अमरावती : कोरोनासंदर्भात काहीसा दिलासा देणारी बातमी आली आहे. रविवारी अमरावतीत कोरोनाचे 446 नवे रुग्ण आढळून आलेत. मागील 15 दिवसांच्या तुलनेने ही संख्या निच्चांकी मानली जात आहे.
फेब्रुवारी ते मार्चमध्ये सुरू झालेल्या रुग्णवाढीला रविवारी ब्रेक लागल्याचे दिसून आले. त्यामुळे प्रशासनाला काहीसा दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे रविवारी एकाच दिवशी सात जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या मात्र कमी झालेली नाही. मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत झालेल्या विक्रमी रुग्णवाढीच्या तुलनेने रविवारी (ता. सात) 446 कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. फेब्रुवारीच्या पहिल्या दिवसापासूनच कोरोनाची रुग्णसंख्या वाढत गेली. दररोज रुग्णांची वाढती आकडेवारी हाती येत असल्याने नागरिकांसोबतच प्रशासनसुद्धा हतबल झाल्याचे दिसून आले. एकेका दिवसाला सातशे ते आठशे रुग्ण आढळून आल्याने प्रशासन हतबल झाले आहे. 10 फेब्रुवारीपासून रुग्णवाढीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. मार्च महिन्यातही रुग्णवाढीचा वेग कायमच राहिला. विशेष म्हणजे मार्चमध्ये प्रशासनाकडून दोन टप्प्यांत 14 दिवसांचे लॉकडाउनसुद्धा करण्यात आले. त्याला यश मिळाले. जिल्हाधिकाऱ्यांकडून आठ मार्चपासून शहरातील लॉकडाउन हटविण्यात आले असून बाजारपेठेसाठी सकाळी नऊ ते दुपारी चारपर्यंतची वेळ निर्धारित करण्यात आली.
मार्च महिन्यातील रुग्णसंख्या -
महिना | रुग्णसंख्या |
1 मार्च | 699 |
2 मार्च | 636 |
3 मार्च | 671 |
4 मार्च | 673 |
5 मार्च | 651 |
6 मार्च | 631 |
7 मार्च | 443 |
सकारात्मक परिणाम -
लॉकडाउनदरम्यान प्रशासनाकडून विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला. याशिवाय त्रिसूत्रीचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली होती. त्याचप्रमाणे दोन टप्प्यांत 14 दिवसांचा लॉकडाउनसुद्धा करण्यात आला. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. याबाबत जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनीसुद्धा मध्यंतरी लॉकडाउनमुळे रुग्णसंख्येत घट होणार असल्याचा आशावाद व्यक्त केला होता.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.