nagpur rural
nagpur rural canva
नागपूर

कुठं मृत्यूचं तांडव, तर कुठं सुविधांची वानवा; वाचा नागपूर ग्रामीणमधील कोरोनाचं वास्तव

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : शुद्ध प्राणवायूचे स्त्रोत असलेला ग्रामीण भाग आज कोरोनाच्या संसर्गाने प्रदूषित झाला आहे. गावंच्यागावं कोरोनाच्या विळख्यात सापडली असल्यामुळे रुग्णांना ऑक्सिजन मिळणे दुरापस्त झाले आहे. प्रियजणांना प्राणवायूअभावी तडफडून मरतानाचे दुर्दैव ग्रामस्थांच्या वाट्याला आले आहे. मृत्यूची दिवसागणिक वाढत जाणारी संख्या अधिक चिंता वाढवित आहे. सावनेर, कामठी, पारशिवनी, हिंगणा तालुक्यात तर मृत्यूचे तांडव सुरू आहे. प्रशासनाने ताबडतोब उपाययोजना करुन ग्रामस्थांचे कंठाशी आलेले प्राण वाचवावे, अशी आर्त हाक जिल्ह्यातील जनता देत आहे.

तालुकानिहाय मृत्यूसंख्या -

  • भिवापूर - ३८

  • पारशिवनी - ७४

  • मौदा - ४७

  • नरखेड - ५२

  • कुही - ५४

  • रामटेक - ६२

  • उमरेड - ७५

  • काटोल - ७७

  • कळमेश्वर - ८३

  • हिंगणा - १५९

  • कामठी - २५०

कामठी तालुक्यात आतापर्यंत २५० जणांचा मृत्यू -

तालुक्यात आजपर्यंत ६५२२ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले तर, २५० जणांचा मृत्यू झाला. यात एक महिन्यात तब्बल ११७ बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दररोज बाधित आणि मृत्यूंची संख्या वाढत असल्याने तालुका प्रशासनासह नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

गेल्या एक ते दीड महिन्यांपासून तालुक्यात बाधित रुग्णांची संख्या गतीने वाढत असून शहरात तीन व ग्रामीण भागात दहा, अशा १३ टेस्टिंग टीम कार्यान्वित आहेत. तहसीलदार तथा इन्सिडेंट कमांडर अरविंद हिंगे यांच्या आदेशान्वये गटविकास अधिकारी अंशुजा गराटे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संजय माने यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड चाचणी केंद्र व लसीकरण केंद्र उभारले गेले आहेत. याला ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद मिळत आहे. परंतु, स्थानिक नगर पालिकेच्या उदासीन धोरणामुळे शहरात मात्र अल्प प्रतिसाद दिसून येत आहे. शहरात सात खासगी रुग्णालयासह शासकीय उपजिल्हा रुग्णालयात २० बेडचे कोविड केअर सेंटर तयार करण्यात आले असून रुग्णांची संख्या दुपटीने वाढत आहे. शासकीय उपजिल्हा रुग्णालयात १०० बेडचे तसेच तालुक्यातील कोराडी मंदिरातील सुसज्ज असलेल्या २५० खोल्यांच्या विश्रामगृहात ५०० बेडचे कोविड केअर सेंटर सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

लसीकरणाला पारशिवनी शहरात प्राधान्य -

शहरात कोरोनाची रोकथाम करण्यासाठी तालुक्यातील पाच प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत लसीकरणावर जोर दिला जात आहे. पहिल्या टप्प्यात एकूण१९६५५ लोकांना कोविड लसीकरणाची पहिली लस देण्यात आली. त्यात ६८२हेल्थवर्कर, १५७१ फ्रंट लाईनवर्कर आणि ४५ ते ६० वयोगटातील नागरिकांनाही या लसीचा डोज देण्यात आला. आतापर्यंत पहिल्या टप्प्यात एकूण१८३६८लोकांनी पहिल्या लसीकरणाचा लाभ घेतला. दुसऱ्या टप्प्यात४५९हेल्थकेअर, ५५८फ्रंटलाईन वर्कर यांचे लसीकरण करण्यात आले. ४५ ते६०वयोगटातील २६० नागरिकांनी या लसीचा डोज घेतला आहे. आजपर्यंत तालुक्यात एकूण१९६५५ नागरिकांना कोरोना लसीकरण करण्यात आले आहे. पारशिवनी ग्रामीण रुग्णालयात लसीकरण करण्यात येत आहे.

कुही तालुक्यातील १०९७ रुग्णांची कोरोनावर मात

तालुक्यातील २६४० कोरोनाबाधितांपैकी‌१०९७ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे कुणीही भीती न बाळगता काळजी घ्यावी, असे आवाहन उपजिल्हाधिकारी पर्वनी हर्षा रवीन्द्र पाटील यांनी पत्रपरिषदेत केले. आतापर्यंत कुही तालुक्यातील ४५वर्षांवरील १६८३८ नागरीकांनी लस घेतलेली आहे. तालुक्यात कुही, मांढळ, तितूर, साळवा, वेलतूर, वेळगाव, तारणा, राजोला, जीवनापूर, मांगली येथील केंद्रावर लसीकरण सुरु आहे. कुही येथील कोविड केअर सेंटरवर १२ रुग्ण औषधोपचार घेत असून प्रकृती स्थिर आहे. कोरोनाला हरविण्यासाठी लसीकरण हा उत्तम पर्याय आहे. लस सुरक्षीत आहे, म्हणून ४५ वर्षावरील नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने लस घ्यावी तसेच लोकप्रतिनिधींनी नागरिकांना प्रोत्साहीत करावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी पर्वनी पाटील यांनी केले.

ऑक्सिजन बेड मिळणे दुरापास्त -

नागपूर शहरालगत असलेल्या हिंगणा तालुक्यात कोरोनाचा कहर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दोन मोठे आयुर्वेद रुग्णालये असतानासुद्धा ऑक्सिजनअभावी कोरोना रुग्णांची मोठ्या संख्येत वाढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा हतबल झाली आहे. हिंगणा तालुका आरोग्य विभागाने १७ शासकीय व दोन असे एकूण १९ कोरोना चाचणी व लसीकरण केंद्र सुरू केले आहे. आत्तापर्यंत तालुक्यात कोविशील्ड लसीकरणाचा पहिला डोज ३४,९३३ तर दुसरा डोज ४७७२ जणांना तर कोव्हॅक्सीन पहिला डोज १७३०, तर दुसरा डोज २९३ जणांना देण्यात आला. यामुळे जवळपास तालुक्यात ४८ टक्के लसीकरण झाले आहे. आतापर्यंत ८, ८७३ एकूण कोरोना संक्रमित रुग्ण संख्या झाली आहे. आत्तापर्यंत १५९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोविड रुग्णांना भरती करण्यासाठी लता मंगेशकर हॉस्पिटल डिगडोह व शालिनीताई मेघे हॉस्पिटल वानाडोंगरी येथे व्यवस्था करण्यात आली आहे‌. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पडवे यांच्या नेतृत्वात आरोग्य विभागाची समूह अविरत कार्यरत आहे. मागील आठवडाभरापासून कोरोना रुग्णांना ऑक्सिजन बेड मिळणे दुरापस्त झाले आहे. यामुळे अनेक रुग्णांचा जीव गेला आहे.

ऑक्सिजन बेडचा तुटवडा असला तरी रुग्णांना बेड मिळविण्यासाठी आरोग्य विभाग सातत्याने प्रयत्न करीत आहे. जनतेच्या आरोग्य सुरक्षेला प्राधान्य देण्यात येत आहे.
-डॉ. रविंद्र बनसोड, प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी, हिंगणा

लसीकरण : अर्धे झाले, अर्धे बाकी

लसीकरणासाठी गावपातळीवर वाहतूक व्यवस्था व सोयीच्या ठिकाणी २६ लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. असे असतानाही तालुक्यात झालेल्या लसीकरणाच्या आकडेवारीवरून लसीकरणाला पाहिजे तसा अद्यापही वेग आलेला दिसत नाही. तालुक्यात ४५ वर्षावरील नागरिकांचे लसीकरणासाठी ७१हजार नागरिकांचे उद्दिष्ट गाठायचे असताना आजपर्यंत ३२ हजार१७० नागरिकांचे लसीकरण झाले आहे. अद्यापही पन्नास टक्के लसीकरण होणे बाकी असून मध्यंतरी दोन तीन दिवस लसीकरणाचा तुटवडा झाल्याने नागरिकांचा उत्साह कमी झाला होता. अजूनही बऱ्याच नागरिकांमध्ये लसीकरणाविषयी गैरसमज असल्याने स्वयंस्फूर्तीने लसीकरणासाठी उत्सुक दिसत नाहीत.

ग्रामीण भागात कोरोना महामारीचा कहर -

भिवापूर : कोरोना आजाराचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संख्येत शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात मोठी वाढ होऊ लागली आहे. तालुक्यातील आतापर्यंत बाधित रुग्णांची संख्या १५४७ असून त्यात शहरातील बांधितांची संख्या ३९० तर खेड्यातील बाधितांची संख्या १०६४ आहे. तालुक्याबाहेरील बाधितांचा आकडा ९३ एवढा आहे. त्यापैकी या आजारातून मुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७८२, तर संक्रमित रुग्णसंख्या ७२७ इतकी आहे. यात शहरातील ९४ तर ग्रामीणमधील ५८६ रुग्णांचा समावेश आहे. संक्रमित रुग्णांपैकी ६९७ रुग्ण होमआयसोलेशनमध्ये व कोविड केअर सेंटरमध्ये १८ रुग्ण उपचार घेत आहेत. १२ रुग्ण उपचारासाठी नागपूर व अन्य ठिकाणा ‘रेफर’ करण्यात आलेत. तालुक्यात कोरोनामुळे मरणाऱ्यांचा आतापर्यंतचा आकडा ३८ एवढा आहे. यात शहरातील ११, ग्रामीणमधील २५ तर तालुक्याबाहेरील २ जणांचा समावेष आहे.

कोरोना रुग्णांचा आलेख वाढताच

जलालखेडाः नरखेड तालुक्यात दिवसागणिक कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. आता गाव खेड्यात कोरोना विषाणू पोहोचला असून गावचे गाव आजारी होत आहेत. रुग्णांची संख्या दररोज वाढत असल्याने रुग्णांचा आलेख वाढतच आहे. सध्या नरखेड तालुक्यात १५९१ रुग्ण अ‌ॅक्टिव्ह असून यातील १५०४ रुग्ण गृहविलगिकरणात आहे. ४८ रुग्ण नरखेड येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असून २७ रुग्ण नागपूर येथील शासकीय रुग्णालयात व १२ रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. ५२ जणांचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत २८ हजार लोकांची कोरोना चाचणी करण्यात देखील आली आहे. नरखेड तालुक्यातील २४५४८ जणांचे लसीकरण करण्यात आले असून यापैकी २२६४१ जणांना लसीकरणाचा पहिला तर ९०७ जणांना दुसरा डोज देण्यात आला आहे. सध्या तालुक्यातील उपलब्ध लसीप्रमाणे नऊ लसीकरण केंद्रावर लसीकरणाची सोय करण्यात आली आहे.

काटोल, कोंढाळीत १८ हजारावर लसीकरण -

तालुक्यात कोविड १९ रुग्ण व लसीकरण वेगात असले तरी कोरोना पॉझिटिव्ह आकडा पाच हजार पार गेला असून काटोल शहरात ५६, कोंढाळी परिसर ११ तसेच येणवा व कचारी सावंगा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत तालुक्यातील एकूण कोरोना बळीची संख्या सुमारे ७७ वर पोहोचली आहे. काटोलात एकूण पॉझिटिव्ह रुग्ण ३९७३ यापैकी ३२२८ रुग्ण बरे झाले आहेत, अ‌ॅक्टिव्ह ११८५ रुग्णांचा समावेश असल्याचे ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.सुधीर वाघमारे यांनी सांगितले. काटोलात ११५७ होम क्वारंटाईन, कोविड केंद्र२२, नागपूरला हलविलेल्या सहा रुग्णांचा समावेश आहे. तालुक्यात १८हजारावर लसीकरण झाले आहे. काटोल ग्रामीण रुग्णालय, लता मंगेशकर हॉस्पिटल काटोल, पारडसिंगा कोविड केंद्र, डॉ. बंड हॉस्पिटल कोविड केंद आदी ठिकाणी रुग्णांना लस मिळत असून कोंढाळी, येणवा, कचारी सावंगा प्राथमिक केंद्र, याशिवाय तालुक्यात १८ कोविड लसीकरण केंद्र सुरू आहे.

केदार साहेब, कळमेश्‍वरसाठी काहीतरी करा हो !

तालुक्यात संक्रमिताच्या उपचारार्थ एकही रुग्णालय नाही. दररोज रुग्णांचा उपचाराअभावी मृत्यू होत आहे. तालुक्यातील सर्व शासकीय रुग्णालयांचा कारभार हा 'रामभरोसे' झालेला असताना आातातरी मंत्रीमहोदय केदार यांनी लक्ष द्यावे, अशी नागरिक हाक देत आहेत. कळमेश्वरशहर व तालुक्यातील सर्व रुग्णांसाठी प्रशासनाने केवळ एका कोविड केअर सेंटरची स्थापना करत पाठ थोपटवून घेतली. या सेंटरमध्ये ना कुठले डॉक्टर, ना लागणाऱ्या औषधी, ना उपचार वा तंत्रज्ञान. येथील कारभारच एकंदरित 'रामभरोसे' झालेला असताना एकही जिल्ह्याचा वैद्यकीय अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी फिरकताना दिसत नाही. ग्रामीण भागात पं.स.चे अधिकारी व पदाधिकारी लक्ष देत नाही. पालीका प्रशासन व अधिकारी, तहसीलचे अधिकारी वा कर्मचारी येथील कारभाराकडे देताना दिसत नाही. सर्वांनी या महामारीत पळ काढल्याचे भीषण वास्तव बघायला मिळते.

उमरेडात ४० ऑक्सिजन बेडवर आरोग्य यंत्रणेचा भार -

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने उमरेड शहरासोबतच ग्रामीण भागाला विळखा घातला असून दर दिवसाला शंभरच्या आसपास कोरोना रुग्ण सापडत आहेत. मृत्यूचे प्रमाण देखील दिवसेंदिवस वाढतच आहे. त्याच्या तुलनेत आरोग्ययंत्रणा अपुरी ठरत आहे. आरोग्य विभागाच्या कोरोना केअर केंद्रात ४० ऑक्सिजन बेडवर सर्व भार आहे. उपजिल्हा रुग्णालय नसल्याने येथे अतिदक्षता विभाग किंवा व्हेंटिलेटरची सोय नसल्याने ज्यांची प्रकृती गंभीर चिंताजनक असते, त्यांना नागपूरच्या शासकीय रुग्णालयाची धाव घ्यावी लागते. परिणामी काहींचा वाटेतच मृत्यू होतो. बरेच कोरोना रुग्ण घरातच अखेरचा श्वास घेतानाचे चित्र निर्माण झाले आहे. दररोज परिचयाच्या व्यक्ती गेल्याच्या वार्ता कानावर येत आहेत. उमरेडच्या ग्रामीण रुग्णालयासोबतच तालुक्यात एकूण ८ लसीकरण केंद्रावर कोरोना लसीकरण मोहिम राबविली जात असली तरी, नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत उदासिनता दिसून येते. येत्या दोन दिवसांमध्ये स्थानिक नूतन आदर्श महाविद्यालयाच्या नव्याने बांधकाम पूर्ण झालेल्या इमारतीमध्ये उमरेडकरांसाठी ६० नव्या ऑक्सिजन बेडची सोय करण्यात येईल, अशी ग्वाही आमदार राजू पारवे यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली .

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral: पवार गटाचं काम करणाऱ्याला दत्ता भरणे यांच्याकडून शिवीगाळ? व्हिडिओ रोहित पवारांकडून शेअर

मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे का पोहचल्या अजित पवारांच्या निवासस्थानी? भेटीमागे नेमकं काय दडलंय?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : महाराष्ट्रात 11 वाजेपर्यंत 18.18 टक्के मतदान; बारामतीमध्ये सर्वात कमी मतदानाची नोंद

Lok Sabha 2024: बारामतीत मोठा घोळ! बँकांचं पासबुक ओळखपत्र म्हणून न स्विकारण्याच्या सूचना; काय आहे प्रकरण?

EVM वर कमळाचं फुलं दिसत नसल्याने आजोबा संतापले...बारामती मतदारसंघात नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT