नागपूर, ता. २१ ः अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून संततधार सुरू आहे. परिसरातील नद्यांना पूर असल्याने जलाशयाच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे.
त्यामुळे शुक्रवारी (ता. २१ जुलै) सायंकाळी सात वाजता अप्पर वर्धा धरणाचे सात दरवाजे उघडण्यात आले आहेत. तर, यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड, महागाव व आर्णी तालुक्यांत गुरुवारी (ता. २० जुलै) रात्री अतिवृष्टी झाली. त्यात हजारो हेक्टर शेती पिकांचे नुकसान झाले आहे.
अमरावती जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांपासून होत असलेल्या सार्वत्रिक पावसाने नदी नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाने चांगली हजेरी लावल्याने धरणांतील जलसाठ्यात वाढ झाली असून पूर्णा व गर्गा या मध्यम धरणातून व बेंबळा प्रकल्पातून विसर्ग करण्यात येत आहे.
त्यामुळे नदीपात्रातील पाणी पातळी वाढत असल्याने सतर्कतेचे इशारे जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.
मोर्शी तालुक्यातील अप्पर वर्धा जलाशयाच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे शुक्रवारी सायंकाळी धरणाचे सात दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यातून वर्धा नदीपात्रात विसर्ग सुरू असल्याने वर्धा नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
या धरणातील पाण्याचा साठा आज ३४०.२० मीटर इतका आहे. चांदूर बाजार तालुक्यातील पूर्णा मध्यम प्रकल्पाची मर्यादा ४५२ मीटर असून पाणी पातळी ४४८ मीटरवर पोहोचली. या धरणांचे ९ पैकी दोन दरवाजे सात सेंमीने उघडण्यात आले आहेत. मेळघाटातील गर्गा मध्यम प्रकल्पातून ३२.४२ घनमीटर प्रती सेकंद विसर्ग सुरू आहे.
यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टी
यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड, महागाव व आर्णी तालुक्यांतील आठ महसूल मंडळांत गुरुवारी रात्री अतिवृष्टी झाली. याचा सर्वाधिक फटका उमरखेड तालुक्याला बसला आहे. हजारो हेक्टर शेती पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात १९.८ मिमी नोंद करण्यात आली आहे.
हवामान विभागाने जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट दिला आहे. शनिवारी (ता. २२) जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळांसह महाविद्यालय बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
गडचिरोलीत सर्वदूर मुसळधार
गडचिरोली जिल्ह्यात संततधार व मुसळधार पावसामुळे अनेक भागांत नदी-नाल्यांना पूर आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील २३ मार्ग बंद झाले असून शनिवार (ता. २२) जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी शाळा, महाविद्यालयांना सुटी जाहीर केली आहे.
मागील आठवडाभरापासून गडचिरोली जिल्ह्याच्या विविध भागांत मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक भागांत पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. पुरामुळे आलापल्ली-सिरोंचा या प्रमुख मार्गासह २३ मार्ग बंद झाले आहेत.
मागील चोवीस तासांत सिरोंचा तालुक्यात सर्वाधिक ११९.५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्याखालोखाल देसाईगंज तालुक्यात ९६ मिलीमीटर पाऊस पडला. दरम्यान, हवामान विभागाने पुन्हा मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.पुरात वाहून गेलेल्याचा मृतदेह सापडला
दारव्हा (जि. यवतमाळ) तालुक्यातील बोरी बु येथील बळीराम श्रीकृष्ण राऊत हा गुरुवारी अडाण नदीच्या पुरात वाहून गेला होता. त्याचा मृतदेह तालुक्यातील साजेगाव शिवारात अडाण नदीपात्रात आज शुक्रवारी आढळला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.