कामठी (जि.नागपूर) : एका स्टिल प्लांटमध्ये काम करणाऱ्या एका कामगाराच्या नावे असलेला प्राथमिक आरोग्य केंद्रातून सहीशिक्क्यानीशी निघालेल्या कोविड 19 रुग्ण तपासणी अहवाल सोशल माध्यमांवर व्हायरल झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
एका पत्राने केला संशय निर्माण
यावरून भोवरी गावातील नागरिकांना आजूबाजूच्या आवंढी व गुमथळा गावांत ये-जा करण्यास मज्जाव केला जात आहे. ग्रामस्थांनी खबरदारी पाळणे सुरू केले असले तरी या गावातील काही दूधविक्रेते, व्यावसायिक दैनंदिनप्रमाणे दुसऱ्याच दिवशी नजीकच्या गावात गेले असता, त्या गावातील लोकांनी त्यांच्याकडे संशयाच्या दिशेने पाहणे सुरू केले आहे, तर कित्येकांना गावात येण्यास बंदी घातली असून, नाईलाजाने नजीकच्या गावातील ग्रामस्थांकडून अपमानाचा त्रास भोगावा लागत असल्याने कोरोनाच्या भीतीने भेदभावपूर्ण वातावरणात वागणूक करीत असल्याची माहिती भोवरी गावातील ग्रामस्थांनी तहसीलदार व पंचायत समितीचे सभापती उमेश रडके यांना सांगितली.
सोशल माध्यमावर कारवाईचे आदेश
याबाबत पं. स. सभापती उमेश रडके यांनी संबंधित अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावून त्या पत्राची वास्तविकता काय, यावर चर्चा करण्यात आली. तसेच या पत्राची शहानिशा करून हलगर्जी करणाऱ्या व सोशल माध्यमांवर व्हायरल करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. कामठीचे तहसीलदार अरविंद हिंगे व गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांनी भोवरी, आवंढी व गुमथळा या गावांना भेटी देऊन नागरिकांना वास्तविकता समजावून सांगितली. विस्तार अधिकारी शशिकांत डाखोळे ग्रामपंचायतीचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
अशी आहे वास्तविकता
छत्तीसगड दुर्ग जिल्ह्यातील 22 वर्षीय युवक रोजगाराकरिता 28 एप्रिलपासून भोवरी येथील दिव्यांश स्टिल कंपनीमध्ये कामाला होता. लॉकडाउन लागू झाल्यामुळे काम नसल्याने तो गावाकडे परतला. तेथे तपासणीकरिता कोरोंटाइन केले असता, त्याचा अहवाल दुर्ग येथे पॉझिटिव्ह आल्याने ती माहिती येथील प्रशासनाला देण्यात आली. स्थानिक प्रशासनाने याची दखल घेत दिव्यांश स्टिल प्लॉंट येथील मजुरांचे ताप स्कॅन केले असता, मजूर तापाने ग्रासित असल्याचे आढळून आले. या सातही मजुरांना प्लॅंटच्याक्वॉटरमध्ये होम कोरोंटाइन करण्यात आले. या कामगाराच्या नावे असलेला गुमथळा प्राथमिक आरोग्य केंद्रातून सही, शिक्क्यानिशी निघालेल्या कोविड 19 रुग्ण तपासणी अहवाल सोशल माध्यमांवर वायरल झाल्याने भोवरी गावांसह परिसरातील गावांच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करा
ग्रामस्थांनो कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करा. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी ग्रामस्थांनो निरर्थक घराबाहेर पडू नका, प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करा व प्रशासनाला सहकार्य करा.
-अरविंद हिंगे, तहसीलदार, कामठी.भेदभावपूर्ण वातावरणात वागू नये !
या प्रकारावर निंदनीय चिंता व्यक्त करीत असला प्रकार हा योग्य नसून समस्त ग्रामस्थांनी एकमेकांसोबत एकोप्याचे वातावरण कायम ठेवून शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन केले पाहिजे. कोरोनाची भीती बाळगून एकमेकांशी भेदभावपूर्ण वातावरणात वागू नका.
-उमेश रडके, सभापती, पंचायत समिती, कामठी.सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्या !
कोरोना प्रतिबंधासाठी ग्रामपंचायतींनी आतापर्यंत अतिशय नियोजनबद्ध व उपयुक्त काम केले आहे. यापुढेही असेच काम करून ग्रामस्थांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याबाबत सरपंचांनी आश्वस्त केले.
-सचिन सूर्यवंशी, बीडीओ, कामठी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.