वर्धा : गत काही वर्षांत शेतात यांत्रिकीकरणाने शिरकाव केला असला तरी काही कामे बैलजोडीशिवाय होत नाहीत. कपाशीच्या लागवडीसाठी सारे फाडणे, पिकांची आंतरमशागत यासाठी बैलांची गरज पडते. बैलांची संख्या कमी झाली आहे. सधन व मोठ्या कास्तकारांकडेच बैलजोडी आहे. त्यामुळे बैलजोडी मालक म्हणेल ते भाडे शेतकऱ्यांना द्यावे लागत आहे. सध्या बैलजोडीचे भाडे दीड हजारावर गेले आहे. त्यातही वेळेवर बैलजोडी मिळेलच, याची खात्री नाही.
पूर्वी प्रत्येक शेतकरी बैलजोडी ठेवायचा. बैलजोडी शेतकऱ्याच्या प्रतिष्ठेचे साधन होते. एखाद्या शेतकऱ्याने बैलजोडी घेतली तर दुसरा त्याच्या वरचढ बैल खरेदी करायचा. दरवर्षी उन्हाळा लागताच गावात बैल विक्रीला यायचे. ही दावण एक ते दीड महिना मुक्कामी राहायची, पण आता ते दिवस राहिले नाही. विभक्त कुटुंब पद्धतीने जमिनीचे तुकडे पडले. बोटावर मोजण्याइतक्याच शेतकऱ्यांकडे दहा-वीस एकर जमीन आहे. पाच-दहा एकर शेती कसण्यासाठी शेतकरी बैलजोडी ठेवत नाही. त्यामुळे अनेक शेतकरी भाड्याने शेती कसतात. नवीन पिढीचा शेती करण्याकडे निरुत्साह आहे. बहुतांश शेतकरी उन्हाळवाहीची कामे ट्रॅक्टरच्या सहाय्याने करून घेतात.
मालक रोख पैसे मोजतात...
खरीप हंगामात शेतीच्या कामासाठी बैलजोडीची गरज पडते. कपाशी लागवड, सोयाबीनची पेरणी आणि पुढे पिकांमध्ये आंतरमशागतीची कामे बैलजोडीने करावी लागतात. मृगनक्षत्रास प्रारंभ झाला आहे. जिल्ह्यात काही भागात पावसाच्या सरी पडल्या आहेत. हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तविला आहे. शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड सुरू केली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे बैलजोडी नाही, त्यांना दुसऱ्यांवर अवलंबून राहावे लागत आहे. बैलजोडी मालक म्हणेल ते भाडेही द्यावे लागत आहे. सध्या बैलजोडीचे भाडे 1 हजार 200 ते 1 हजार 500 रुपये आहे. एका दिवशी चार ते पाच एकरांच्या साऱ्या होतात. बैलजोडी मालकाला रोख पैसे मोजून द्यावे लागतात. तेव्हाच तो शेतात साऱ्या फाडायला येतो. कपाशी लागवडीचा हंगाम साधारणत: आठ ते दहा दिवसांचा असतो. शेतकरी सोयाबीनची पेरणी ट्रॅक्टरद्वारे करतात. सोयाबीनचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना तेवढी झळ जाणवत नाही. पूर्वी शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात गोधन राहायचे. शेतकऱ्यांना बैलसुद्धा विकत घ्यावे लागत नव्हते. सध्या सर्व चित्र बदलले आहे. शेतीचा व्यवसाय तोट्याचा ठरत आहे. लागवडखर्च वाढला आहे. शेतमालाला भाव मिळत नाही. अद्याप अनेक शेतकऱ्यांच्या घरात कापूस पडून आहे. त्यात बैलजोडीच्या भाड्याची भर पडली आहे.
माझ्याकडे थोडीच शेती आहे. वर्षभर बैलजोडी पोसणे शक्य नाही. खरीप हंगामात बैलजोडी भाड्याने सांगून पेरणी करतो. दरवर्षी 20 ते 25 हजार रुपये भाडे द्यावे लागते.
-श्याम मुरकुटे, शेतकरी, भिवापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.