Human-Trafficking 
विदर्भ

जन्मदातेच विकतात पोटच्या पोरीला!

मनीषा मोहोड-येरखेडे

नागपूर - बेडिया, कंजर, नट बेडिया जमातीत कुठल्याही घरात मुलीचा जन्म झाला, तर उत्सव साजरा केला जातो. जन्माला आलेली मुलगी बारा-चौदा वर्षांची झाली की, तिची बोली लागते... रंग-रूपावरून तिची किंमत ठरवली जाते. तिला चार ते पाच वर्षांच्या करारावर काही लाखांत दलालाच्या स्वाधीन करण्यात येते. दलाल तिला देहव्यापारात ढकलून पैसे वसूल करतो... खरेदी चार पट वसुली झाल्यानंतर करार संपल्यावर मुलगी जन्मदात्यांकडे परत सोपविली जाते. त्यानंतर पुन्हा नवीन दलाल... नवीन बोली... आणि नवीन ग्राहक... हा मानव तस्करीचा व्यापार चालतो राज्याअंतर्गत, राज्याबाहेर, देशाअंतर्गत आणि देशाबाहेरही..!

‘फ्रीडम फर्म‘ ही सामाजिक संस्था संपूर्ण भारतात ‘ह्युमन ट्रॅफिकिंग’वर काम करीत असून, विदर्भात २०११ पासून या संस्थेचे स्वयंसेवक पोलिसांच्या मदतीने मुलींची सुटका करीत आहेत. या संस्थेला नागपूरच्या गंगा-जमुना भागात सापडलेल्या सुशीने (नाव बदललेले) आपली हकीकत सांगितली तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसला. राजस्थानातील एका गावातील ही मुलगी सामाजिक संस्थेच्या ताब्यात आली तेव्हा तिचे वय २२ ते २४ वर्षे असावे, असा अंदाज होता. 

वैद्यकीय तपासणीत मात्र तिचे वय अवघे चौदा वर्षे असल्याचे समोर आले. ‘स्टेरॉईड’च्या भडिमाराने तिचे तारुण्य फुलविण्यात आले होते. जन्मदात्यांनी तिला १० लाखांत चार वर्षांसाठी दलालाला विकले होते. 

दुसऱ्या एका घटनेत मध्य प्रदेशातील आरती (नाव बदललेले) वयाच्या पंधराव्या वर्षीच प्रेमात पडली... प्रियकराने लग्नाचे आमिष दाखवत गैरफायदा घेतला आणि रेल्वे स्टेशनवरच तिचा हात सोडला... सैरभैर झालेली आरती देहविक्री करणाऱ्या महिलेच्या संपर्कात आली. तिने चहात गुंगीचे औषध देऊन तिला दलालामार्फत गंगा-जमुनात पाठविले. आरती शुद्धीवर आली तेव्हा तिच्या शरीराची बोली लावणे सुरू होते.

राज्यस्थानमधील चांगल्या घरातील पूजा (नाव बदललेले) वयाच्या सोळाव्या वर्षी नवीन लग्नाचे स्वप्न डोळ्यात घेऊन ग्वाल्हेरला नवऱ्यासह रितसर विवाह करून सासरी आली. सासरच्यांनी अतोनात शारीरिक छळ करीत मोठी किंमत घेऊन तिला मानवी तस्करीच्या जाळ्यात ढकलून दिले. गंगा-जमुनामध्ये ती सापडली तेव्हा तिच्या सर्वांगावर माराचे वळ होते. मानवी तस्करीत अशाप्रकारे रोज निरपराध कळ्या अत्यंत क्रूरपणे खुरडल्या जात आहेत. 

बदनौर येथे ‘ट्रेनिंग हब’
राजस्थानमधील बदनौर येथे मानवी तस्करीतील मुलींना एकत्रित आणून ‘ट्रेनिंग’ दिले जाते. या मुलींची सर्व कागदपत्रे तयार करून, खोटी ओळख निर्माण केली जाते. त्यात खोटे आईवडील, खोटे कुटुंब आणि खोटीच ओळख मुलींच्या मेंदूत बिंबवली जाते. हीच ओळख मुली पोलिस तपासांतही सांगतात. त्यानंतर ग्राहकाला खुश करण्याचे ‘ट्रेनिंग’ त्यांना देण्यात येते. इथेच त्यांना दारू, हुक्का, गांजाचे व्यसन लावून प्रत्यक्ष व्यवसायाच्या ठिकाणी आणून सोडले जाते.

२०१०-११ पासून आम्ही मानवी तस्करीवर काम करीत आहोत. आजवर हजारो मुली मानवी तस्करीच्या जाळ्यात अडकल्याचे अनुभवले असून, आतापर्यंत ३०० च्या वर मुलींची घरवापसी करण्यात आम्हाला यश आले आहे. विदर्भातील सुमारे १५० मुलींची यातून सुटका केली असली तरी, अनेक प्रकरणांत पालकच मुलींना विकत असल्याचेही समोर आले आहे. तसेच गरिबी, दारिद्य्राला कंटाळून आलिशान जीवनमान यासाठीही परराज्यातील मुली स्वतःहून येत असल्याचे आढळले आहे.
- आशा लोखंडे, सहायक संचालक, फ्रीडम फर्म सामाजिक संस्था. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS vs IND 3rd ODI: रोहित शर्माचे ५० वे शतक! विराट कोहलीनेही ठोकली फिफ्टी; RO-KO ची मोठ्या विक्रमांना गवसणी

Ladki Bahin Yojana: महिलांसाठी लाडकी बहीण योजनेत ई-केवायसी प्रक्रिया सुलभ करावी : इम्तियाज जलील

Marathwada Rain: मराठवाड्यात बरसल्या सरी; नांदेड, जालना परिसरात मुसळधार पाऊस

वर्ल्ड कपसाठी भारतात आलेल्या ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूंची छेडछाड, आरोपीला अटक; नेमकं काय घडलं?

Government Farmer Scheme: महत्त्वाची बातमी! ९७ हजार शेतकऱ्यांना मिळाले ११२ कोटी; आठवड्यात ७ लाख ६४ हजार शेतकऱ्यांच्‍या खात्‍यात जमा होतील ८६७ कोटी रुपये

SCROLL FOR NEXT