आणि शिवसेना नेते, माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी या महोत्सवात एकमेकांना भजी भरवत भाजप-सेना युती होणार असल्याची ग्वाही दिली. एवढ्यावरच हे नेते थांबले नाहीत, तर उमेदवार कुणीही असो एकमेकांचे काम करण्याच्या आणाभाकाही घेतल्या. 

पाच वर्षे सरकारला व पर्यायाने भाजपलाही ‘शिवसेना स्टाइल’ ठोकल्यानंतर लोकसभेला युतीने मिळविलेल्या घवघवीत यशाने सेना-भाजप हे दोन्ही पक्ष हुरळून गेलेत, हे वेगळे सांगायला नको. गेल्या दीड-दोन महिन्यांपासूनच मुख्यमंत्री आणि सेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ‘आमचं ठरलंय..’ असं राज्यभर सांगत फिरताहेत. त्यातून महाजन आणि जैन हे युतीची ग्वाही देत असतील, तर तेदेखील स्वाभाविक आहे. परंतु, एकीकडे ‘ठरलंय..’ असे सांगितले जात असले तरी राज्यातील सर्वच २८८ मतदारसंघांमध्ये महाजनादेश यात्रा नेण्याची निकड मुख्यमंत्र्यांना का भासावी? आणि उद्धव ठाकरेंनाही ‘जनआशीर्वाद’ मिळविण्यासाठी शिवसेनेसह भाजपच्या ताब्यातील मतदारसंघांमध्ये दौऱ्याचे नियोजन का करावेसे वाटले? या दोन भिन्न प्रश्‍नांचे उत्तर कदाचित ‘आमच्यात बिघडलंय.. म्हणून ही स्वबळाची तयारी’ असे कदाचित होऊ शकते. 

...आणि अशा अनिश्‍चिततेच्या वातावरणात महाजन- जैन परवा एकत्र आले  आणि युतीबद्दल आश्‍वस्त करू लागले, तर शंका यायला जागा आहे. अर्थात, भजी महोत्सव हे काही युतीच्या चर्चेचे आणि निर्णयाचे ठिकाण नाही. भाजप-सेनेतील युतीबाबत काही निर्णय व्हायचेच असतील तर ते एकतर ‘वर्षा’वर अन्यथा ‘मातोश्री’वर होतील. पण, तरीही महाजन- जैनांची भूमिका युतीची असेल तर त्यात गैर काही नाही. कारण, त्यांच्यातील सख्य उभ्या महाराष्ट्रालाच माहीत आहे. गेल्यावर्षी जळगाव महापालिकेच्या निवडणुकीवेळी महाजन जैनांशी युती करतील, अशी शेवटपर्यंत चर्चा होती.

शेवटी दोन्ही पक्ष स्वतंत्र व प्रमुख प्रतिस्पर्धी म्हणून लढले आणि भाजपने जैनांच्या ताब्यातील पालिका काबीज केली. त्यावेळी महाजनांनी दुहेरी खेळी करून अंतर्गत व बाह्य प्रतिस्पर्ध्यांना मात देत स्वत:चे महत्त्व सिद्ध केले, असे बोलले गेले. तसे यावेळी विधानसभेच्या वेळीही होणार नाही, याची शाश्‍वती कोण देणार? 

दोन वर्षांपूर्वी याच भजी महोत्सवात कट्टर विरोधक असलेल्या एकनाथराव खडसे- जैन यांनी एकमेकांना भजी भरवली होती. तेव्हाही दोन्ही नेते भविष्यात एकत्र येऊ शकतात, अशी चर्चा रंगली. प्रत्यक्षात तसे काही झाले नाही. कारण, भजी महोत्सव आणि त्यात एकत्र येऊन एकमेकांची विचारपूस करणं, भजी भरवणं.. औपचारिक अपरिहार्यतेचा भाग आहे. मग, महाजन- जैनांमध्ये कितीही सख्य असलं तरी युतीबाबतची चर्चा आणि एकमेकांच्या उमेदवारांचं काम करण्याची वचनं.. हीदेखील औपचारिकताच म्हणावी लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ponzi Scam: 100 कोटी रुपयांच्या पॉन्झी घोटाळ्याप्रकरणी ईडीचे पुणे, नाशिक अन् कोल्हापुरात छापे! काय आहे प्रकरण?

Canada Accident: कॅनडात भारतीय आजी-आजोबांसह तीन महिन्याच्या नातवाचा अपघातात मृत्यू; दुतावासही हळहळलं

Ind vs Sa Series : भारत-दक्षिण आफ्रिका खेळणार ODI-कसोटी अन् टी-20 मालिका, 'या' महिन्यात रंगणार थरार

Success Mantra: तुमच्या 'या' सवयींमुळे खराब होऊ शकते करिअर, आजच करा बंद

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

SCROLL FOR NEXT