नागपूर, ता. 11 : नागपूरची बुद्धिबळपटू मृदुल डेहनकरने बुद्धिळातील प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय महिला मास्टर (डब्ल्यूआयएम) किताब पूर्ण केला आहे. तिने हा किताब दिल्ली येथे संपलेल्या पश्चिम आशियाई युवा व ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धेत मिळविला. "डब्ल्यूआयएम' बहुमान मिळविणारी मृदुल नागपूरची दुसरी महिला बुद्धिबळपटू ठरली आहे. फिडे नियमानुसार, एखाद्या बुद्धिबळपटूने आशियाई किंवा जागतिक स्पर्धेत पदक जिंकून आवश्यक रेटिंग गुण प्राप्त केल्यास तो कॅंडिडेट मास्टर (सीएम), महिला फिडे मास्टर (डब्ल्यूएफएम) किंवा आंतरराष्ट्रीय महिला मास्टर (डब्ल्यूआयएम) किताबासाठी पात्र ठरतो. 16 वर्षीय मृदुलने 18 वर्षे वयोगटात विजेतेपद जिंकून 2198 येलो रेटिंग गुण पूर्ण करीत डब्ल्यूआयएम किताबाची मानकरी ठरली. यापूर्वी दिव्या देशमुखने आंतरराष्ट्रीय महिला मास्टर किताब मिळविला होता. दिव्या देशातील सर्वांत कमी वयाची "डब्ल्यूएफएम' आहे. अव्वल मानांकित मृदुलने नऊ फेऱ्यांमध्ये सर्वाधिक आठ गुणांची कमाई केली. उल्लेखनीय म्हणजे, तिने स्पर्धेत एकही सामना गमावला नाही. सात विजय आणि दोन बरोबरी, अशी तिची कामगिरी ठरली. मृदुलने ब्लिट्झ प्रकारातही रौप्यपदकाची कमाई केली. नागपूरच्याच सृष्टी पांडेनेही या स्पर्धेत स्वत:चे पहिले आंतरराष्ट्रीय पदक (ब्रॉंझपदक) जिंकले. तिने नऊ फेऱ्यांमध्ये सहा गुण मिळविले. तिने पाच सामने जिंकले, दोन बरोबरीत सोडविले, तर तीनमध्ये ती पराभूत झाली. रॅपिड प्रकारातही ती ब्रॉंझपदकाची मानकरी ठरली. सृष्टीने या कामगिरीसोबतच महिला फिडे मास्टर किताबही जिंकला.
विवान सारावगीला सुवर्णपदक
या स्पर्धेत नागपूरच्याच विवान सारावगीनेही आठ वर्षे वयोगटात सुवर्णपदकाची कमाई केली. द्वितीय मानांकित विवानने नऊ फेऱ्यांमध्ये आठ गुण मिळविले. विवान आणि रोश यांचे समसमान गुण होते. त्यामुळे विजेत्याचा निर्णय तांत्रिक (बुचोल्स) गुणांच्या आधारावर झाला. विवानचे हे दुसरे आंतरराष्ट्रीय पदक होय. यापूर्वी त्याने जागतिक स्पर्धेत पदक जिंकले होते.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.