नागपूर ः शहरातील झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन करण्यासाठी बांधण्यात आलेले एसआरए गाळ्यांमध्ये अक्षरशः नागरिकांना नरकयातना सहन कराव्या लागत आहेत. झिंगाबाई टाकळी परिसरात एसआरए गाळ्यातील पन्नासावर कुटुंब अजूनही विजेची प्रतीक्षा करीत असून, पाण्याची सोय नसल्याने ‘कुठे फसलो` अशी भावना रहिवाशांमध्ये आहे. एवढेच नव्हे नाल्याच्या बाजूनेच हे गाळे असल्याने दुर्गंधी तर प्रसाधानगृहाचे पाईपही तुटल्याने गाळ्याच्या परिसरातच घाण साचली आहे. एकूणच एसआरए गाळे नरकपुरी ठरल्याचेच चित्र आहे.
शहरातील वाढत्या झोपडपट्ट्यांवर नियंत्रणासाठी राज्य सरकारने एसआरए योजना लागू केली. शहरातील अनेक भागात गाळे तयार करण्यात आले. झोपडपट्टीवासींना हे गाळे देण्यात आले. झिंगाबाई टाकळी परिसरात रस्त्यासाठी झोपडपट्टी हटविण्यात आली. येथील झोपडपट्टीधारकांसाठी बाजूलाच एसआरएचे गाळे तयार करण्यात आले. या गाळ्यात येथील झोपडपट्टीवासींना अक्षरशः कोंबण्यात आले. मात्र डोक्यावर छत मिळाल्याने ते समाधानी होते.
वीज, पाणी, सिवेज आदी असल्याचे त्यांना सांगण्यात आले. परंतु राहायला गेल्यापासून अजूनही ५० गाळ्यांच्या या चार मजली इमारतीत वीज पोहोचली नाही. आजूबाजूचा संपूर्ण परिसरात लखलखाट असताना या येथील गाळ्यात कायम अंधाराचे साम्राज्य दिसून येत आहे. काहींनी बाजूच्या घरातून वीज घेतली, तेवढे अपवाद सोडले तर इतरांच्या मुलांचे शैक्षणिक भवितव्यही अंधारात दिसून येत आहे.
वीज नसल्याने आजच्या काळात आवश्यक असलेल्या सुविधांपासूनही येथील नागरिक वंचित आहेत. एक हॉल व एक किचन असलेल्या या गाळ्यांपर्यंत पुरेसे पाणी पोहोचत नाही. ५० कुटुंबांना आवश्यक पाणीही दिले जात नसल्याचे चित्र आहे. इमारतीचे बांधकामही निकृष्ट दर्जाचे आहे.
बाथरूम व संडासमधून बाहेर काढण्यात आलेले पाईप ठिकठिकाणी फुटले तर काही ठिकाणी आता अर्धेच राहिले आहेत. त्यातून दिवसभर घाण गाळ्यांच्या परिसरातच पसरताना दिसून येते. त्यामुळे येथील नागरिकांना कायम दुर्गंधीत राहावे लागत असल्याचे गाळ्यातील निवासी ईश्वर हुमणे यांनी सांगितले.
चार मजली या इमारतीत पाण्याची टॅंक नाही. नागरिकांना एक इंचीच्या नळातून येणारे अल्प पाणी दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या माळ्यावर घेऊन जावे लागते. त्यामुळे अनेकांना कंबरदुखीचा त्रास सुरू झाला. चौथ्या माळ्यावर पाण्याने भरलेले गुंड घेऊन जाताना नागरिकांवर कायम अपघाताची टांगती तलवार दिसून येते.
आमदारांना निवेदन देऊ
या इमारतीत नळजोडणीसंदर्भातील नियमाची महापालिकेनेच पायमल्ली केली. पंधरा मीटरपेक्षा लांब अंतरावरून नळजोडणी देताना ती चार इंचीची देणे आवश्यक आहे. परंतु येथील गाळ्यांमध्ये ७० ते ८० फूटांवरून केवळ एक इंच पाईपची नळजोडणी देण्यात आली. ५० कुटुंबांना या नळजोडणीतून पाणी कसे मिळेल? येथील समस्यांबाबत नागरिकांना सोबत घेऊन आमदारांकडे निवेदन देण्यात येईल.
- अरुण डवरे, माजी नगरसेवक
संपादन : अतुल मांगे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.