RTUser
RTUser
विदर्भ

रात्रीच्या अंधारात बोकड चोरला, कापला अन् मालकालाच विकला

सकाळ वृत्तसेवा

दर्यापूर (जि. अमरावती) : लाडाने वाढविलेले बकरीचे पिलू चांगले गलेलठ्ठ झाले... दररोज हिरवा चारा व पशुखाद्य देत घरच्यांना लळा लागला होता... रात्री हे बोकूड घरातील वाडग्यात बांधून परिवार झोपी गेला... सकाळी उठून बघतो तर बोकूड गायब... सर्वत्र शोध घेतला मात्र आढळला नाही... अखेर खिन्न मनाने घरी परतून त्याच्या आठवणीत दिवस गेला. हे बोकूड कापून त्यांनाच विकण्याचा प्रयत्न झाला.

एखादे जनावर पाळल्यानंतर त्यात घरातील सर्वांचाच जीव अडकतो. त्याच्या बाललीला, बागडणे आदींवर सर्वच जण आनंद घेत असतात. अशा स्थितीत पाळीव जनावर चोरीला गेल्यानंतर परिवारात नैराश्य पसरते, हे सर्वश्रुत आहे. सदर बोकडाला कातखेडा येथील राजेंद्र मोतिराम वानखडे यांच्या परिवाराने असाच जीव लावला होता. मात्र, या बोकडाला कोणीतरी चोरून नेल्याचे कळताच त्यांनी सर्वत्र शोधाशोध सुरू केली.

गावामध्ये सगळीकडे बघितल्यावर आसपासच्या शेतशिवारातसुद्धा शोध घेण्यात आला. मात्र, बोकूड आढळले नसल्याने निराश होऊन ते परत आले. एक-दोन दिवस असेच निघून गेल्यानंतर बोकूड मिळणार नाही, हा विचार पक्का करीत सर्वजण आपापल्या कामी लागले. बुधवारी (ता. २२) गावातीलच वेशीजवळ मटण विक्रेत्याचे दुकान लागले होते. घरच्यांचा आग्रह म्हणून व हरवलेल्या बोकडाच्या निराश विचारातून बाहेर यावे म्हणून मटण खाण्याची सर्वांची इच्छा झाली. त्यामुळे राजेंद्र वानखडे हे वेशीवर लागलेल्या मटणाच्या दुकानात गेले.

तेथे मटण घेत असताना बाजूच्या गवतामध्ये त्यांना आपल्याच बोकडाचे मुंडके पडल्याचा भास झाला. जीव लावलेल्या बोकडाचा चेहरा त्यांच्या विचारांमध्ये घट्ट बसला होता. त्यांनी जवळ जाऊन गवत बाजूला केले व ते कापलेले मुंडके आपल्याच बोकडाचे आहे हे बघून डोळ्यांत पाणी आले. त्यांच्या घरून चोरून नेलेल्या बोकडाचे ते मुंडके होते. यावरून त्यांनी दुकानदाराकडे चौकशी केली असता यातील काही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.

यावरून दोघांमध्ये काही वेळ बाचाबाची आणि वादसुद्धा झाला. अखेर यासंबंधात राजेंद्र वानखडे (वय ५०, रा. कातखेडा) यांनी येवदा पोलिसात रितसर तक्रार केली. पोलिसांनी रोहन ढोके (वय २२, रा. उमरी बाजार) याच्याविरुद्ध तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला. जीव लावलेल्या बोकडाला चोरून व त्यालाच कापून त्याचेच मटण खूद्द या परिवाराला विकण्याचा प्रयत्न झाला होता. राजेंद्र वानखडे यांनी तक्रारीत १५ हजारांचे नुकसान झाल्याचासुद्धा दावा केला असून, पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास येवदा पोलिस करीत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोकसभेचा महाराष्ट्ररंग

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 05 मे 2024

IPL 2024 RCB vs GT: जोशुआ लिटिलनं दिलेलं टेंशन, पण बेंगळुरूने विजयाचा चौकार मारत प्लेऑफच्या आशाही ठेवल्या जिंवत

कहाणी वेदनादायी आयुष्याची

दलितांच्या जीवनाचं वास्तव चित्रण

SCROLL FOR NEXT