Sati Ahilyadevi Yatrotsav  esakal
उत्तर महाराष्ट्र

Sati Ahilyadevi Yatrotsav : श्री सती अहिल्यादेवीची आजपासून यात्रा; बोरीसला भाविकांची मांदियाळी

बोरीस (ता. धुळे) येथील श्री सती अहिल्यादेवीची यात्रा शुक्रवार (ता. ९)पासून सुरू होत आहे.

सकाळ वृत्तसेवा

धुळे : बोरीस (ता. धुळे) येथील श्री सती अहिल्यादेवीची यात्रा शुक्रवार (ता. ९)पासून सुरू होत आहे. ती सरासरी पंधरा दिवस चालते. यात्रेमुळे देवीचा नवस फेडण्यासाठी गुरुवारी (ता. ८) गर्दी झाली. यात्रेची तयारी पूर्ण झाली असून, मनोरंजनाची साधने आणि विविध वस्तू विक्रेत्यांसाठी ही पर्वणी ठरली आहे.

बोरीस येथील यात्रेत जीवनावश्यक वस्तू, करमणुकीची साधने, सौंदर्यप्रसाधने, मसाले, भांडी, बैलगाडी, उपाहारगृहे आदी विविध स्टॉल, उंच व विविध पाळणे, मौत का कुआ, चित्रपटगृह आदी मनोरंजनाची साधने यात्रेची शोभा वाढवीत आहेत. यात्रेत भांडी व बैलगाडी खरेदीसाठी परजिल्ह्यातून नागरिक येतात.(Yatra start of Shri Sati Ahilyadevi from today in Boris dhule news)

माहेरचा आहेर

यात्रेत पहिल्या दिवशी विरदेलहून बोरीसला माहेरचा आहेर आणला जातो. विरदेलचे नामदेव लोटन पाटील यांच्याकडून बोरीसचे (कै.) भिला सहादू देवरे यांच्याकडे आहेर येतो. देवीला विरदेलहून आणलेले नैवेद्य दिले जातात. यात्रेनिमित्त सकाळी ट्रस्टचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुभाष देवरे सपत्नीक श्री सतीदेवीची पूजा करतील.

उद्योजक निखिल देवरे आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरती निखिल देवरे यांच्या हस्ते आरती होईल. यात्रेच्या एक दिवस आधीच हजारो भाविकांनी गर्दी करीत दर्शन घेतले. तिथीच्या वाढ घटीमुळे परिसरातील नागरिक नवस फेडण्यासाठी गुरुवारीच उपस्थित झाले. सोनगीर पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सचिन कापडणीस व सहकाऱ्यांनी बंदोबस्त ठेवला आहे.

सांस्कृतिक महोत्सव

श्री सतीदेवीचा यात्रोत्सव सांस्कृतिक महोत्सव मानला जातो. सरवड फाट्याहून लामकानी मार्गावर बोरीस आहे. श्री सतीदेवी मंदिरासमोरील यात्रेत भाविकांसह व्यावसायिकांना योग्य त्या सोयी-सुविधा दिल्या जातात. श्री सतीदेवी ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष (स्व.) शिवाजीराव रायमल देवरे यांनी १९७९ मध्ये श्री सतीदेवीचे मंदिर बांधले.

त्यास यात्रेनिमित्त रोषणाई केली जाते. या ट्रस्टची अध्यक्षपदाची धुरा सद्यःस्थितीत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुभाष देवरे सांभाळत आहेत. यात्रेच्या नियोजनास सरपंच कांतिलाल देवरे, उपसरपंच नारायण गिरासे, माजी उपसरपंच विश्‍वास पाटील व ग्रामपंचायत सदस्य, तसेच अहिल्यादेवी मित्रमंडळ, श्री बापूसाहेब शिवाजीराव देवरे मित्रमंडळ, श्री परमार्थ भजनी मंडळ, श्री ज्ञानेश्‍वर भजनी मंडळ, महात्मा फुले मित्रमंडळ, बालगोपाल मित्रमंडळ, ग्रामस्थांचे सहकार्य लाभत आहे.

सतीदेवीची आख्यायिका

विरदेल (ता. शिंदखेडा) येथील बेहेरे कुळातील गटलू पाटील यांच्या घरी अहिल्या नामक कन्यारत्न जन्मास आले. त्या वेळी रीतिरिवाजानुसार गटलू पाटलांनाही तिच्या विवाहाची काळजी वाटू लागली. अहिल्याने वडिलांना स्वतःच्या पुनर्जन्माची कहाणी सांगितली. त्यात गोगापूर (ता. शहादा) येथील नारायण भटजी यांच्या घरी जन्म घेतला.

वयाच्या बाराव्या वर्षी निधन झाले. दुसरा जन्म नेर-भदाणे (ता. साक्री) येथे माळी कुटुंबात झाला. श्री सतीदेवी अहिल्याचा तिसरा जन्म विरदेल येथे गटलू पाटील यांच्या घरी झाला. त्यामुळे श्री सतीदेवीचा विवाह बोरीस येथे अर्जुन पाटील यांच्याशी झाला. त्यापूर्वी ते दोंडाईचा येथे घोडे खरेदीसाठी गेले असता गटलू पाटील यांना ते ७० वर्षांचे दिसत होते. जेव्हा अर्जुन पाटील यांना विवाहावेळी हळद लागली तेव्हा ते चौदा वर्षांचे दिसू लागले.

बोरीसमधील या चमत्कारामुळे श्री सती अहिल्यादेवीला मानू लागले. त्यांना कन्यारत्न झाले. सुखी संसार असताना अर्जुन पाटील यांची प्रकृती बिघडली व त्यांचे निधन झाले. त्यांच्यासोबत श्री सती अहिल्यादेवी निघाली. त्या १८८७ फाल्गुन वैद्य १४ सोमवारी श्री सती अहिल्यादेवी सती गेल्या. तेव्हापासून बोरीससह पंचक्रोशीत दर वर्षी यात्रेची परंपरा सुरू झाली, अशी माहिती साहेबराव हिरे यांनी दिली.

अखंड हरिनाम सप्ताह

(स्व.) शिवाजीराव रायमल देवरे यांनी १५ ऑगस्ट १९९५ ला श्री सतीदेवी अहिल्या ट्रस्टची स्थापना केली. या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक कार्यास सुरवात केली. कार्यकर्तृत्वातून त्यांनी बोरीसचा विकास साधला आणि यात्रोत्सवाचा ठसा उमटविला. सद्यःस्थितीत ट्रस्टचे अध्यक्ष सुभाष देवरे ही परंपरा समर्थपणे पुढे नेत आहेत.

यात्रेपूर्वी वारकरी संप्रदायाचा अखंड हरिनाम सप्ताह बोरीसमध्ये होतो. यात्रेनिमित्त श्री सती अहिल्यादेवी मंदिरात दर्शनाच्या लाभाचे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष सुभाष देवरे, उद्योजक विलास देवरे, निखिल देवरे, अश्‍विनी देवरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरती देवरे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-Russia Relations: ''भारत-रशिया मिळून दहशतवादाला चोख उत्तर देणार'', परराष्ट्र मंत्र्यांचा रशियातून इशारा

Farmer ID : फार्मर आयडी नोंदणीत गोंधळ; सातबारा एकाचा, आधार लिंकिंग दुसऱ्याचे!

MP Nilesh Lanke : पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी; खासदार नीलेश लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

Maharashtra Latest News Update: विधीमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीची खोपोली ते कुसगाव या मिसिंगलिंक प्रकल्पास भेट

Mokhada News : जगण्यासाठी छळ, मरणानंतर यातना; मोखाड्यातील आदिवासींच्या नशिबाचे दुष्टचक्र

SCROLL FOR NEXT