उमरेड : सोयाबीनचा दर्जा खालावला असल्याने चिंतातुर झालेले शेतकरी.
उमरेड : सोयाबीनचा दर्जा खालावला असल्याने चिंतातुर झालेले शेतकरी. 
नागपूर

दुहेरी संकटाने शेतकऱ्यांचे निघतेय दिवाळे, अल्पभूधारकांच्या शेतीची झाली माती

सतिश तुळस्कर

उमरेड (जि.नागपूर) : दरवर्षी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कृषी उत्पन्न बाजार समिती शेतमालाने गजबजून जायची. यार्डात सर्वत्र सोयाबीनची भरलेली पोतीच पोती असायची. एकूणच खरीप हंगामातील मालाची अन् शेतकरी बांधवांची रेलचेल राहायची. याशिवाय सोबतच कापसाचे ढीग लागायचे. परंतु यंदाच्या हंगामात अवघ्या जगावर आलेले कोरोनारुपी संकटाने समस्त जीवसृष्टीला विस्कळीत केले. अवकाळी पाऊस तसेच परतीच्या पावसाने सोयाबीन, कापूस व धान पिकाची राखरांगोळी केल्याने शेतकरी हवालदिल झाला. या सर्व संकटांवर मात करत काही प्रमाणात पीक तग धरून उभे होते. मात्र उर्वरित मालाचा दर्जा खालावलेला दिसून येतो.

 उत्पादन घटले, हाती पैसाही नाही !
आतापर्यंत सोयाबीनची आवक सुरू झाल्यापासून ५५ हजार क्विंटलची आवक झाली. ४ हजार ३१० रुपया पर्यंतचा भाव असल्याचे सभापती रुपचंद कडू यांनी सांगितले. दिवाळीपूर्वीच्या बाजारात दरवर्षी १० ते १२ हजार पोती सोयाबीनची आवक प्रत्येक बाजाराच्या दिवशी असायची. परंतु यावर्षी फक्त ४ ते ५ हजार पोती इतकीच आहेत. चांगल्या मालाला योग्य भाव जरी मिळत असेल तरी अनेक अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या मालाचा दर्जा खालावला असल्याने त्यांना हवा तसा भाव मिळणार नाही, अशी शक्यता वाटते. ज्या शेतकऱ्यांना एकरी एक-दोन पोत्यांची उतारी आली आहे, त्यांनी पिकाची काढणी न करता वैतागून उभ्या पिकात रोटवेटर फिरविले असल्याचे त्यांनी सांगितले  .तसेच कापूस खरेदीला सुरुवात होते, त्यादिवशी दरवर्षी १५० ते २०० गाड्या मालाची आवक असायची. परंतु यंदा सोमवारी कापूस खरेदी विक्रीला शुभारंभ झाला तेव्हा त्या दिवशी फक्त १०८ गाड्या कापूस बाजार समितीच्या यार्डात आल्या. त्याला ४६०० ते ४८२५ असा भाव देत एकूण १०८५.२५ क्विंटल कापूस खरेदीदार व्यापाऱ्यांनी खरेदी केला. कापूस विक्रेत्या शेतकऱ्यांना ‘लकी ड्रॉ’ कुपन देण्यात आले. मार्केट यार्डात कापूस खरेदीला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

अधिक वाचाः बेपत्ता 'वीर' 12 तासांत आढळला; घुग्घुस ते नागपूर प्रवासाचे गूढ गुलदस्त्यात

यंदा लावलागवडीचा खर्चही निघणार नाही!
गुरुवारी बाजार समितीच्या बाजाराच्या दिवशी ‘सकाळ’ प्रतिनिधीने जाऊन काही शेतकऱ्यांशी संवाद साधला. केशव विठोबा म्हैसकर (राहणार पाहमी) या ज्येष्ठ शेतकऱ्याची ६ एकर ठेक्याची शेतजमीन आहे. त्यात त्यांनी सोयाबीनची लागवड केली असता त्यांच्या हाती पाच पोती सोयाबीन आले. तेही काळे पडलेले दर्जाहीन. त्यामुळे त्यांची यंदाची दिवाळी ही अंधारमय होणार असल्याचे एकंदरीत परिस्थिती पाहून दिसून आले. आपली व्यथा सांगताना ते भाबूक झाले. ‘अजी मी दरवर्षी ठेक्याचे वावर करतो, पण यंदा लावलागवडीचा खर्चही निघणार नाही, अन् वाट्याले कर्ज आले आहे जी. मायबाप सरकार काही मदत करेल तर उपकार होईल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. याशिवाय भगवान मोंढे (राहणार हिवरा -हिवरा)या शेतकऱ्याकडे ५ एकर शेतजमीन असून त्यांनी अडीच एकरात सोयाबीनचे तर उर्वरित जमिनीत कापसाचे पीक घेतले, तर अवकाळी पावसाने सोयाबीन गेले. परंतु कापसाने तारले असल्यासाने त्यांची बाजू बरी राहिली, असे मत मांडले .

शेतकऱ्यांनी शेतमाल तारण कर्ज योजनेचा लाभ घ्यावा !
यंदाच्या हंगामात सोयाबीन सोबतच कापसाची आवक मंदावली आहे. जरी सोयाबीनला बऱ्‍यापैकी भाव मिळत असला तरी आवक नसल्याने शेतकऱ्यांची दिवाळी अंधारमय होण्याची चित्र दिसून येते. याशिवाय कापसाला सध्या मिळत असलेला भाव हा ४८०० ते ४८५० असा असून तो हमीभावापेक्षा कमीच आहे. शासनाने ठरवून दिलेला हमीभाव हा ५००० रुपये प्रति क्विंटलचा असून तो शेतकऱ्यांना मिळायलाच हवा. त्यासाठी शासनाने शासकीय कापूस खरेदी केंद्राची निर्मिती उमरेड बाजार समितीत करण्यात यावी, अशी मागणी आम्ही बाजार समितीच्या वतीने केली आहे. शेतमाल तारण कर्जयोजना ही शेतकऱ्यांचा सेवेत यंदाही आहेच. तेव्हा ज्यांचा सोयाबीन दर्जेदार असेल त्यांनी योजनेचा लाभ घ्यावा, कारण येत्या काळात भाव ५ हजार रुपयांपर्यंत मिळण्याची शक्यता आहे .
-रुपचंद कडू
 सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती ,उमरेड

पीक समाधानकारक होईल तऱच भाव चांगला मिळेल
बाजार समितीत काम करणाऱ्या तमाम अडत्ये दलालांचे उत्पन्न हे शेतकऱ्यांच्या शेतमालावर अवलंबलेले आहे. जेव्हा शेतकऱ्यांना समाधानकारक पीक होईल आणि मालाला भाव चांगला मिळेल, परिणामी आवडत्या दलालांनाही योग्य नफा मिळेल. परंतु यंदाच्या काळात शेतकऱ्यांना या संकटांना सामोरे जावे लागत आहे. त्याचे पडसाद अडते दलालांच्या मिळकतीवर उमटल्याचे दिसून येते. त्यामुळे यंदाची दिवाळी ही शेतकऱ्यांसाठी अडचणीची जाणार असे चित्र दिसून येते.
-सारंग येवले
अडत्ये दलाल

संपादनःविजयकुमार राऊत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT