पांढरी (जि. गोंदिया) : परिसरातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत असलेला मुरदोली येथील चुलबंद जलाशय पाटबंधारे विभागांतर्गत येत असून मुख्य कालवा गोंगले ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या बकीटोला गावाजवळून वाहत आहे. मात्र गावात प्रवेशद्वाराअगोदर एक संकीर्ण पूल असून त्या पुलाच्या दोन्ही भिंतींना भेगा पडलेल्या आहेत. त्यामुळे हा पूल केव्हाही भुईसपाट होऊन अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
चुलबंद मध्यम प्रकल्पांतर्गत मुख्य कालवा बकीटोला गावाजवळून जातो. मुरदोली ते विर्शीपर्यंतचा मुख्य कालवा असून, याला लहान मोठ्या बऱ्याचशा लघू व पुच्छ वितरिका आहेत. या माध्यमातून परिसरातील सलंगटोला, भोयरटोला, बकीटोला, गोंगले, खाडीपार, पाटेकुर्रा, मुरपार/राम, पांढरी, घोटी, म्हसवाणी, घटेगाव, गिरोला, सीतेपार, शिकारीटोला, मुंडीपार/ई., धानोरी, मालीजुंगा, चिचटोला, कोसमतोंडी, थाडेझरी, बेहलीटोला, लेंडेझरी/मुरपार, हेटी, किन्ही, सातलवाडा, विरसी आदी गावांना खरीप व रब्बी हंगामात यामुळे पाणी उपलब्ध होत असते. मात्र, गेल्या कित्येक वर्षांपासून विभागाने दुरुस्तीकडे पाठ फिरविल्याचे स्पष्ट चित्र आहे. त्यामुळे मुख्य कालवा व वितरिका ठिकठिकाणी तुटलेल्या अवस्थेत आहेत. साफसफाई नसल्याने त्या झुडपी जंगलात परिवर्तीत झाल्याचे दिसतात.
मेंटनन्सच्या नावाखाली विभाग करतो काय? हे परिसरातील स्थानिकांना न समजणारे कोडे ठरत आहे. तरीपण संबंधित विभागाने वेळीच लक्ष देऊन या पुलाची दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
2019 मध्ये सुरुवातीला प्रलंबित गोंगले-बकीटोला-भोयरटोला या मुख्य मार्गाचे मुख्यमंत्री सडक योजनेतंर्गत कित्येक लाख रुपये खर्चून डांबरीकरण करण्यात आले. मात्र, त्याच मार्गावरील तुटलेल्या पुलाच्या भिंतीकडे कुणाचेही लक्ष न जाणे ही शोकांतिका आहे.
तीन गावांना जोडणारा पूल
या पुलाच्या दुरुस्ती संबंधित मी विभागाला कित्येक वेळा सूचना केल्या व त्याचा पाठपुरावा केला. पण, आजपर्यंत पुलाची दुरुस्ती न होणे हे निराशाजनक आहे. हा पूल रहदारीसाठी तीन गावांना जोडणारा पूल आहे.
- डी. यू. रहांगडाले, सरपंच, गोंगले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.