यवतमाळ : कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने परजिल्ह्यातून येणाऱ्या वाहनांची कडक तपासणी करण्यात येत आहे. बनावट पासद्वारे अमरावती ते यवतमाळ करण्यात आलेल्या प्रवासाचे बिंग क्यूआर कोडमुळे फुटले. याप्रकरणी चालक व मालकाला लोहारा पोलिसांनी अटक केली.
चालक एजाज खॉ युसूफ खॉ पठाण (रा. वाघाडी, भोयर बायपास), मालक निनाद प्रदीप लोखंडे (रा. गुलमोहर अपार्टमेंट, आर्णी रोड) अशी संशयितांची नावे आहेत. बुधवारपासून जिल्ह्यात कडक संचारबंदीच्या आदेशाची अंमलबजावणी सुरू झाली. त्यानुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून लोहारा टी पॉइंट येथे यवतमाळ शहरात येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यासाठी पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता.
बुधवारी (ता.15) दुपारी साडेचार वाजतादरम्यान पोलिसांनी नेरमार्गे आलेल्या कारला अडवून कुठून आले, अशी विचारणा केली. त्यांनी अमरावती येथून यवतमाळला येत असल्याचे सांगितले. आंतरजिल्हा प्रवासासाठी आवश्यक असलेल्या पासची मागणी केली. चालकाने त्याच्याकडे असलेली पास दाखविली. पासच्या क्यूआर कोडची पोलिस उपनिरीक्षक संतोष जायेभाये यांनी पडताळणी केली असता पासची वैधता संपल्याचे लक्षात आले. सदर पास यवतमाळ ते पुणे प्रवासाची होती. त्याची मुदत दहा ते बारा जुलैपर्यंत वैध होती.
मात्र, चालक एजाज खा याच्या नावे असलेली पास 15 ते 16 जुलै अशी होती. पास बनावट असल्याचा संशय आल्याने कर्तव्यावरील पोलिसांनी घटनेची माहिती वरिष्ठांना दिली. पाससंदर्भात चालकाकडे विचारणा केली असता, वाहन मालक निनाद लोखंडे यांनी आपल्याला बनवून दिल्याचे सांगितले. हा बनावट प्रकार स्पष्ट झाल्यावर दिलीप सावळे यांनी लोहारा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून एजाज खॉ व निनाद लोखंडे यांच्याविरुद्घ गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली.
ही कारवाई पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलिस अधीक्षक नुरूल हसन, एसडीपीओ माधुरी बाविस्कर यांच्या मार्गदर्शनात लोहारा ठाणेदार सचिन लुले, पीएसआय संतोष जायभाये, दिलीप सावळे, पांडुरंग गेडाम, सुधाकर चर्लेवार, साजीद शेख, दीपक वानखडे, मनोज मिश्रा, आशीष भुसारी, उमेश पिसाळकर, रवींद्र चव्हाण आदींनी केली.
कार मालकाने त्याच्याकडे असलेली जुनी पास प्रिंटरद्वारे स्कॅन केली. लॅपटॉपवर एडिटिंग करून प्रवासाची नवीन तारीख टाकली. अशाप्रकारे कलाकारी करून बनावट पास तयार केली. पोलिसांनी पास, मोबाईल, पाच लाख रुपये किमतीची कार असा मुद्देमाल जप्त केला. बनावट पासद्वारे प्रवास होऊ शकतो, हे या घटनेमुळे स्पष्ट झाले आहे.
संपादित : अतुल मांगे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.