Royal Colddrinks
Royal Colddrinks Sakal
युथ्स-कॉर्नर

खाद्यभ्रमंती : मोमीनपुऱ्यातलं रॉयल कोल्ड्रिंक्स!

आशिष चांदोरकर

उन्हाळ्याचा मोसम असो किंवा रमझानचा महिना, पावलं पुण्यातील मोमीनपुऱ्याकडं वळल्याखेरीज राहत नाहीत. मोमीनपुऱ्यातील घोरपडे पेठ पोलिस चौकीसमोरचं ‘रॉयल कोल्ड्रिंक्स’ असो किंवा तिथून थोडं खाली गेल्यानंतर एका मशिदीजवळ असणारी ‘ताहुरा कोल्ड्रिंक्स’ची गाडी, दिलखूष होऊनच जाणार! झुबेर ताजमत यांची ‘रॉयल’ गाडी साधारण २१ वर्षांपूर्वीची, तर ‘ताहुरा’ त्यापेक्षाही जुनी. फक्त उन्हाळा आणि रमझानच्या महिन्यात दोन्ही गाड्या तुफान गर्दी खेचतात. ‘रॉयल’नं कौसरबाग येथील मशिदीच्या गेट क्र. २ समोरही अजून एक गाडी टाकलीय. पण ती देखील फक्त उन्हाळा आणि ‘रमझान’च्या महिन्यातच सुरू असते.

आवर्जून पावलं वळावी, असे अनेक पदार्थ या गाडीवर मिळतात. मला आवडलेले पदार्थ म्हणजे खरबुजाचं आइस्क्रीम, खरबुजा मस्तानी आणि खरबुजा फालुदा...खरबूज हे रमझानच्या स्टॉलवर आवर्जून मिळणारं फळ. या पदार्थाची जशीच्या तशी चव आइस्क्रीममध्ये उतरलेली. आपण खरबुजाच्या फोडी खातोय, पल्प खातोय की आइस्क्रीम खातोय, हे न कळण्याइतकी अफलातून चव आइस्क्रीमला मिळालेली असते. खरबूज मस्तानी ही एक पायरी वरचा क्लास! खरबुजा आइस्क्रीम, खरबुजा मिल्कशेक, क्रीम आणि खरबुजाचे काही काप...खरीखुरी जन्नत...खरबुजा फालुद्यामध्येही सब्जा आणि शेवयांच्या जोडीला फक्त नि फक्त खरबूज! आइस्क्रीम, मिल्कशेक नि फळांच्या फोडींच्या रुपात...

फार भूक नसेल तर मग ताहुरा किंवा काश्मिरी सरबत किंवा हैदराबादी सरबताचा आस्वाद घ्यावा. नेमकं काय असतं त्यात झुबेरभाई सांगत नाहीत. पण रंग हिरवा आणि चव मावा कुल्फीच्या शेकसारखी. थोडा पिस्ताही असावा. थंडगार काश्मिरी सरबत नक्की ट्राय करण्यासारखं...‘आमच्याकडं मिळते तशी अंजीर बासुंदी कुठंही मिळणार नाही. कधीही आलात तरी अंजीर बासुंदी ट्राय केल्याशिवाय जाऊच नका,’ अशी गळ झुबेरभाई घालतात.

कुल्फी सगळीकडंच मिळते, पण कुल्फीचा मिल्कशेक किंवा कुल्फी कोल्ड्रिंक फक्त ‘रॉयल’मध्येच मिळतं. कुल्फीचे काप, कुल्फीचा मिल्कशेक आणि क्रीम यांचं तुफान कॉम्बिनेशन आपल्याला कुल्फी कोल्ड्रिंकमध्ये चाखायला मिळतं. ही झाली ‘रॉयल’ची स्पेशालिटी. बाकी रॉयल, तिरंगा, रोझ, ड्रायफ्रूट, काश्मिरी आणि केसर फालुदा तसंच आंबा आणि कुल्फी (मावा) मस्तानी हे साधारण बऱ्याच ठिकाणी मिळणारे पदार्थ इथंही मिळतात...

गेली दोन वर्षं झुबेरभाईंना ना रमझानच्या महिन्यात व्यवसाय करता आला ना उन्हाळ्यात व्यवसायाला ‘बरकत’ आली. गेल्या वर्षी प्रमाणंच यंदाही उन्हाळा आणि रमझानचा महिना लॉकडाउनमध्येच गेले. आता एक जूनला लॉकडाउन उठलं, तर जूनचा पूर्ण महिना त्यांना व्यवसाय करता येईल. नंतर गाडी बंद करून ते रिक्षा चालवणं किंवा इतर किरकोळ व्यवसायात गढून जातील.

‘झुबेरभाई, एक छोटेखानी दुकान घेऊन टाका आणि वर्षभर व्यवसाय सुरू ठेवा,’ असं मी आपलं सहज म्हटलं. ‘साहेब अल्लाच्या मनात असेल आणि लोकांचे दुवा असतील, तर लवकरच नक्की दुकान सुरू करू,’ असं ते सांगतात. झुबेरभाईंचं लवकरच छोटेखानी का होईना, पण दुकान सुरू व्हावं आणि आम्हाला वर्षभर या सर्व पदार्थांचा आस्वाद घेता याव्यात, याच मनापासून शुभेच्छा...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT