नागपूर : आंदोलनात सहभागी झाल्याने सेवा समाप्त केलेल्या होमगार्ड जवानांना थेट सेवेत घ्यावे, असे आदेश शासनाने दिले होते. त्या आदेशाला होमगार्ड महासमादेशकांनी केराची टोपली दाखवीत मैदानी चाचणी घेण्याची अट घातली आहे. आंदोलनात सहभागी झालेल्या होमगार्ड जवानांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न यानिमित्ताने महासमादेशक करीत आहेत.
होमगार्ड जवानांनी न्याय मागण्यांसाठी राज्यात आंदोलन करीत शासनाचे लक्ष वेधले. त्यामुळे आंदोलनकर्ते होमगार्ड जवानांच्या नेत्यांसोबत 1 मार्च 2019 रोजी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहराज्यमंत्री यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती गठित केली. समितीने दिलेल्या सूचनेनुसार शासनाने आंदोलनात सहभागी झालेल्या होमगार्डला विनंती अर्ज घेऊन संघटनेत सामावून घ्यावे, असे आदेश काढले. तीन ऑक्टोबर 2019 रोजी महासमादेशकांनी शासनाच्या आदेशानुसार प्राप्त अपिलावर सुनावणी ठेवली होती. त्या सुनावणीला होमगार्ड आणि जिल्हा समादेशकही उपस्थित होते. होमगार्डचे म्हणणे ऐकून घेण्यात आले. वर्धेसह काही जिल्ह्यांच्या समादेशकांनी होमगार्डची विनंती अमान्य केली. त्यानंतर होमगार्ड महासमादेशक संजय पांडे यांनी नऊ ऑक्टोबर रोजी आंदोलनात सहभागी झाल्यामुळे सेवासमाप्ती केलेल्या होमगार्डची मैदानी चाचणी घेण्यात येईल, असे पत्र काढले. त्यात पुरुषाकरिता 1600 मीटर आणि महिलांसाठी 800 मीटर तसेच गोळाफेक चाचणी सक्तीची केली. तत्पूर्वी आंदोलनाचे आयोजन करून त्यात सामील होण्याचे होमगार्डचे वर्तन अत्यंत गंभीर स्वरूपाचे असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखविण्यात येत असल्याने होमगार्डनी नाराजी व्यक्त केली.
होमगार्ड संघटनेत स्वयंसेवक म्हणून कार्यरत असतात. संघटनेत कार्यरत असताना नियमानुसार त्यांना कर्तव्यावर तैनात करण्यात येत होते. लोटांगण आंदोलनात सहभागी झाल्यामुळे त्यांची संघटनेतील सेवा समाप्त केली होती. होमगार्ड मानसेवी गणवेशधारी संघटना आहे. या संघटनेत अशा पद्धतीने कार्यक्रम आयोजित करता येत नाही. जिल्हा समादेशकांनी दिलेल्या शिफारशीनुसार चाचणी घेण्यात येणार आहे.
- संजय पांडे
महासमादेशक होमगार्ड
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.