नागपूर - तणावात असलेल्या १९ वर्षीय विद्यार्थ्याने महाविद्यालयाच्या इमारतीमधील तिसऱ्या माळ्यावरून उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (ता.१२) सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिवम मोरेश्वर कटरे (रा. दाभा) असे विद्यार्थ्याचे नाव असून तो सेंट फ्रान्सिस डिसेल्स (एसएफएस) महाविद्यालयातील विद्यार्थी आहे. तो बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन (बीसीए) द्वितीय वर्षाला शिकत होता. आज सकाळी महाविद्यालयात परीक्षा देण्यासाठी आला होता. परीक्षा संपल्यावर तो तिसऱ्या माळ्यावर गेला आणि उडी मारली. अचानक तो खाली पडल्याचे विद्यार्थ्यांना दिसून आले. शुभमच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. मित्रांनी त्याला कोराडी मार्गावरील एका खासगी रुग्णालयात नेले. मात्र, उपचारादरम्यान तो मरण पावला.
शिवमचे वडील मोरेश्वर कटरे (वय ४६) हे इलेक्ट्रिशियन आहेत. त्याचा लहान भाऊ जी.एस. वाणिज्य महाविद्यालयात बारावीला शिकतो.गेल्या काही दिवसांपासून तणावात असल्याचे तो मित्रांजवळ बोलला होता. ‘माझ्याकडून ते होऊ शकणार नाही’ असे शुभम असे म्हणायचा. मित्रांशीही बोलणे जवळपास बंद केले होते. याप्रकरणी पोलिसांनी प्राथमिक तपासात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
प्राध्यापकांचा गाडी देण्यास उशीर ?
शिवमने तिसऱ्या माळ्यावरुन उडी घेतल्यावर तो रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला होता. यावेळी त्याला दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी प्राध्यापकांनी संवेदनशीलता दाखवत कार काढणे अपेक्षित होते. मात्र, यावेळी प्राध्यापक एकमेकांकडे बघत असल्याचे दिसून आले. १५ मिनिटे वाया गेल्याने उपचारास उशीर झाला आणि प्रकृती बिघडल्याचा आरोप आरोप कुटुंबीयांनी केला आहे. दरम्यान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के.टी. थॉमस यांना संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
तीन तासांचे बिल १ लाख १० हजार रुपये
जखमी शिवमला ज्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले तेथे त्याच्या वडिलांना आधी ४० हजार रुपये भरण्यास सांगण्यात आले. साधारण तीन तासानंतर रुग्णालयातच शिवमचा मृत्यू झाला. मात्र, तीन तासात रुग्णालयाने १ लाख १० हजार रुपये बील काढले. प्रथम पालकांनी ४० हजार रुपये भरले होते. मात्र, परिस्थिती नसल्याने त्यांना उर्वरित ७० हजार रुपये भरता येणे शक्य नव्हते. तरुण मुलाच्या आत्महत्येने आधीच ते मानसिक धक्क्यात आहेत. त्यातच आणखी ७० हजार रुपये भरण्याची त्यांची परिस्थिती नाही. ‘आम्ही रुग्णालय प्रशासनाशी या संबंधात बोलू’ असे आम आदमी पार्टीचे प्रभात अग्रवाल यांनी सांगितले.
बाबा मला माफ करा
काही दिवसांपासून तणावात असलेल्या शिवमने इमारतीवरून उडी मारण्यापूर्वी त्याने ‘बाबा मला माफ करा, तुम्ही माझ्यासाठी खूप केले. मात्र, आता मला जगायचे नाही’ असे म्हणून उडी घेतली. यावेळी त्याच्याजवळ कुठलीही चिठ्ठी नसल्याचे आढळून आले.
पेट्रोल पिल्याची माहिती
आत्महत्या करण्यापूर्वी शिवमने पेट्रोल पिल्याची माहिती समोर आली आहे. रुग्णालयात घेऊन जात असताना ही बाब मित्राला सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यामुळे आज तो आत्महत्या करण्याच्या दृष्टीनेच आला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.