ikbal. 
विदर्भ

लॉकडाउनमुळे थांबली घोड्यांची टपटप; रोजची चूल पेटावी कशी?

उदय राउत

भंडारा  : "टपटप, टपटप टापा टाकीत चाले माझा घोडा, पाठीवरती जीन मखमली, पायी रुपेरी तोडा" अशा ऐटीत चालणाऱ्या रुबाबदार घोड्याची चाल लॉकडाउनने बंद पाडली. अन घोडा नाचवून पोट भरणाऱ्यांवर संकट ओढवले. इक्‍बाल शेख हा सुद्धा त्यातील एक. घोडा पाळणे व नाचविणे हे उदरनिर्वाहाचे एकमात्र साधन. परंतु, गेल्या तीन महिन्यांपासून  लॉकडाउनमुळे घोड्यांच्या टापांची टपटप थांबली. व्यवसायाला पूर्णपणे लगाम लागला. त्यामुळे आधीच कर्करोगाशी झुंजणाऱ्या तरुणाला आता प्रतिकूल परिस्थितीशी लढावे लागत आहे.
शहरातील स्टेशन रोडवरील मुस्लिम कब्रस्तानाला लागून असलेल्या काही झोपड्यांत तीन-चार कुटुंबे राहतात. मोडक्‍या, तोडक्‍या झोपडीत वास्तव्य करणाऱ्या इक्‍बालच्या कुटुंबात तो एकटा कमावता. घरात पती-पत्नी आणि दोन मुले, आई-वडील व अविवाहित बहीण अशी खाणारी तोंडे सात. आजोबा, पणजोबांपासून घोडे पाळणे अन नाचविणे हा पिढीजात धंदा. परंपरेने इक्‍बालसुद्धा याच कामात आहे. सोबतच तो वरात, मिरवणुकीत लाईटिंगचे (रोषणाई) काम करतो. या दोन्ही व्यवसायामुळे त्याला आर्थिक स्थैर्य लाभले. कुटुंबाची स्थितीसुद्धा बऱ्यापैकी सुधारली. परंतु, तब्बल तीन महिन्यांपासून हा धंदा पूर्णपणे बंद असल्याने सध्या त्याला वाईट परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. इक्‍बालला तीन वर्षांपूर्वी हाडाच्या कर्करोगाने ग्रासले.  आतापर्यंत त्याच्यावर तीन ते चार शस्त्रक्रिया झाल्या असून आठ ते दहा लाख रुपये खर्च झाले. औषधोपचारासाठी दर महिन्याला तीन ते चार हजार रुपयांचा खर्च येतो. अशाही स्थितीत संकटाला धैर्याने सामोरे जात त्याचा जगण्याचा संघर्ष सुरू आहे. त्यातच कोरोनामुळे निर्माण झालेल्या लॉकडाउनने भर पडली आहे. कमाईचे साधनच हिरावले गेल्याने त्याच्या कुटुंबाची परवड होत आहे. घर कसे चालवावे, पोट कसे भरावे, हा प्रश्‍न त्याच्यासमोर आहे. शहरात इक्‍बालप्रमाणेच 8 घोडेवाले असून त्यांच्याकडे 13 घोडे आहेत. या सर्वांना लॉकडाउनचा मोठा आर्थिक फटका बसला असून आवक नसताना घोड्यांचा सांभाळ करणे डोईजड होत आहे.
एक घोडा विकला.....
इक्‍बालकडे दोन घोडे होते. घरात पैशांची चणचण असल्याने, देणेदारांची थकबाकी असल्याने त्याला एक घोडा विकावा लागला. सध्या त्याच्याकडे एक घोडा आहे. कुठलीही आवक नसताना घोड्याची देखरेख, खुराक, रोजचा आहार, औषधपाणी यावर खर्च करणे क्रमप्राप्त आहे. घोड्याची दररोज अंघोळ, खरारा करावा लागतो. दिवसांतून तीन वेळा घोड्याला आहार दिला जातो. यात हरभऱ्याचा कुटार, गव्हाचा कोंडा गवत यामागे दोनशे ते अडीचशे रुपयांचा खर्च येतो. सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीत दोन घोडे पोसणे डोईजड ठरल्याने इक्‍बालने एक घोडा विकला.
ईदच्या उत्साहावर विरजण
मार्च महिन्यापासून लॉकडाउन सुरू झाले आहे. सार्वजनिक व धार्मिक कार्यक्रम,लग्न समारंभ, मिरवणूक या साऱ्यांवर निर्बंध आले. श्रीरामनवमी, हनुमान जयंती, आंबेडकर जयंती यानिमित्त निघणारी मिरवणूक, शोभायात्रा, दिंडी तसेच संदलमध्ये सजविलेले अश्‍व सहभागी होतात. लग्नसराईच्या हंगामात नवरदेवासाठी नाचणाऱ्या घोड्यांना मागणी असते. या मौसमात दीड ते दोन लाख रुपयांची कमाई होते. परंतु, यावेळी साऱ्यांवर बंधने असल्याने उत्पन्नाचे स्त्रोत बंद आहेत. रमजान ईद हा मुस्लिमांचा मोठा सण. परंतु हलाखीच्या परिस्थितीमुळे या सणावर विरजण पडले. अगदी साधेपणाने ईद साजरी केली. घरच्या मुलांनासुद्धा नवीन कपडे घेता आले नाही, अशी खंत इक्‍बालने व्यक्त केली.

सविस्तर वाचा - सामूहिक चाचणीचा निर्णय राज्याने घ्यावा
या व्यवसायाने कुटुंबाला आर्थिक स्थैर्य दिले. पण, टाळेबंदीने सारे हिरावले
लॉकडाउनने सारे काही हिरावले आहे. मी गेल्या तीन वर्षांपासून कर्करोगाशी झुंज देत आहे. लहानपणापासून सांभाळ केलेला, वाढविलेला माझा एक घोडा मला आर्थिक परिस्थिती बिकट झाल्याने विकावा लागला. शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे.
इक्‍बाल शेख
सुलतान घोडेवाला, भंडारा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tiger Attack: वाघाच्या हल्ल्यात दोन ठार; सिंदेवाही, सावली तालुक्यांतील घटना, नागरिकांमध्‍ये भीतीचे वातावरण

ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १६ जणांचा मृत्यू; हल्लेखोर बापलेक पाकिस्तानचे

Latest Marathi News Live Update : यवतमाळमधील मुडाणा गावात घराला भीषण आग

Nagpur Crime: वाटणीवरून थोरल्‍याने केला धाकट्याचा खून; मोहगाव सावंगी, नाल्यात जळालेल्या अवस्थेत शेतकऱ्याचा मृतदेह आढळला

Panchang 15 December 2025: आजच्या दिवशी विष्णुसहस्रनाम स्तोत्राचे पठण करावे आणि ‘सों सोमाय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT