नागपूर : महाराष्ट्र शासनाच्या नागपूर येथील वस्त्रोद्योग आयुक्तांच्या स्वीय सहायकाने एका एजन्सीचालकाला बिल मंजूर करण्यासाठी ५ लाख रुपयांची लाच मागितली. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुन्हा दाखल केला. नितीन सुरेश वर्मा (वय ५७) असे स्वीय सहायकाचे नाव आहे.
न्यू ज्ञानेश्वरनगरात राहणाऱ्या तक्रारदार व्यक्तीची सिक्युरिटी गार्डची एजन्सी आहे. सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागाअंतर्गत सिव्हिल लाइन येथे सहकारी सूतगिरणी आहे. त्या ठिकाणी तक्रारदार यांचे एकूण ८ सिक्युरिटी गार्ड नियुक्तीस आहेत. त्यांचे ऑक्टोबर २०१५ ते मार्च २०१९ या कालावधीतील एकूण ३४ लाख ५६ हजार रुपयांच्या बिलाचा धनादेश तक्रारदार यांना प्राप्त झाला. परंतु, एप्रिल २०१९ ते नोव्हेंबर २०१९ या कालावधीचा आणि डिसेंबर २०१९ ते ऑगस्ट २०२० या दरम्यानचे एकूण ९ लाख ४६ हजार रुपये बिल मिळणे बाकी होते.
या वेतनाचे देयक प्रादेशिक उपायुक्त वस्त्रोद्योग नागपूर तथा अभिरक्षक, विणकर सहकारी सूतगिरणी मर्यादित नागपूर यांच्या कार्यालयातून प्राप्त होत असल्याने तक्रारदार हे वस्त्रोद्योगाचे आयुक्त कार्यालयात गेले. वस्त्रोद्योग आयुक्तांचे स्वीय सहायक नितीन सुरेश वर्मा यांची भेट घेतली. तक्रारदारास नितीन वर्माने ७ लाख रुपयांची लाच मागितली. मात्र, तक्रारदाराला लाच द्यायची नव्हती. त्यामुळे त्यांनी एसीबी कार्यालयात तक्रार केली.
एसीबीच्या पोलिस अधीक्षक रश्मी नांदेडकर यांनी अपर पोलिस अधीक्षक राजेश दुद्दलवार यांच्या मार्गदर्शनात पीआय भावना धुमाळे यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. एसीबीने लावलेल्या सापळ्यात स्वीय सहायक नितीन वर्मा हा ७ लाखांची लाच मागून ५ लाख रुपये लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविताना अडकला. या प्रकरणी एसीबीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संपादन : मेघराज मेश्राम
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.