वाशीम ः जिल्हा कृषी अधीक्षकांनी सोयाबीनची उत्पादकता कमी होण्याची कारणे शोधून त्याबाबतची माहिती महिला बचत गटांच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकरी बांधवांपर्यंत पोहचविली जात आहे. याकरिता जिल्ह्यातील 689 गावांत 75 हजार 910 महिलांच्या माध्यमातून 48 हजार 975 शेतकर्यांपर्यंत माहिती पोहचविली जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या सोयाबीनच्या उत्पादकता वाढीत निश्चितच महिलांचा हातभार लागणार असून, याचे गुपीत सुद्धा महिलांच्याच हाती आहे.
जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात चार लाख सहा हजार 234 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन लागवडीचा अंदाज आहे. मात्र, दरवर्षी शेतकरी बांधव कोरडवाहू जमिनीमध्ये सोयाबीन या एकाच मुख्य पिकाची पेरणी करतात. एकलपीक पद्धतीमुळे जमिनीचा फेरपालन होत नाही. परिणामी, वर्षानुवर्षे सोयाबीनची उत्पादकता कमी होत आहे. मात्र, जिल्हा कृषी अधीक्षक एस. एम. तोटावार यांनी सोयाबीनची उत्पादकता कमी होण्याची कारणे शोधली. तसेच या कारणांवर उपाययोजना सूचविल्या आहेत. तर ह्या उपाययोजना कमी कालावधीत जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहचण्यासाठी महिला बचत गटांतील सदस्यांमार्फत शेतकर्यांना मार्गदर्शन केले जात आहे.
यामध्ये प्रामुख्याने बियाण्याची उगवण क्षमता तपासणे, बीज प्रक्रिया करणे यामध्ये रासायनिक व जैविक प्रक्रियेचा समावेश आहे. तसेच मुख्य म्हणजे जिल्ह्यातील जमिनीत कमी असलेल्या अन्नद्रव्याचा वापर करण्याबाबत मार्गदर्शन केले जात आहे. त्यामुळे बियाण्याची अचूक उगवण शक्तीद्वारे बियाण्याचा अंदाज येतो, बीजप्रक्रियेमुळे रोगांचा प्रादुर्भाव रोखला जातो, तसेच सुक्ष्म अन्नद्रव्यांमुळे एकरी उत्पादकता वाढीस लागणार असल्याचे दिसून येत आहे. याकरिता जिल्ह्यातील 192 कृषी सहाय्यक, 7 हजार 591 स्वयंमसहाय्यता गटातील 75 हजार 910 महिलांकडून तब्बल 48 हजार 975 शेतकर्यांना आत्तापर्यंत कृषी विभागाकडून मार्गदर्शन करण्यात आले आहे.
उगवण क्षमतेतून करता येईल बियाण्याची बचत
जिल्ह्यात 65 टक्के शेतकरी स्वतःकडे उलब्ध असलेल्या बियाण्याचा वापर करतात. मात्र, हे बियाणे वापरताना त्याची प्रतवारी, उगवण क्षमता न तपासता शिफारशीपेक्षा जास्त बियाणे वापरतात. प्रतिएकरी कमीतकमी 30 ते 40 किलो बियाणे वापरल्या जाते. त्यामुळे झाडांची संख्येत वाढ होते. मात्र, या अभियानांतर्गत सोयाबीन लागवडीसाठी प्रतिएकरी 26 किलो व आंतरपीक पद्धतीत 22 किलो बियाणे वापरण्याबाबत शेतकर्यांना कृषी सहाय्यक, कृषीसखी, पशुसखींमार्फत मार्गदर्शन करण्यात येत आहे. त्यामुळे सलग क्षेत्रावर कमीतकमी 4 किलो व आंतरपीक पद्धतीत 8 किलो बियाण्याची बचत होणार आहे. त्यामुळे शेतकर्यांचा 320 ते 640 रुपयांपर्यंत खर्चात बचत होणार आहे.
बीजप्रकियेतून उत्पन्नाची संधी
जिल्ह्यात केवळ 5 ते 10 टक्के शेतकरी पेरणीपूर्व बीज प्रक्रिया करतात. मात्र, कृषी विभागाकडून रासायनिक व जैविक बीज प्रक्रियेविषयी महिलांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच बीजप्रक्रियेकरिता लागणार्या औषधे 20 टक्के कमी दरने उलब्ध करून दिली जात आहेत. याकरिता महिला बचत गटाकडून 50 रुपये प्रतिएकरी मानमात्र किमतीवर उगवणशक्ती व बीजप्रक्रिया करून दिली जात आहे. त्यामुळे शेतकर्यांचे 385 रुपये प्रतिएकरी बियाण्याची बचत होईल. बीजप्रक्रियेद्वारे कमीतकमी एकक्विंटल उत्पादन वाढल्यास शेतकर्यास 4 हजार रुपयांचा लाभ होईल. तर महिला गटाला 20 टक्क्यांप्रमाणे 76 रुपये व प्रक्रियेचे 50 एसे एकूण 125 रुपये प्रतिएकरी उत्पन्न मिळेल.
जिल्ह्यातील मातीत गंधकाची कमतरता
जिल्ह्यातील मातीत सल्फर (गंधक) या अन्नद्रव्याची कमतरता 60 ते 99 टक्क्यांपर्यंत आहे. सोयाबीन पिकास प्रतिएकरी 10 किलो गंधक वापरल्यास त्याचा खर्च 360 रुपये एकता होतो. हे सुक्ष्ममूलद्रव्य वापरल्यास उत्पादनात 10 टक्के वाढ होते. म्हणजेच कमीतकमी एक क्विंटल उत्पादनात वाढ झाल्यास 360 रुपये प्रतिएकरी खर्च करून 4 हजार रुपये शिल्लक उत्पन्न मिळेल.
जिल्हा कृषी विभागाकडून सध्या जिल्हाभरात महिला बचत गट व कृषी विभागातील कर्मचार्यांकडून सोयाबीन उत्पादकता वाढीबाबत मार्गदर्शन केले जात आहे. जिल्हा परिषद मार्फत स्वयंसहाय्यता समूहास खेळते भांडवल व समुदाय गुंतवणूक निधी म्हणून 7.62 कोटी रुपये व बँक लिंकेज म्हणून 21.38 कोटी रुपये असे एकूण 29 कोटी रुपये कर्ज स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. या प्रमाणे महिला गटांनी व्यवसाय म्हणून कार्य केल्यास एका एकराच्या निविष्ठा व बीज प्रक्रियेतून 200 रुपये निव्वळ उत्पन्न होऊ शकते. तर शेतकर्याचे एकरी आठ हजार रुपये उत्पन्न वाढू शकते.
-एस. एम. तोटावार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशीम
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.