नागपूर : ज्येष्ठ नागरिकांना प्रवासात सवलत देण्यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी)ने स्मार्टकार्ड योजना आणली. स्मार्टकार्ड बनविण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांची सध्या धावपळ सुरू आहे. पण यासाठी मोरभवन आगारात एकच खिडकी असल्याने ज्येष्ठांच्या लांब रांगा लागत आहे. तेथे छतही नसल्याने ऊन, पाऊस सोसत ज्येष्ठ नागरिक रांगेत उभे असतात. शिवाय पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था नसल्याने मोरभवन आगारात ज्येष्ठांचे हाल होत आहेत.
ओळखपत्र दाखवून ६५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या प्रवासात ५० टक्के सवलत सुरू आहे. मात्र, १ जुलैपासून सवलतीचा लाभ घेणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना महामंडळाने स्मार्टकार्ड बंधनकारक केले आहे. सवलत मिळावी म्हणून ज्येष्ठ नागरिक आगारात गर्दी करीत आहेत. शहरात गणेशपेठ आगार, राजभवन बसस्थानक आणि मोरभवन आगारात स्मार्टकार्डची सेवा सुरू आहे. सीताबर्डीतील मोरभवन आगार शहराच्या केंद्रस्थानी आहे.
त्यामुळे शहरातील कोणत्याही कोपऱ्यात राहणाऱ्या नागरिकांना येथे येणे सोपे जाते. म्हणून बहुसंख्य ज्येष्ठ नागरिक येथे स्मार्टकार्डसाठी येत आहेत. सकाळी ९ वाजतापासून ज्येष्ठ नागरिक रांगेत उभे राहतात. आगारात स्मार्डकार्डसाठी एकच खिडकी असल्याने गर्दी वाढत असल्याचे चित्र आहे. डोक्यावर छत नाही. त्यामुळे ऊन, पाऊस सहन करीत ज्येष्ठांना रांगेत राहावे लागते. येथे एसटी महामंडळाकडून पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था करण्यात आली नसल्याने ज्येष्ठांमध्ये नाराजी आहे.
शनिवारी सर्व्हर डाऊन
स्मार्टकार्डची प्रक्रिया ऑनलाइन आहे. ज्येष्ठांच्या बोटांचे ठसे, ओटीपी नंबर घेतले जात आहे. शनिवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास सर्व्हर डाऊन झाले. ते बराच वेळ सुरू न झाल्याने ज्येष्ठ नागरिकांना परत जावे लागले. त्यामुळे त्यांना आणखी त्रास सहन करावा लागला. शनिवारी राज्यभरातच सर्व्हर डाऊन असल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले.
१ जुलैनंतरही सुरू राहणार प्रक्रिया
१ जुलैपासून स्मार्टकार्ड बंधनकारक करण्यात आले असले तरी कार्ड बनविण्याची प्रक्रिया निरंतर सुरू राहणार आहे. मात्र, स्मार्टकार्ड नाही त्यांना प्रवासात सवलत मिळणार नसल्याचे महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
मला मधुमेह व रक्तदाबाचा आजार आहे. सकाळी १० वाजतापासून रांगेत उभा आहे. गर्दीमुळे आपला नंबर जाऊन नये म्हणून लघुशंकेलाही जाऊ शकलो नाही. स्मार्टकार्डसाठी दोन खिडक्या सुरू ठेवल्यास हा त्रास कमी होईल.
- परमेश्वर सोनटक्के, ज्येष्ठ नागरिक
ज्येष्ठ नागरिकांची गर्दी पाहता दोन खिडक्या सुरू ठेवायला हव्यात. भर उन्हात वृद्ध उभे आहेत. येथे पिण्याच्या पाण्याची साधी व्यवस्था सुद्धा करण्यात आली नाही. उन्हात रांगेत उभे राहावे लागत असल्याने त्रास होतो.
- गंगाधर कापसे, ज्येष्ठ नागरिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.