नागपूर : मी अवघ्या तीन महिन्यांची असतानाच एका अपघाताने आई-वडिलांचे छत्र हिरावले. पुढे अतिशय हलाखीच्या परिस्थितीत आजीने सांभाळ केला. टोकाच्या गरिबीतही आजीने शिक्षणासाठी कायम पाठबळ दिले. आजीच्या या पाठबळाला कष्ट अन् जिद्दीची जोड देत पहिल्याच प्रयत्नात राज्यसेवेची परीक्षा उत्तीर्ण केली. अन् आता अंगावर वर्दी चढवून देशसेवेसोबतच समाजभानाचाही वसा हाती घेतला आहे. ही कहानी आहे, आयुष्यातील अनेक चढउतारांना मोठ्या धैर्याने सामोरे गेलेल्या गुन्हे शाखेतील (nagpur crime branch) सहायक पोलिस निरीक्षक रेखा सागर संकपाळ (API Rekha Sankpal) यांची. असं खडतर जीवन बघितले तर आज माझ्यासाठी देवापेक्षाही आजी मोठी वाटत असल्याच्या त्यांच्या भावना आहेत.
माझा जन्म कोल्हापूर जिल्ह्याच्या करवीर तालुक्यातील आडूर या गावचा. आई-वडिल आज मला आठवत नाहीत. मात्र, अवघी तीन महिन्यांची तान्हुली असतानापासून माझी आजी सावित्री रामचंद्र पोवार हीने माझा सांभाळ केला. मुलगी गेल्याचे दुःख तिला होते. पण तिने माझ्या सांभाळाकडे लक्ष दिले. घरची परिस्थिती फारच हलाखीची होती. पण शेवटी ती आईची आईच ना... ती मागे हटली नाही. माझ्यासाठी तिने जिवाचे रान केले. माझी प्रत्येक गरज पूर्ण केली. मला शिक्षणासाठी प्रोत्साहित केले. तिच्या पाठबळामुळेच आज मी सहायक पोलिस निरीक्षक म्हणून उभी आहे, अशा शब्दात रेखा संकपाळ यांनी आपला जीवनप्रवासाची काही पाने उलगडली.
खेड्यात प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. पण पुढे शिकून मोठी हो म्हणत आजीने गावापासून तीन किलोमीटर अंतरावरील कुडीत्रे गावात पुढील शिक्षणासाठी जाण्यास सांगितले. पुढे बारावीपर्यंत पायपीट सुरूच होती. पुढे शिकत असताना माझ्या आजीची बहिण अर्थात मावस आजी आक्काबाई राजाराम पाखरे हिनेही मला तेवढीच माया लावली. या मावस आजीने तर दूध विकून माझे पालन पोषण केले. पदवीच्या शिक्षणासाठी कोल्हापूरला पाठविले. माझा आत्मविश्वास कायम वाढविण्याचे काम केले. देव आहे की नाही मला माहिती नाही, पण या दोघी आजींतच मला देव दिसला, हे सांगताना रेखा यांच्या डोळ्यातून अश्रू तरले.
जीवनात मैत्री हे मौल्यवान नातेही मला मिळाले. बालपणातील मैत्रीण नंदिनी मिसाळ-खाडे तसेच इतर मैत्रिणी वर्षा तावडे, किशोरी माने, विद्या पालकर यांनी मला सर्वार्थाने साथ दिली. त्यांचे ऋण कसे फेडावे हे समजत नाही. खाकी वर्दीचे आकर्षण मला पूर्वी पासूनच होते. बारावी झाल्यानंतर मी थेट पोलिस भरतीसाठी मैदानात उतरले. पण त्यावेळी मोझे वय पात्रतेसाठी कमी होते. त्यामुळे माघार घ्यावी लागली पण पोलिस अधिकारी होण्याच्या जिद्दीने मी अभ्यासाला लागले. २००७मध्ये माझे खाकी वर्दीचे स्वप्न साकार झाले. पहिली पोस्टिंग मुंबईत मिळाली. नागपुरात बदली झाल्यानंतर वाडी पोलिस ठाण्याचा चांगला अनुभव आला. त्यानंतर गुन्हे शाखेत बदली झाली. पोलिस आयुक्त अमितेश कुमार, अति. आयुक्त सुनील फुलारी आणि डीसीपी गजानन राजमाने यांनी ॲंटी ह्यूमन ट्रॅफिकिंग युनिट’ची जबाबदारी दिली. कर्तव्यात पारदर्शकता आणि वरिष्ठांनी ठेवलेला विश्वास सार्थ करण्यासाठी झटत आहे, असे रेखा यांनी आवर्जून सांगितले. आजच्या तरुणींना त्या स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा सल्ला देतानाच आपल्या ध्येयाच्या पूर्तीसाठी सर्वार्थाने प्रयत्न करण्याचा सल्लाही त्या देतात.
सासरी मिळाले आईचे प्रेम -
नोकरीसाठी पायपीट सुरू असतानाच सागर यांच्याशी लग्न झाले. बालपणात छत्र हरविल्यामुळे आईचे प्रेम तर मिळाले नाही. पण सासूबाई संजूबाई संकपाळ यांच्या रूपात मला माझी आई मिळाली. त्यांनी कायम प्रोत्साहन दिले.
माणुसकीला साद -
मुंबईत आरे पोलिस ठाण्यात पोस्टिंग असताना एक प्रसंग घडला. एका महिलेला दिवसभर पोलिस स्टेशनमध्ये बसवून ठेवण्यात आले होते. मी रात्री ड्यूटीवर रुजू झाले. त्यावेळी त्या महिलेला सोडून देण्यात यावे असे सांगण्यात आले. मी त्या महिलेशी बोलले तर ती मानसिक आजारी वाटत होती. तिला तिचा पत्ताही आठवत नव्हता. त्यामुळे तिला सोडून देण्यास माझे मन तयार होईना. मला माझ्या आजीची आठवण आली. अन् मी तिला घरी नेले. आंघोळ घातली आणि जेवायला दिले. दुसऱ्या दिवशी मानसोपचार तज्ज्ञाकडे उपचार सुरू केले. काही दिवसानंतर तिने पत्ता सांगितला. तिच्या भावाला कळविण्यात आले. भाऊ आला पण ती मला सोडून जाण्यास तयार नव्हती. अखेर तिला तिचे कुटुंब महत्त्वाचे असल्याने तिला जाऊ दिले. दरम्यानच्या काळात न्यायालयाने तिला सांभाळण्याची जबाबदारी माझ्याकडे दिली होती. हे बळ मला कुठून मिळाले याचा मी विचार केला तेव्हा मला माझ्या आजींची आठवण आली आणि त्यांच्या शिकवणुकीमुळेच माझ्यातील माणुसकी वेळीच जागी झाल्याचे वाटले, असा एक प्रसंगही रेखा संकपाळ यांनी सांगितला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.