Radhika Deshpande 
वुमेन्स-कॉर्नर

वुमनहूड : मोरपंखी पिचकारी

रानी (राधिका देशपांडे)

लहानपणी मला असं वाटायचं की, या जादूई दुनियेच्या निळ्याशार आकाशात विस्मयकारक इंद्रधनुष्याचे रंग उधळणारी सोनसळी रंगाची परीराणी असते. तिच्याकडं एक चमचमणारी चांदीची पिचकारी असते. ज्यातून ती तिला कंटाळा आला की, इंद्रधनुष्याच्या आकारात सात रंगांची उधळण करते. तिचा कंटाळा बघता सूर्य, इंद्र आणि वायू यांनी ठरवलं की, बाकीच्या रंगीत कामांसाठी पृथ्वीवरच्या कलाकारांची नेमणूक करायची.

हे जमिनीवर बसून रंगांचे खेळ करून इतरांचं जीवन पुलकित करतील आणि सजीव आणि निर्जीव घटकांना नवे अर्थ मिळवून देतील. तीन देवांनी कलाकाराला वेगळ्याच मातीनं बनवण्याची विनंती ब्रह्माला केली. ब्रह्मानं कलाकाराच्या हाती नवरसांची पिचकारी दिली. जाणिवेपासून नेणिवेपर्यंतचा प्रवास करण्याची क्षमता दिली. कलाकाराला देवांनी जवळ बसवलं. त्याला जात दिली नाही, जबाबदारी दिली. त्याची पोत, त्याचा धर्म आणि कर्म ओळखून सिद्ध करण्याचं सामर्थ्य दिलं. आता देव म्हणजे आपण एक वैश्विक शक्ती मानल्यास त्याचं प्रतिनिधित्व करणारे आम्ही कलाकार निव्वळ निमित्त मात्र. शून्यातून सूर्य, सूर्यातून ऊर्जा, ऊर्जेतून विश्व, विश्वातून भाव आणि भावातून रूप, रंग, गंध, स्पर्श, शब्द यांचे पदोपदी होणारे चमत्कार!

त्रैलोक्यास सर्वस्य। नाट्यं भावानुकीर्तनं।। हे जाणणाऱ्या सृजनशील अभिनेत्रीला ललित कला समजून घेणं आवश्यकच. मास्टर्स इन फाइन आर्ट्स करत असताना मला प्रकर्षानं जाणवलं की ‘रंग’ सगळीकडं आहेत. लहानपणी चित्र रंगवायला घ्यायचे, तेव्हा सूर्याचा रंग लाल, पृथ्वीचा हिरवा, समुद्र आणि आकाशाचा निळा असे रंगवायचे. मात्र, हळूहळू लक्षात आलं, भावाप्रमाणंच रंगही स्थायी नसतो. चंद्र स्वतःचा आकार बदलतो आणि कधीतरी वेगळाच भासतो. या बदलणाऱ्या रंगांमुळेच मजा आहे, नाही? होळी आली की, आपण जुन्या, बुरसटलेल्या, फिक्या, निरस रंगांना होळीत टाकतो आणि नव्या चुटूक, गडद, हलक्या आणि मोहक रंगांची उधळण करतो. मग रंग आपल्यावर चढतो, रंग आपल्याला आकर्षित करतो. प्रत्येकाचा रंग वेगळा आणि म्हणूनच त्याचा आपल्यावर होणारा परिणाम वेगळा.

मी गेली चौदा वर्षं वारली पेंटिंग करते. नाटककार असल्यामुळं मला ही कला सर्वांत जास्त भावली, कारण त्यात नाट्य आहे. त्यातल्या बाहुल्या एकमेकांशी बोलतात. त्यांचं काहीतरी सांगणं असतं. माझ्याकडं त्यांचं काहीतरी मागणं असतं. त्यांची गोष्ट त्यांना रंगवून सांगायची असते. मग मी त्यांच्यात रंग भरायला घेते. रंगांची वेगळीच दुनिया मी पाहिली आहे. ते एकमेकांमध्ये सहज मिसळतात, कधी रुसतात, कधी रागावून वेगळे होतात. कधीकधी लग्नाच्या बेडीत अडकतात, तर कधी मैत्री ठेवून आपलं वेगळेपण जपतात. माझ्याकडं भूमिका आल्यावर मी तिचा मूळ रंग शोधते. तिचा भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यकाळ मला कोणत्या रंगात दिसतो, याची कल्पना करते. वारली चित्राच्या चौकटीत तिला कुठं स्थान असेल ते बघते. चित्राच्या मायावी नगरीत आम्हा अभिनेत्यांचं चित्र ठरलेलं असतं. रंग भरण्याचं स्वातंत्र्य आम्हाला असतं. बहुरंगी कलाकाराला बहुआयामी असणं आवश्यक आहे. तारेवरची कसरत करत असताना रूप, रंग, गंध, स्पर्श आणि शब्द याचा शस्त्र आणि अस्त्र म्हणून वापर करण्याची कला अवगत करणं जोखमीचं काम आहे. आम्ही कलाकार मुक्तछंदी, आमच्याच कल्पनेत रंगणारे. 

मी स्वतःलाच विचारलेला प्रश्न असा, ‘राधिके, तुझा नेमका रंग कोणता?’ खरंतर याचं उत्तर सोपं नाही, पण मला सापडलं आहे. श्री कृष्णाच्या मुकुटात दिमाखानं डोलणाऱ्या त्या मोरपंखात मी राहते. एकदा श्री कृष्णानं त्याच्या सोनेरी पिचकारीत मोरपंखी रंग भरले आणि सर्र उडवले माझ्या अंगावर. तेव्हापासून मी त्याच्याच नजरेतून न्हाऊन निघालेली राधिका.

रंग अबोल असो वा बोलके, रंग माझ्याशी संवाद साधतात. सूक्ष्म आणि सुप्त भावनांनी ते मढलेले असतात. एकदा का रंगभूषाकारानं माझ्या चेहऱ्यावर रंग चढवायला सुरुवात केली की, आपसूख चित्र माझ्या डोळ्यासमोर तयार होतं. इदं न मम. सगळी काय त्या मोरपंखी पिचकारीची करणी!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aadhaar Card Rule: आधार कार्डमध्ये सर्वात मोठा बदल! पत्ता आणि जन्मतारीख गायब होणार, फक्त 'या' गोष्टीवरून तुमची ओळख पटणार

Pune News : नवले पूल येथे तातडीने उपाययोजना करा; नितीन गडकरींचे आदेश

Pune MHADA Housing Lottery : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! म्हाडाच्या ४,१८६ घरांच्या लॉटरीसाठी अर्ज करण्यास पुन्हा एकदा मुदतवाढ

Tamhini Ghat Accident : स्वप्नांची भरारी अर्धवट ठेवून सहा तरुणांना काळाने गाठलं

समझो हो गया...! Smriti Mandhana ने एकदम स्टाईलमध्ये दाखवली एंगेजमेंट रिंग! जेमिमा रोड्रिग्सने शेअर केला Video

SCROLL FOR NEXT