चंद्रपूर : वेणीफणी करायची. पावडरलाली लावायची. नटूनमुरडून घराबाहेर पडायचे. कुणाच्याही घरासमोर उभे राहून टाळ्या वाजवायच्या. नाचगाणे करायचे. हातात देतील तेवढे पैसे घेऊन दुसरे घर गाठायचे, हा तृतीयपंथींचा दिनक्रम. मात्र, लॉकडाउनने त्यांचा दिनक्रम बदलविला आहे. मागील दोन महिने समाजातील दानशूर व्यक्तींच्या मदतीतून कसाबसा गुजारा झाला. मात्र, कोरोनाच्या भीतीने कुणाच्या घरी जाऊ शकत नाही. त्यामुळे आता पुढे जगायचे कसे, असा प्रश्न त्यांच्यासमोर पडला आहे.
समाजात तृतीयपंथींना हिजडा, किन्नर वा छक्का या नावाने ओळखले जाते. तृतीयपंथींबद्दल समाजात नेहमीच नावडती भावना आहे. समाजात वाळीत टाकल्यागत वागणूक मिळत असल्यानेच उदरनिर्वाहासाठी नाचगाणे करून चार पैसे पदरात पाडून घेण्याचा मार्ग निवडला आहे. रेल्वेमध्ये प्रवास करणाऱ्या नागरिकांकडून पैसे मागायचे, हा त्यांचा मुख्य व्यवसाय होता. मात्र, लॉकडाउनमुळे रेल्वेसेवा बंद पडली. कोरोनाच्या भीतीने एक-दुसऱ्यांच्या घरी जाणे बंद आहे. त्यामुळे घरोघरी जाऊन पैसे मागण्यावरही आता बंदी आली आहे. उदरनिर्वाहासाठी चार पैसे मिळण्याचे सर्वच मार्ग बंद झाले. मागील अडीच महिन्यांपासून हातात येणारी आवकच थांबल्याने त्यांचे जगणे कठीण झाले आहे.
येथील रयतवारी कॉलरी परिसरात तृतीयपंथींचे वास्तव्य आहे. शहरातील घरोघरी जाऊन पैसे मागून ते उदरनिर्वाह करीत होते. मात्र, कोरोनाच्या प्रतिबंधासाठी करण्यात आलेल्या लॉकडाउनने त्यांच्यासमोर अडचणींचा डोंगर उभा झाला आहे. पदरमोड करून ठेवलेल्या पैशातून आणि समाजातील दानशूर व्यक्तींनीसुद्धा मदतीतून सुरुवातीचे दिवस काढले. आता मदतीचा ओघ थांबला आहे. परंतु, घरोघरी जाऊन पैसे मागणे बंद आहे. त्यामुळे पुढील दिवस कसे काढायचे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. लॉकडाउन हटून पुन्हा पूर्वीसारखे दिवस कधी येतील, या आशेत ते जीवन जगत आहेत.
तृतीयपंथी रेल्वेत मोठ्या संख्येने दिसतात. एका स्टेशनपासून दुसऱ्या स्टेशनपर्यंत गाडीतील प्रवाशांकडून पैसे मागायचे, हेच त्यांचे काम होते. मात्र, लॉकडाउनमुळे मागील अडीच महिन्यांपासून रेल्वे ठप्प पडली आहे. रेल्वे बंद असल्याने मिळकत थांबली आहे. त्यामुळे उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे.
लॉकडाउनमुळे हातावर पोट असणाऱ्यांचे चांगलेच वांदे झाले आहेत. त्यात तृतीयपंथी समूहाचा समावेश आहे. मागील अडीच महिने कसाबसा उदरनिर्वाह झाला. मात्र, पुढील दिवस कसे काढायचे, हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी साहेबांनी पोट भरण्यासाठी मदत करावी, अशी अपेक्षा तृतीयपंथींनी व्यक्त केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.