Tea
Tea Sakal
वुमेन्स-कॉर्नर

घरकुल अपुले : ‘चहा’ची ‘चाह’त

सकाळ वृत्तसेवा

मिसळ आणि चहा यावर चर्चासत्रसुद्धा भरवता येऊच शकतं; पण आज खास चहा विषयातसुद्धा प्रचंड वैविध्य आहे.

- मीनल ठिपसे

मिसळ आणि चहा यावर चर्चासत्रसुद्धा भरवता येऊच शकतं; पण आज खास चहा विषयातसुद्धा प्रचंड वैविध्य आहे. कसं असतं ना, जेवण आणि त्याच्याशी जोडलेल्या आठवणी यांनीच आयुष्य रंगतदार होतं अशी माझ्यासारख्या खाद्यप्रेमीची तरी साधी व्याख्या आहे.

मुसळधार कोसळणारा पाऊस आणि टपरीवर जोडीदाराबरोबर घेतलेला कटिंग चहा... त्याच पावसात मित्र-मैत्रिणीबरोबर सिंहगडावर जाऊन दऱ्याखोऱ्या पाहत आणि सुसाट सुटलेल्या बेफाम वाऱ्यातसुद्धा त्या छोट्या टपऱ्या चालवणाऱ्या लोकांनी बनवलेला तो अशक्य खास चहा... सकाळी उठल्यावर जगात काही नसलं तरी आल्याचा फक्कड चहा... पहिला चहा झाला तरी नाश्ता झाल्यावर अर्धा कप तरी गरमागरम चहा... डोकं दुखत असेल तर चहा... थंडी वाजत असेल तर चहा... काही छान झालं, तर ‘थोडा चहा तरी घेऊन जा’ म्हणणारी प्रजा... खूप कंटाळा आला असेल तर तरतरी यावी म्हणून चहा... आज काय खास खारी बिस्किट्स (पिळाची खारी) आणली आहेत म्हणून चहा... या आणि अशा कित्येक आठवणी असतात.

हल्ली चहाचे इतके प्रकार झालेत, की खरा चहा विसरायला झालाय. अर्थात आपल्याकडे करतात तो चहा पण काही वेगळाच असतो. आमच्याकडे माहेरी म्हणजे चहा उकळून झाला, की त्यावर झाकण ठेवायचं; वाफ मुरली, की मग त्यात गरम दूध घालायचं आणि मग गाळायचा. इकडे सासरी सगळं चहापत्ती, पाणी, दूध, साखर सगळं एकत्रच उकळतात... आणि मलाही तसाच चहा आवडायला लागला. कुणाला अंमळ ती दुधावरची साय चहात हवी असते, तर कुणाला चहावरती साय आली तरी चालत नाही, कुणाला त्यात बारा महिने तेरा त्रिकाळ किसलेलं आलं लागतंच, कुणाला भारी उत्साह... किसलेलं आलं, लवंग, वेलदोडा कुटून असा मसाला दुधात घालून, घोटीव दुधात वरून कोरा चहा ओततात. आता आइस टी, जास्वंद चहा, बासुंदी चहा, ब्लॅक टी वगैरे शेकडो प्रकार मिळतात आणि लोकही त्याचा आस्वाद घेत असतात.

चहा बनवणं हीसुद्धा एक कला आहे. रोज तशाच्या तसा चहा होत नाही. अगदी मोजूनमापून केला ना तरी. म्हणूनच पूर्वी लग्नाच्या आधी दाखवायच्या कार्यक्रमात चहा-पोहे खायला करत असावेत! चहाचा रंग कसा सुरेख केशरी हवा, गोडी बेताची हवी, ताज्या दुधाचा फेस हवा आणि चहापत्ती, पाणी, साखर आणि दूध या चारच गोष्टी; पण त्याचा मेळ बेमालूमपणे साधता यायला हवा.

या चहाचा एक गंमतशीर किस्सा झाला होता. आम्ही शाळेतल्या काही जणींची साधारण एकाच वेळेस लग्नं झाली होती आणि आमची मुलंही साधारण एकाच वयाची. माहेरी गेल्यावर आवर्जून भेटायचो तेव्हा! मुलं साधारण चार एक वर्षांची असतील. आई चहा करत होती आम्हा तिघींसाठी. आई म्हणाली, ‘मुलांना दूध देते छान कोको पावडर घालून.’ माझी मैत्रीण म्हणाली, ‘हो काकू, तसंही आम्ही मुलांना आजिबात चहा देत नाही.’ झालं! तिचा मुलगा म्हणाला, ‘अहो आजी, आई खोटं बोलतेय. मी रोज चहा पितो, भरपूर साखर घालून!..’ एकच हशा पिकला.

अजून एक खूप गंमतशीर आठवण. आमच्या बाबांना अगदी कमी दूध घातलेला चहा लागतो आणि आता बरीच वर्षं सकाळचा चहा तेच करतात. अगदी माझ्याकडे आले, तरी ते कौतुकानं करतात. चहात साखर नाही, दूध अगदी रंग काळा दिसू नये इतपत थेंबभर असं असतं. आमच्या ‘अहों’नाही ते आले, की म्हणतात, ‘जावईबापू तुमच्यासाठीही करतो मस्त चहा.’ पहिली काही वर्षं ‘अहो’सुद्धा घ्यायचे. नंतर मात्र त्यांनी मला सांगितलं, ‘चहा तूच कर गं!..’

चहाची अशी वेळ नसते; पण वेळेला चहा हवाच!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT