tiger leopard attack farmer and women injured forest department  Sakal
विदर्भ

वाघ, बिबट्याच्या हल्ल्यात भादुर्णीत शेतकरी ठार, आंबोलीत महिला जखमी; सिंदेवाही, मूल तालुक्यातील घटना

तेंदूपाने तोडण्यासाठी जंगलात गेलेल्या एका शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून ठार केले, तर शेतात काम करीत असलेल्या महिलेवर बिबट्याने हल्ला करून जखमी केले.

सकाळ वृत्तसेवा

मूल, सिंदेवाही : तेंदूपाने तोडण्यासाठी जंगलात गेलेल्या एका शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून ठार केले, तर शेतात काम करीत असलेल्या महिलेवर बिबट्याने हल्ला करून जखमी केले. पहिली घटना मूल तालुक्यातील भादुर्णी तर दुसरी घटना सिंदेवाही उपवन क्षेत्रातील आंबोली येथे घडली. ही घटना गुरुवार (ता. ९) घडली.

मृत शेतकऱ्याचे नाव तुळशीदास सुरेश सोनुले (वय ३५ रा. रत्नापूर) असे आहे. बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेचे नाव अर्चना भास्कर लोखंडे (वय ४६ रा. खाती मोहल्ला सिंदेवाही) असे आहे.

मूल तालुक्यातील रत्नापूर येथील तुळशीदास सुरेश सोनुले हा गुरुवारी सकाळीच गावातील पंधरा ते वीस नागरिकांसोबत भादुर्णी क्रमांक दोन येथील जंगलात गेला होता. हे क्षेत्र बफरझोनमध्ये येते.

कक्ष क्रमांक ३२४ परिसरातच तुळशीदास आणि गावकरी तेंदूपत्ता संकलन करीत होते. तिथेच दबा धरून बसलेल्या वाघाने तुळशीदासवर हल्ला केला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. तेंदूपाने तोडणाऱ्या नागरिकांनी आरडाओरड केली.

त्यामुळे वाघाने जंगलात धूम ठोकली. तोपर्यंत तुळशीदास वाघाच्या हल्ल्यात ठार झाला होता. घटनेची माहिती मिळताच गावातील लोकांनी जंगलाकडे धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच बफर झोन क्षेत्राचे वनपरिक्षेत्राधिकारी राहुल कोरेकर, मारोडा येथील क्षेत्र सहायक पाकेवार आणि वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

मृताचे शव शवविच्छेदनासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. वनविभागातर्फे मृताच्या कुटुंबीयांना तातडीची वीस हजार रुपयांची मदत करण्यात आली. चालू वर्षातील मूल तालुक्यातील ही पहिलीच घटना आहे.

आतापर्यंत वाघाच्या हल्ल्यात तालुक्यातील सतरा जणांचा बळी गेला आहे. दुसऱ्या एका घटनेत शेतात काम करीत असलेल्या महिलेवर दबा धरुन बसलेल्या बिबट्याने हल्ला करून जखमी केले. ही घटना गुरुवार (ता. ९) सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास सिंदेवाही उपवनक्षेत्रातील आंबोली येथे घडली.

जखमी महिलेचे नाव अर्चना भास्कर लोखंडे (वय ४६ रा. खाती मोहल्ला सिंदेवाही) असे आहे. तिच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.सिंदेवाही येथील खाती मोहल्ल्यात अर्चना भास्कर लोखंडे राहतात.

त्यांची शेती सिंदेवाही उपवन क्षेत्रात येत असलेल्या आंबोली परिसरात आहे. गुरुवारी (ता. ९) सकाळी अर्चना लोखंडे या शेतात काम करीत होत्या. याचदरम्यान शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. जखमी अर्चना भास्कर लोखंडे यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ भरती केले.

पाच महिन्यांत दोघे ठार

सिंदेवाही तालुका हा जंगलव्याप्त तालुका आहे. तालुक्यात शेतीपासून उत्पन्न घेणाऱ्यांची संख्या जास्त आहे. नेहमीच शेतकऱ्यांना आपला जीव मुठीत घेऊन शेतीची कामे करावे लागते. जानेवारी २०२४ ते ९ मे २०२४ पर्यंत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात दोघांचा बळी गेला आहे.

तालुक्यातील पळसगाव (जाट) येथील श्रीकृष्णा सदाशिव कोठेवार हे १९ फेब्रुवारी रोजी जंगलात सरपण गोळा करण्यासाठी कच्चेपार येथे गेले होते. तेव्हा दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला करून ठार केले. शिवणी वनपरिक्षेत्रातील कुकडहेटी जंगलात दीपा दिलीप गेडाम या तेंदूपत्ता संकलनासाठी गेल्या होत्या. तेव्हा वाघाने त्यांच्यावर हल्ला करून ठार केले. ही घटना ४ मे २००४ रोजी घडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI statement on India vs Pakistan match: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान मॅचबद्दल अखेर 'BCCI'ने स्पष्ट केली भूमिका

Sanjay Raut : आरक्षणावरून राज्यात अराजक; मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

SCROLL FOR NEXT