नागपूर : अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष प्रवर्गातील व्यक्तींच्या जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी विभागस्तरावर जात प्रमाणपत्र पडताळणी समित्या आहेत. या समित्यांवरील कामाचा बोजा बघता शासनाने जिल्हावार जात प्रमाणपत्र पडताळणी समिती गठित केली. संपूर्ण राज्यात ३५ जात पडताळणी समित्या आहेत. जिल्हा समितीचे पदसिद्ध अध्यक्ष अतिरिक्त जिल्हाधिकारी असतात. राज्यात ७० टक्के जातपडताळणी समित्या अध्यक्षांशिवाय असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
राज्यात मागास प्रवर्गातील जात प्रमाणपत्राची पडताळणी करणाऱ्या १५ विभागीय समित्या होत्या. यांपैकी तीन समित्या नागपूर विभागात कार्यरत होत्या. मात्र पुढे या विभागीय समित्यांचे विकेंद्रीकरण करून प्रत्येक जिल्ह्यात एक अशा एकूण ३५ समित्या स्थापन केल्या आहेत. जिल्हास्तरावरील जात पडताळणी प्रमाणपत्र समितीचे पदसिद्ध अध्यक्ष अतिरिक्त जिल्हाधिकारी तर समिती सदस्य सचिव म्हणून जिल्हा समाजकल्याण अधिकारी यांच्याकडे कार्यभार सोपवण्यात येतो. समित्यांसाठी आवश्यक उपायुक्त, समाजकल्याण व संशोधन अधिकारी तसेच अन्य कर्मचाऱ्यांची पदे निर्माण करण्यात आली.
सध्या ३५ समिती अध्यक्षांची पदे आहेत. यांपैकी २२ पदे रिक्त आहेत. रिक्त पदे असल्यामुळे मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना त्रास होत असल्याची माहिती पुढे आली आहे. जिल्हास्तरावर कार्यालये उपलब्ध आहेत. जिल्हा समाजकल्याण अधिकाऱ्यांपुढे विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबवण्याचे आव्हान असते, त्यात समितीमधील सोपवण्यात आलेली जबाबदारी पेलवणे कठीण होते.
जात पडताळणी समितीकडून विद्यार्थ्यांना वेळेत जात प्रमाणपत्र मिळत नसल्याची ओरड कायम आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी जिल्हा जात पडताळणी समिती स्थापन झाली, मात्र विद्यार्थ्यांना वेळेवर प्रमाणपत्र मिळणे दुरापास्त झाले आहे. शासनाने जिल्हास्तरावर समित्या स्थापन केल्या. कार्यालयाची व्यवस्था केली. त्यासाठी लागणाऱ्या कर्मचारी वर्ग हा कंत्राटीवर आहे. यासाठी विशिष्ट संगणकीय प्रणाली उपलब्ध करून देण्यात आली, मात्र कर्मचाऱ्यांचा तुटवडा जाणवतो. समितीचे संशोधन अधिकारी म्हणून काम करणे अनेकांना कठीण होत आहे.
भंडाऱ्याचा भार यवतमाळ समितीच्या अध्यक्षांकडे
यवतमाळ येथील जातपडताळणी समितीचे अध्यक्ष यांच्याकडे भंडारा जिल्ह्यातील जात पडताळणी समितीचा अतिरिक्त कार्यभार आहे. अडीचशे किलोमीटर अंतर कापून अध्यक्ष भंडाऱ्याला कधी पोहोचतील कसा येथील कार्यभार सांभाळतील?, एका अध्यक्षांकडे दोन, तीन ठिकाणचा अतिरिक्त कार्यभार असल्याचा अजब गजब प्रकार जातपडताळणी विभागात सुरू आहे. अधिक माहिती मिळवण्यासाठी बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांच्याशी संपर्क साधला, परंतु संपर्क होऊ शकला नाही.
जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यातील अडचणी दूर करणे आणि याबाबतची प्रक्रिया गतिमान करण्याची गरज आहे. मोठ्या प्रमाणात रिक्त पदे असल्यामुळे प्रतीक्षा यादी वाढत आहे. वारंवार खेटा घालूनही संशोधनच होत नसल्याचे पुढे आले आहे. जातपडताळणी प्रमाणपत्र महत्त्वाचा पुरावा आहे, तो अडचणीशिवाय मिळावा, यासाठी जिल्हावार समिती गठित केली, परंतु विद्यार्थ्यांना होणारा त्रास कमी झाला नाही. रिक्त पदे असल्यामुळे एका अध्यक्षाकडे अनेक ठिकाणचा कार्यभार असल्याने कुठे कुठे ते सेवा देतील, हा खरा प्रश्न आहे.
- अतुल खोब्रागडे, सामाजिक कार्यकर्ते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.