1983-84 च्या मोसमात विदर्भ क्रिकेट संघटनेच्या सिव्हिल लाइन्स मैदानावर मध्य प्रदेशविरुद्धच्या मध्य विभाग रणजी सामन्यात फटका मारताना सुहास फडकर.  
नागपूर

Video : फडकर यांनी दिला रणजीतील 37 वर्षांपूर्वीच्या अजरामर खेळीला उजाळा

नरेंद्र चोरे

नागपूर : कोणत्याही खेळाडूची खरी परीक्षा ही संकटकाळात होत असते. आणीबाणीच्या प्रसंगीच त्याच्या कौशल्याचा कस लागतो. असाच एक बाका प्रसंग 37 वर्षांपूर्वी विदर्भ रणजी संघावर घरच्याच मैदानावर (व्हीसीए सिव्हिल लाइन्स) ओढवला होता. मात्र, कर्णधार सुहास फडकर यांनी झुंझार शतक झळकावून संघावरील नामुष्की दूर केली. पहिल्या डावात अवघ्या 91 धावांत गारद होऊन आणि फॉलोऑन बसूनही विदर्भाने तो सामना अनिर्णीत राखण्यात यश मिळविले होते. पराभवाच्या उंबरठ्यावर उभ्या विदर्भासाठी तो निश्‍चितच नैतिक विजय होता.

अत्यंत रोमांचक ठरलेला तो तीनदिवसीय सामना 1983-84 मध्ये यजमान विदर्भ आणि मध्य प्रदेश यांच्यात व्हीसीएच्या हिरवळीवर खेळला गेला. मध्य प्रदेशचे नेतृत्व सलामीवीर संजीवा रावकडे तर, विदर्भाचे सुहास फडकरकडे होते. पाहुण्या संघात संजीवासह महान फलंदाज सय्यद मुश्‍ताक अलींचा मुलगा गुलरेज अली, अष्टपैलू गोपाल राव व मेहमूद हसनसारखे दिग्गज खेळाडू होते, तर विदर्भ संघात फडकर, जयंतीलाल राठोड, हेमंत वसू, राजू पनकुले, सुनील हेडाऊ, विकास गवते व युवा प्रवीण हिंगणीकरसारखा नव्या दमाचा उभरता खेळाडू होता.

"स्पोर्टिंग विकेट'वर मध्य प्रदेशने मोठी धावसंख्या रचण्याच्या इराद्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. संजीवाच्या (188 धावा) शतकी तडाख्याच्या बळावर 8 बाद 372 धावांवर पहिला डाव घोषित केला. खेळपट्टी खूप खराब नव्हती. केवळ संयमाने खेळण्याची आवश्‍यकता होती. दुर्दैवाने विदर्भाच्या एकाही फलंदाजाने खेळपट्टीवर टिकून राहण्याचे धाडस दाखविले नाही. त्यामुळे होऊ नये तेच घडले. विदर्भाचा पहिला डाव अवघ्या 91 धावांतच गडगडला आणि संघावर फॉलोऑनची नामुष्कीही आली. डावखुरा मध्यमगती स्विंग गोलंदाज गुलरेजने सकाळचे दव व नव्या चेंडूचा फायदा घेत केवळ 27 धावांमध्ये सात बळी टिपून विदर्भाची दाणादाण उडविली. गोपाल रावने तीन गडी बाद करून त्याला सुरेख साथ दिली. मध्य प्रदेशकडे 282 धावांची विशाल आघाडी असल्याने विदर्भाचा पराभव जवळजवळ निश्‍चित मानला जात होता.

धनवटेंचा कानमंत्र अन्‌...
विदर्भाचा संघ पहिल्या डावाची लढाई हरला होता; पण युद्ध नव्हे. कोणत्याही परिस्थितीत सामना सोडायचा नाही, अशी खूणगाठ बांधून विदर्भाचे फलंदाज 15 मिनिटांच्या ब्रेकनंतर पुन्हा फलंदाजीसाठी मैदानात उतरले. पण, याअगोदर व्हीसीएचे तत्कालीन सचिव राजीव धनवटे यांनी "ड्रेसिंग रूम'मध्ये जाऊन मनोबल खचलेल्या वैदर्भी खेळाडूंचा आत्मविश्वास वाढविला. त्यांना त्यांच्या क्षमतेचा परिचय करून दिला.

"प्लिज, कुणीही गुलरेजला बॅकफूटवर खेळू नका' असा सर्वांना कानमंत्र दिला. शिवाय संघाचा आधारस्तंभ असलेले फडकर यांना विकेटवर खंबीरपणे उभा राहण्याचा सल्ला दिला. सुदैवाने त्यांचा हा सल्ला मनावर घेत विदर्भाच्या फलंदाजांनी दुसऱ्या डावात चिवट प्रतिकार करत 394 धावांचा डोंगर उभारून मध्य प्रदेशच्या आशेवर पाणी फेरले.

विदर्भाला पराभवापासून वाचविण्यात शतकवीर फडकर यांचा मोलाचा वाटा राहिला. फडकर यांनी आपले बॅंक सहकारी सुनील हेडाऊ यांच्यासोबत चौथ्या गड्यासाठी विक्रमी 232 धावांची भागीदारी रचून विदर्भाला पराभवाच्या नामुष्कीपासून वाचविले. फडकर यांनी 161, तर हेडाऊ यांनी 88 धावांचे योगदान दिले होते. त्या दिवशी विदर्भाच्या या तारणहार जोडीने अख्खा दिवस मध्य प्रदेशच्या माऱ्याचा धैर्याने सामना केला होता. ती ऐतिहासिक लढत अनिर्णीत सुटली; पण नैतिक विजय विदर्भाचाच झाला. फालोऑन असताना दुसऱ्या डावात सर्वाधिक धावा करण्याचा अनिल देशपांडे यांचा (162) विक्रम फडकरांना मोडता आला नाही; पण माझ्या शतकी खेळीने विदर्भ सामना वाचवू शकला, याचे समाधान आहे, असे फडकर यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NPS गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! एक्झिट नियमांत बदल; PFRDA चा मोठा निर्णय, नवे नियम काय?

Gen Z Workplace Trends 2025: ‘जॉब हगिंग’पासून ‘कॉन्शस अनबॉसिंग’पर्यंत; 2025 मध्ये Gen Z ने अशी बदलली करिअरची व्याख्या

Year-Ender 2025 : क्रॅश ते कमबॅक! 2025 मधील शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची झोप उडविणारे टॉप 10 चढ-उतार

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये एसटी बसला आग लागल्याची घटना

2025 मध्ये ट्रेकिंगचं चित्र बदललं! भारतातील ‘या’ 5 नव्या ट्रेक्सनी थराराची उंची गाठली

SCROLL FOR NEXT