नागपूर : उत्तर प्रदेशातील मूकबधिर मुलगा घरापासून दुरावला. बोलताच येत नसल्याने कुटुंबीयांची माहितीही देता येत नव्हती. पाटणकर चौकातील बालगृह प्रशासनाकडून आधार कार्ड काढण्याचे प्रयत्न सुरू होते. त्यात मुलाचे यापूर्वीच आधार कार्ड निघाले असून तो उत्तर प्रदेशातील असल्याची माहिती पुढे आली. त्यावरून बालगृह प्रशासनाने त्याच्या पालकांचा शोध घेतला. तब्बल अडीच वर्षांनंतर बाप-लेक समोरासमोर येताच दोघांनीही भावनांना वाट मोकळी करू दिली. या हळव्या प्रसंगाने बालगृहाच्या भक्कम इमारतीलाही पाझर फुटला.
शिवम चौहान असे पालक परत मिळाले सुदैवी बालकाचे नाव आहे. तो उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातील इटोरी बाजारचा राहणारा आहे. अचानक तो कुटुंबापासून दुरावला. मूकबधिर असल्याने त्याला मनातील भावना कळत नव्हत्या. कुणी बोललेलेही त्याला कळत नव्हते. अशात तो भटकत नागपूर रेल्वेस्थानकावर पोहोचला. रेल्वे चाइल्ड लाइनच्या मदतीने लोहमार्ग पोलिसांमार्फत ५ ऑगस्ट २०१९ रोजी खुले निवारागृहात ठेवण्यात आले. तिथून बाल कल्याण समितीच्या आदेशाने १ सप्टेंबर २०१९ रोजी चंद्रपूरच्या बालगृहात दाखल करण्यात आले. नावही सांगता येत नसल्याने त्याला जयंत नाव देण्यात आले. १३ मार्च २०२० रोजी तो पुन्हा नागपूरच्या बालगृहात परतला. या दरम्यानच्या कालावधीत त्याचे आधार कार्ड तयार करून घेण्याचे अनेकदा प्रयत्न करण्यात आले. पण, सातत्याने ते रिजेक्ट व्हायचे. अखेर अडचण दूर करण्यासाठी संस्थेच्या अधीक्षकांनी मानकापूर येथील आधार कार्ड सेंटरच्या व्यवस्थापकांसोबत संपर्क साधून अडचण दूर करण्याबाबत सूचना केली. त्यांनी स्वतः पडताळणी केली असता मुलाचे यापूर्वीच आधार कार्ड तयार करण्यात आले असून हाताचे ठसे सारखे येत असल्याने कार्ड निघत नसल्याची बाब समोर आली. हरवलेला मुलगा सापडल्याच्या बातमीने घरासह गावात आनंदाचे निर्माण झाले. माहिती मिळताच त्याचे वडील नागपुरात पोहोचले. समोरासमोर येताच बाप आणि मुलगा दोघांनाही अश्रू अनावर झाले. एकमेकांना मिठी घालून ढसाढसा रडू लागले. यावेळी बालगृहाची भक्कम इमारत आणि उपस्थितांनाही गहिवरून आले.
अधीक्षक विनोद डाबेराव, समुपदेशक महेश रणदिवे, दीपक बानाईत, विनोद बोरकर यांच्यासह संस्थेतील अन्य कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे हा मूकबधिर बालक पुन्हा स्वगृही परतला.
हाताच्या ठशांनी मिळाला पत्ता -
आधारकार्ड तयार करताना हाताचे ठसे घेतले जातात. जयंतच्या हाताचे ठसे घेतले असता त्याचा मूळ पत्ता, नाव आणि पालकांची माहिती मिळाली. त्यानुसार बालगृह प्रशासनाने स्थानिक पोलिसांना सूचना देत पालकांचा शोध घेतला. ध्यानी मनी नसताना अडीच वर्षांपूर्वी हरवलेला मुलगा नागपुरात सुखरूप असल्याची माहिती आई वडिलांना मिळाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.