नागपूर : ४५ प्रवाशांना घेऊन बर्डीकडे निघालेल्या बसने पेट घेतल्याची थरारक घटना गुरुवारी मेडिकल चौकात घडली. सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नसून सर्व प्रवासी सुखरूप आहेत. मात्र, गेल्या महिन्याभरात धावती आपली बस पेट घेण्याची दुसरी घटना आहे. त्यामुळे वाहनांच्या देखभाल आणि दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याचे पुन्हा उघड झाले आहे.
इंधनाचे दर भरमसाठ वाढल्याने आपली बसमधील प्रवाशांची संख्या वाढली आहे. उमरेड रोडवरील तितूर येथून बर्डीकडे सकाळी नऊ वाजताच्या सुमारास एमएच ३१ एससी ०४१३ क्रमांकाची बस प्रवासी घेऊन निघाली होती. ही बस पावणेदहा वाजताच्या सुमारास मेडिकल चौकातील संगम हॉटेलजवळ पोहोचली.
सकाळी कार्यालयात जाण्याच्या घाईमुळे रस्त्यावर नेहमीप्रमाणेच गर्दी होती. बस येथे इंजिन अधिक गरम झाल्याने बसचालक दिवाकर काकडे यांना संकटाचे संकेत मिळाले. त्यांनी बसमधील ४५ प्रवाशांना तत्काळ खाली उतरविले. सर्वजण खाली उतरताच बसने पेट घेतला. बसमधील अग्निशमन यंत्रही निकामी निघाले. इंजिनमधील ऑईल व डिझेलमुळे बसमधून आगीच्या ज्वाळा निघाल्या. फोमच्या गाद्यांमुळे आग संपूर्ण बसमध्ये पसरली.
दहा मिनिटांत संपूर्ण बसला आगीने कवेत घेतले. अग्निशमन विभागाला कंडक्टर गिरधर सोनवणे यांनी माहिती दिली. लकडगंज व सक्करदरा येथून अग्निशमन बंब काही वेळातच घटनास्थळी दाखल झाले. तत्काळ पाण्याचा मारा सुरू केला. आग विझविल्यानंतर बसचा सांगाडाच उरला होता. बसचालक दिवाकर काकडे यांनी वेळीच संकट ओळखल्याने ४५ प्रवाशांचा जीव वाचला. परंतु या घटनेने महापालिकेच्या परिवहन विभागाचा सुरक्षित प्रवासाचा दावा पोकळ निघाला.
८ मार्चला बचावले ५५ प्रवासी
मागील ८ मार्चला गिट्टीखदान येथे आपली बसच्या ताफ्यातील एमएच ३१ सीए ६१०२ क्रमांकाची बस जळाली होती. या बसमधील ५५ प्रवाशांचा जीव वाचला. महापालिकेने बस चालविण्यासाठी ऑपरेटर कंपन्यांची नियुक्ती केली. या ऑपरेटर कंपन्यांचे बस चालविण्याकडे लक्ष असून देखभाल, दुरुस्तीकडे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. एकप्रकारे नागरिकांच्या जिवाशी खेळणे सुरू असल्याचे चित्र आहे.
भीतीने प्रवासी निःशब्द
वाहनचालकाने तत्काळ बसमधून प्रवाशांना उतरविले. पुढच्याच क्षणी बसला आगीने कवेत घेतले व मोठ्या ज्वाळा तयार झाल्या. बसमधून उतरल्यानंतर अगदी एका मिनिटांत बसने पेट घेतल्याने भीतीमुळे प्रवाशांच्या तोडून शब्दही बाहेर पडत नव्हते. ‘दैव बलवत्तर होते, म्हणून बचावलो, अन्यथा बसबरोबरच आमचाही कोळसा झाला असता’, असे एका प्रवाशाने सांगितले.
बॅटरीतून स्पार्क?
बसला आग लागण्याची अनेक कारणे आहेत. यात बॅटरीतून स्पार्क निघत असताना त्यावर ऑईल पडल्याने आग लागण्याची शक्यता असल्याचे ट्रान्सपोर्ट व्यवसाय व दुरुस्ती करणाऱ्या तज्ज्ञांनी सांगितले. शिवाय वाढलेल्या तापमानात लहान स्पार्कही धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे बॅटरीची तपासणी करण्याची गरज असल्याचेही या तज्ज्ञाने सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.