अमरावती : झुळझुळ गार वारे.. त्यावर डुलणारी झुल्फे सावरीत मस्त हिंडण्याची हौस भागवायची तर सातपुड्याच्या या प्रदेशात आलेच पाहिजे. "पंचबोल पॉइंट'वर प्रिय व्यक्तींना साद घालण्याची मजाच काही और असते. येथे एक हाक दिली की त्याचे पाच प्रतिध्वनी उमटतात, हे तर ठाऊक असेलच ना? "सनसेट पॉइंट'वरून दिसणारा सूर्यास्त तर डोळ्यांचे पारणे फेडतो. हा पॉइंट पाहिल्याशिवाय चिखलदऱ्याच्या सहलीला पूर्णत्व येऊ शकत नाही. पावसाळ्याच्या दिवसांतली रिमझिम आणि गार गार हवेची झुळूक मनाला भुरळ घालते. हिरव्याकंच गवताचे गालीचे चिखलदऱ्याच्या सौंदर्याला चार चॉंद लावतात.
सातपुड्याच्या कुशीतील चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण. इतिहासाची साक्ष देणारा "गाविलगड' किल्ला. समुद्रसपाटीपासून तीन हजार 600 फूट उंचीवर असलेल्या चिखलदऱ्याला "विदर्भाचे काश्मीर' म्हणून संबोधले जाते. नागमोडी वळण सुरू झाले की, समजायचे चिखलदऱ्याचा हिरवागार परिसर सुरू झाला. चिखलदऱ्यात पाहण्याजोगे सुमारे 15 पॉइंट्स आहेत. भीमकुंड व तेथील धबधबा तर पर्यटकांना मोहिनीच घालतो. किचकाच्या वधानंतर कुंडात भीमाने हात धुतल्याने त्या कुंडाचे नाव "भीमकुंड' पडल्याची आख्यायिका आहे. भीमकुंडाशेजारीच "देवीपॉइंट' आहे. चंद्रभागा नदीचे उगमस्थान असलेल्या या ठिकाणाहून पाण्याचा प्रवाह खोल दरीत कोसळतो. येथे गुहेत देवीचे मंदिर असून, उन्हाळा असो की पावसाळा या मंदिरातून पाण्याचा पाझर सतत सुरू असतो. त्यामुळेच देवीमंदिरातील वातावरण सदासर्वकाळ प्रसन्न असते. काळ्या पाषाणात खोदलेल्या गुहेतील हे मंदिर डोळ्यांत साठवून ठेवण्यासारखे आहे.
याच पॉइंटजवळ चिखलदऱ्यातील सर्वात मोठा "सक्कर तलाव' आहे. पावसाळ्यात या तलावात बोटिंगचा आनंद काही निराळाच. "मोझरी पॉइंट' हे असेच मन प्रसन्न करणारे ठिकाण. उंचावर असणाऱ्या या ठिकाणाहून रात्री घाटाखालील गावे व तेथील रोषणाई पाहण्याजोगी असते.
"पंचबोल पॉइंट'
"पंचबोल पॉइंट'वर एकमेकांना आवाज देण्याची मजाच काही निराळी. या ठिकाणाहून आवाज दिल्यास त्याचे पाच प्रतिध्वनी उमटतात. या पॉइंटवर गेल्याशिवाय चिखलदऱ्याची सहलच पूर्ण होऊ शकत नाही. "सनसेट पॉइंट'वरून सूर्य अस्ताला जात असतानाचे दृश्य तर डोळ्याचे पारणे फेडतो. यासह चिखलदऱ्यातील अनेक पॉइंटवर गर्दी होत असते. या परिसरात आदिवासी समाजाची संस्कृती आजही टिकून आहे.
कॉफीच्या झाडांचे अस्तित्व शाबूत
इंग्रजांनी चिखदऱ्यात लावलेले कॉफीच्या झाडांचे अस्तित्व आजदेखील शाबूत आहे. थंडगार हवेत येथील कॉफीची चव जिभेवरून जात नाही. निसर्गाच्या अद्भुत किमयेने नटलेला हा प्रदेश आहे.
कसे पोहोचायचे?
चिखलदरा हे अमरावतीपासून 72 किलोमीटर अंतरावर आहे. अमरावती ते परतवाडा हे अंतर 50 किलोमीटर असून, परतवाड्याहून चिखलदऱ्याला जाण्यासाठी परिवहन महामंडळाच्या बसांसह खासगी वाहनेही उपलब्ध आहेत.
निवासाची व्यवस्था
चिखलदरा येथे सार्वजनिक बांधकाम विभागासोबतच जिल्हा मध्यवर्ती बॅंक, पर्यटन महामंडळ, पाणीपुरवठा विभाग, वन विभाग तसेच नगरपालिकेचे विश्रामगृह आहे. याशिवाय अनेक खासगी हॉटेलदेखील आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.