नागपूर : भारतीय रेल्वेने देशभरात 30 विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. पण, या गाड्यांना केवळ वातानुकूलित डबेच राहणार असून, राजधानी एक्स्प्रेसच्या दराने भाड्याची आकारणी केली जाणार आहे. यामुळे अडकून पडलेले मजूर आणि गरिबांना तूर्त दिलासा मिळू शकणार नाही.
वैद्यकीय तपासणी व अन्य प्रक्रियेसाठी प्रवाशांना गाडीच्या वेळेच्या दीड तास आधी रेल्वेस्थानकावर पोहोचणे आवश्यक करण्यात आले आहे. गर्दी टाळण्यासाठी कन्फर्म तिकीट असणाऱ्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. 12 ते 20 मे दरम्यान या गाड्या धावतील. त्यातील आठ गाड्यांना नागपूर रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.
मंगळवारी (ता.12) बेंगळूरहून सुटणारी गाडी बुधवारी (ता.13) नागपुरात पोहोचेल. करोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रत्येक रेल्वे स्थानकावर वैद्यकीय पथक हजर राहणार आहे. प्रवाशांची वैद्यकीय तपासणी केली जाईल. सर्वच गाड्यांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय श्रेणी डबे राहणार आहेत. पण, प्रवाशांना ब्लॅंकेट, चादर किंवा पडदे मिळणार नाही. तसेच गाडीत पेंट्रीकारही नसेल.
काही प्रमाणात आयआरसीटीसीकडून खाद्यपदार्थ, पाणी दिले जाणार असले तरी प्रवाशांनीच जेवणाचा डबा, पिण्याचे पाणी सोबत आणण्याचा आग्रह धरला जाणार आहे. गाड्यांचे आरक्षण केले असल्यास गाडी सुटण्याच्या 24 तासापूर्वीपर्यंत तिकीट रद्द करता येईल. त्यासाठी तिकिटाच्या 50 टक्के रक्कम तिकीट रद्द शुल्क आकारले जाईल.
प्रवासात मास्क बंधनकारक आहे. निर्जंतुकीकरण आवश्यक आहे. रेल्वे स्थानकावर प्रवेशाचा व बाहेर पडण्याचा असे दोन्ही मार्ग वेगळे असतील. तिकीट केवळ आयआरसीटीसीच्या साईटवरूनच मिळेल. प्रवाशांनी एकदम तिकीट मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याने सोमवारी रात्रीपर्यंत तिकीट घेण्यात अडचणी येत होत्या.
नवी दिल्ली-बंगळुरू आणि बंगळूरू-नवी दिल्ली स्पेशल ट्रेन दररोज धावेल. या गाडीला अनंतपूर, गुंटकल, सिकंदराबाद, नागपूर, भोपाळ, झाशी स्थानकावर थांबा आहे. 13 मेपासून नवी दिल्ली- चेन्नई ट्रेन आठवड्यात शुक्रवार आणि रविवार असे दोन दिवस, तर 15 मेपासून चेन्नई- नवी दिल्ली ट्रेन धावेल. या गाडीला विजयवाडा, वारंगल, नागपूर, भोपाळ, झाशी, आग्रा येथे थांबा आहे. 14 मे रोजी बिलासपूर-नवी दिल्ली, 12 मे रोजी नवी दिल्ली-बिलासपूर ट्रेन रवाना झाली. आठवड्यातून दोन दिवस धावणाऱ्या या गाडीला रायपूर, नागपूर, भोपाळ, झाशीत थांबा आहे. 17 मे रोजी नवी दिल्ली-सिकंदराबाद आणि 20 मे रोजी सिकंदराबाद-नवी दिल्ली ट्रेन धावेल. या गाडीला नागपूर, भोपाळ, झाशी स्थानकावर थांबा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.