नागपूर

पोलिसांनी सर्वांसमोर केली मारहाण; अपमानित झाल्याने आत्महत्या

अनिल कांबळे

नागपूर : पोलिसांनी मारहाण केल्याने अपमानित झालेल्या ३८ वर्षीय लेखापालाने आत्महत्या केली. या घटनेमुळे मृताच्या संतप्त नातेवाइकांसह नागरिकांनी मंगळवारी सकाळी हुडकेश्वर पोलिस स्टेशनला घेराव घालून दोषी पोलिसांना निलंबित करण्याची मागणी केली. त्यामुळे प्रचंड तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी समजूत घातल्याने तणाव निवळला. महेश शालिकराम राऊत (रा. न्यू सोमवारीपेठ, रघुजीनगर) असे मृताचे नाव आहे. तो ताजश्री शोरूममध्ये लेखापाल होता.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास महेश याने पोलिस नियंत्रण कक्षाला फोन केला. एका मतिमंद इसमाला शेजारची महिला मारहाण करीत असल्याचे पोलिस नियंत्रण कक्षाला सांगितले. नियंत्रण कक्षाने हुडकेश्वर पोलिसांना कळविले. माहिती मिळताच हुडकेश्वर पोलिस स्टेशनचे चार्ली कमांडो किशोर सेनाड व प्रवीण आलम तेथे गेले. मात्र, मारहाणीची कोणतीही घटना झाली नसल्याचे पोलिसांना कळाले.

पोलिसांनी महेशच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. महेशचा मोबाइल बंद होता. ट्र्यू कॉलरमध्ये महेशचे नाव आले. शेजाऱ्याने महेश बाजूलाच राहत असल्याचे सांगितले. पोलिस त्याच्या घरी गेले व जाब विचारला. खोटी माहिती का देतो, असे म्हणून फटकारले. त्यानंतर दोघांनी त्याला मारहाण केली व घराबाहेर आणले. बाहेर फरफटत नेऊन मारहाण केली. तसेच गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली.

महेशचे नातेवाईक व परिसरातील नागरिकांनी पोलिसांची समजूत घातली. त्यानंतर दोघेही पोलिस कर्मचारी परत गेले. नातेवाईक व परिसरातील नागरिकांसमोर मारहाण झाल्याने महेश मनावर विपरीत परिणाम झाला. अपमानित झाल्याने महेशने मध्यरात्री कीटकनाशक प्राशन केले. महेश उलटी करायला लागला. नातेवाइकांनी त्याला मेडिकलमध्ये दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

पोलिस स्टेशनला घेराव

महेशच्या मृत्यूनंतर परिसरातील नागरिक संतापले. सकाळी महेशचे नातेवाईक व नागरिकांनी हुडकेश्वर पोलिस स्टेशनला घेराव घालून दोषी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी केली. निलंबित केल्याशिवाय हटणार नाही, असे नागरिक म्हणाले. त्यामुळे तणाव निर्माण झाला. माहिती मिळताच पोलिस उपायुक्त डॉ. अक्षय शिंदे यांच्यासह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी कायद्यानुसार कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर तणाव निवळला. महेशच्या मागे पत्नी प्रणाली, दोन मुले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ब्रिटिश साम्राज्याच्या लोकशाहीतील पाऊलखुणा

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 04 मे 2024

राजकीय पक्षांच्या नजरेतून स्त्रियांचे प्रश्‍न

आयुर्वेदिक पंचकर्म

रक्तातील साखरेचे ‘हिस्टरी बुक’

SCROLL FOR NEXT