यवतमाळ : स्वातंत्र्यानंतरही फासेपारधी समाज मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. पारधी समाजाचे मूलभूत प्रश्न सोडविण्यात यावेत, या प्रमुख मागणीसाठी बुधवारी (ता.तीन) चोंढी फाटा ते यवतमाळ अशी पायदळ अंधारयात्रा काढून जिल्हाधिकारी कार्यालयात धडक दिली. जिल्हाधिकार्यांना निवेदन देऊन मागण्या सोडविण्याची मागणी करण्यात आली.
हातातील फलकांतून पारधी समाजाच्या व्यथा मांडण्यात आल्यात. भारतीय संविधानात आदिवासी जात समूहातील उपेक्षित जातींच्या नागरिकांचा विकास घडवून आणण्यासाठी वेगवेगळ्या तरतुदींचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, फासेपारधी समाजाचा विकास घडवून आणण्यासाठी शासनाकडून कोणतेही प्रयत्न झाले नाहीत, अशी ओरड होत आहे. आजही हा समूह शहर, महानगरांत भीग मागून उपेक्षितांचे जीवन जगत आहे.
यवतमाळ जिल्ह्यात फासेपारधी बेडे असून, त्यांच्या बेड्यांपर्यंत वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण या मूलभूत सुविधा पोहोचलेल्या नाहीत. देशात दिवाळी हा प्रकाशपर्वाचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. पारधी समाजाच्या घरात असलेल्या अंधाराकडे कुणाचेही लक्ष नसल्याची खंत व्यक्त मोर्चेकर्यांनी व्यक्त केली.
प्रत्येक तालुक्यात सरकारी शेतजमिनीचे पट्टे पारधी बांधवांच्या नावाने करून देण्यात यावेत, पारधी बेड्यावर अंगणवाडी सुरू करून शिक्षिका व मदतनीस म्हणून समाजातील महिलांचीच निवड करावी, दहा वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांच्या नावाने नमुना आठचे दाखले देण्यात यावेत, जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे, रोजगार सुरू करण्यासाठी प्रत्येकी दीड लाखाचे आर्थिक सहायक करावे, आर्णी तालुक्यातील कारेगाव वनजमिनीवर अतिक्रमण करून वास्तव्य करणाऱ्यांच्या नावाने वस्ती उभी करावी आदी मागण्यांकडे जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व आदिवासी फासेपारधी समाज संघटनेचे अध्यक्ष मतीन भोसले यांनी केले. या अंधारयात्रेत पारधी समाजबांधव चिमुकल्यांसह सहभागी झाले होते.
"फासेपारधी बेड्यावर ज्ञान, शिक्षण, विकास, समृद्घीचा प्रकाश पोहोचलेला नाही. प्रत्येक बेड्यावर अंधाराचा कायमस्वरूपी निवास आहे. प्रमुख समस्या निकाली काढण्यासाठी अंधारयात्रा काढण्यात आली. जिल्हाधिकार्यांनी येत्या चार दिवसांत बैठक घेण्याचे आश्वासन दिले."
- मतीन भोसले, अध्यक्ष, आदिवासी फासेपारधी समाज संघटना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.