‘ओवी, ऊठ लवकर. सकाळचे नऊ वाजत आले आहेत. ऑनलाइन वर्ग सुरू होणार आहे ना. आत्तापासून चांगली तयारी कर, पुढचे दहावीचे वर्ष आहे. आणि हो, उठल्यावर पांघरुणाच्या घड्या कर. आता तू मोठी झाली आहेस. घरकामात मदत कर,’ अर्चनाने एका दमात सरबत्ती केली. आईच्या आवाजाने आणि रागावण्याने ओवी तातडीने उठली आणि शक्य तितक्या लवकर आवरून ऑनलाइन वर्ग जॉइन केला. आपल्या रागावण्याचा जरा तरी फायदा झाल्याचे अर्चनाच्या लक्षात आले. अर्चनाची एकीकडे नवरात्रीची तयारी सुरू होती. त्यासाठी लागणारे साहित्य आणण्याची तिची लगबग चालली होती.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
आईची गडबड पाहून ओवी म्हणाली, ‘आई, बाहेर जाऊन काही आणायचे असल्यास सांग, मी आणते.’ मुलीने मदतीसाठी पुढे केलेला हात पाहून अर्चनालाही बरे वाटले, मनाशी काही विचार करत ती म्हणाली, ‘अगं राहू दे, आणते मी. तू अजून लहान आहेस.’’
आईच्या या वाक्याने ओवीला रागही आला होता आणि ती बुचकळ्यातही पडली होती. दोनच दिवसांपूर्वी आईने आपल्याला मोठी झाल्याचा उपदेश केला होता आणि आता दोन दिवसांत असे काय झाले, की आपण परत लहान झालो. इगो हर्ट झाल्याने काहीशा कडक आवाजात ओवी आईला म्हणाली, ‘अगं, दोनच दिवसांपूर्वी तू मला मोठी झाल्याचे सांगून मी काय करायचे हे लक्षात आणून दिले होते आणि आज एकदम लहान कशी झाले? एक नक्की ठरव, मी लहान आहे की मोठी झाले आहे ते.’’
ओवीच्या प्रश्नाचा रोख आईच्या लक्षात आला. तिला समजावताना अर्चना म्हणाली, ‘अगं, आई-बाबाला आपला पाल्य नेहमी लहानच वाटत असतो. सोईस्कररीत्या लहान-मोठे नाही होता येत. योग्य वयात योग्य जबाबदाऱ्या टाकणे हेच पालकांचे काम असते. तुझे आत्ताचे वय अभ्यासाचेही आहे आणि काही प्रमाणात घरकामात मदत करण्याचेही. आता तुला काम सांगताना मला विचार करावा लागणार. एकतर तुझी शाळेची बदललेली वेळ. अभ्यासाचे नीट नियोजन करता येत नाही. घरात रोजच्या साठीच्या लागणाऱ्या वस्तू बाजारातून आणायच्या असतील, त्याचा तुला अंदाज नाही; म्हणून मी तसे म्हटले.’’
आईला थांबवत ओवी म्हणाली, ‘आई, मी बाजारात जाऊन काही आणले नाही, तर मला कसा अनुभव येणार? आणि एखाद्या दुसऱ्या वेळेस चुका होतील; परंतु त्यातूनच मी शिकणार ना. मागच्या वेळी आजी आली होती, ती काय म्हटली ते तुला आठवते ना? ती तर तुला लहानपणापासून जबाबदारीची अनेक कामे सांगायची. आता तूही तो कित्ता गिरवायला काय हरकत आहे? मला यादी करून दे. मी बरोबर आणते. माझ्या वयाची नको काळजी करूस.’ ओवीच्या या अनपेक्षित आणि ठाम उत्तराने अर्चना दिङ्मूढ झाली. काही न बोलता तिने यादी आणि पैसे ओवीच्या हातात दिले. तोवर ओवीने पिशवीही आणली होती.
Edited By - Prashant Patil
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.