अमरावती : प्रेम का करतो या मुद्यावरून सुरू असलेला वाद अखेर वाढत गेला. त्यातून अमरावतीच्या परिगणीत कॉलनी येथील युवकाला कारमध्ये टाकून नांदेड येथे नेऊन सोडले. वाटेत चाकूचा धाक दाखवून धमकी दिली. एवढेच नव्हे तर सोडून देण्यापूर्वी युवकाचे टक्कलसुद्धा केले.
गजानन (वय २३) असे अपहरण करून टक्कल केलेल्या युवकाचे नाव आहे. गजानन सात वर्षांपासून निकटवर्तीयांसोबत अमरावतीच्या परिगणीत कॉलनीत भाड्याने राहतो. नांदेड येथील महेश वानखडे हा त्याच्या घरमालकाचा जावई आहे. महेशचे अमरावतीत येणे-जाणे असल्याने त्याची गजाननसोबत ओळख झाली. रविवारी (ता. चार) महेश वानखडे हा त्याचे साथीदार गोविंद, शंकर व गणेश (सर्व रा. नमस्कार चौक, नांदेड) यांच्यासोबत कारने अमरावतीत आले.
मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास गजाननला झोपेतून उठवून फिरायला बाहेर चालण्याची विनंती केली. गजानन कारमध्ये बसून महेशसोबत गेला. कारने लोणीपर्यंत गेल्यानंतर कारमध्ये बसलेल्या शंकरने गजाननला चाकूचा धाक दाखविला. कुण्या मुलीवर प्रेम करतो म्हणून गजाननला जीवे मारण्याची धमकी दिली. कारमध्ये तिघांनी त्याला जबर मारहाण केली. महेशने स्वत:च्या मोबाईलने गजाननचे चित्रीकरण केले. दुसऱ्या महिलेसोबत त्याचे प्रेमप्रकरण सुरू असल्याची बाब बळजबरीने वदवून घेतली. त्याचा व्हिडिओ तयार केला. मारत त्याला नांदेड येथे नेले. तेथे गजाननचे ब्लेडने टक्कल केले.
युवतीशी बोललास तर ठार मारण्याची धमकी दिली. घटनेची वाच्यता करू नये, असे सांगून टक्कल केलेल्या स्थितीत गजाननला नांदेडच्या नमस्कार चौकात नेऊन सोडले. त्यानंतर महेश वानखडेसह त्याच्या साथीदारांनी गजाननच्या नातेवाइकास फोन करून माहिती दिली. गजाननच्या नातेवाइकाने त्याला नांदेडवरून अमरावतीत आणले. पीडित गजाननने या घटनेची तक्रार फ्रेजरपुरा ठाण्यात नोंदविली. पोलिसांनी महेश वानखडेसह त्याच्या तीन साथीदारांविरुद्ध अपहरण, मारहाण, जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सोमवारी (ता. पाच) गुन्हा दाखल केला.
अपहरण करून मारहाण व अपमानीत केले, असा पीडित युवकाचा आरोप आहे. गंभीर प्रकरण असल्याने तत्काळ गुन्हा दाखल केला.
- पुंडलिक मेश्राम, पोलिस निरीक्षक, फ्रेजरपुरा ठाणे.
संपादन ः राजेंद्र मारोटकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.